मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ५५-१

यशवंतराव नेहमी जुने नवे एकत्र साधून भविष्याचा अचूक वेध घेणारे समन्वयवादी द्रष्टे ऋषी होते. ते म्हणत, ‘‘प्रत्येक नवी गोष्ट केव्हा ना केव्हा तरी जुनी होणारच असते. जुन्या गोष्टी पाहिलेल्या माणसाला त्या गेल्याबद्दल हळहळ वाटणे स्वाभाविक आहे. पण आपण आपली दुर्बिण मागच्याच काळाकडे लावून बसलो तर पुढून येणारे किंवा आपल्या जवळ येऊन पोहोचलेले नवे आपल्याला कधीच नीट दिसणार नाही. तेव्हा जुन्यातले चांगले वेचायचे, गाठी बांधायचे आणि नव्याच्या स्वागतास पुढे यावयाचे हीच आपली वृत्ती असली पाहिजे. क्षेत्र कुठलेही असो, दोन पिढ्यांत अंतर आणि प्रसंगी संघर्ष हे येणारच. त्यातूनच प्रगती होत असते.’’

रंगभूमीबद्दल बोलताना देखील यशवंतरावांची जीवननिष्ठा कधी ढळली नाही. ‘‘जीवनावर प्रेम करा’’ हा साहित्यिकांना दिलेला उपदेश नाटकाबद्दल बोलतानाही ते आवर्जून देत आणि साहित्याप्रमाणेच नाटकही लोकाभिमुख झाले तरच ते टिकणार आहे असे ते स्पष्ट सांगत. ते नांदेडच्या नाट्यसंमेलनात म्हणाले होते की, ‘‘प्रत्यक्ष जीवनाच्या अधिक जवळ आलेली नाटके लोकप्रिय होतात, यशस्वी होतात. नाटक जीवनाचा जितका खोल वेध घेईल, आम्हाला त्रस्त करणा-या प्रश्नांना जितक्या जिव्हाळ्याने हात घालील तितके ते तुम्हा आम्हाला जवळचे वाटणार आहे. ही दिशा अपरिहार्य आहे.’’ जशी साहित्याची व्याख्या यशवंतरावांनी केली तशीच नाट्याचीही अचूकपणे केली आहे. ‘‘जीवन आणि समाज ह्यांच्यातले जिवंत नाट्य लोकाभिमुखतेने पकडणारी कलाकृती हेच नाट्य.’’ नाटककार, नट आणि प्रेक्षक हे रंगभूमीचे तीन मूलभूत घटक होत. यातील एक जरी लंगडा पडला तरी नाटक पडते ही यशवंतरावांची सुजाण कल्पना मर्मग्राही आहे.

यशवंतरावांनी तारुण्यालाच ‘‘काव्य’’ म्हटले आहे. ही व्याख्या चपखल आहे. तारुण्याचे सगळे गुणदोष काव्य स्वभावाला आणि शैलीला लागू पडतात. ‘‘हूरहूर’’ ही काव्याची प्रेरणा आणि तडफ व उतावळेपणाने पदविन्यास करण्याची लकब ही काव्याची धारणा होय. धगधगते विचार, अन्याय आणि दु:ख ह्याबाबतची असहिष्णुता आणि उगाच चिंता चिवडीत, मनाचे मुटकुळे करीत न बसण्याची बेफिकिरी हे काव्याचेच वर्णन नव्हे काय? यशवंतरावांचे वेळी कवीचे क्लब, ‘‘हुरहुर’’ क्लब ह्या नावाने ओळखले जात होते. ते ह्याचेच प्रतीक समजायला नको का?

कवीला आपल्यापेक्षाही दुस-याचे मन, समाजाचे मन अधिक चांगले कळले पाहिजे, आकळले पाहिजे, प्रत्येक वाचकाला वाटले पहिजे की, कवी माझेच दुखणे रस्त्यावर मांडतो आहे, आणि मग तो वाचक मनाशी म्हणतो, माझी कहाणी कुणी जाऊन सांगितली बरे याला? असा असतो यशवंतरावांच्या कल्पनेतला कवी. काव्यात गेयता अवश्य असावी आणि ती जितकी अधिक तितकी भावनेची किंमत भरभक्कम जाणवते असे यशवंतरावांना वाटत होते.

कवीने जीवनातले भव्य, दिव्य आणि उपाय असे शोधावे आणि बोधावे. इतिहासातल्या महान चरित्राची पदचिन्हे आणि पायवाटा शब्दाने साकार कराव्यात आणि गावीत त्यांची महन्मंगल स्तोत्रे की जी घडवितील महान राष्ट्रे, असे यशवंतराव भरल्या कंठाने आणि ओलावलेल्या शब्दाने सांगत.

यशवंतरावांना काव्य आवडते कारण ते लोकभाषेतून येई. बोलताना किंवा लिहिताना परकीय भाषा आली तरी ओठांवर फुटणारे अभंग किंवा ओवी मायभाषेतूनच आकार घेई. यशवंतरावांना म्हणूनच मायभाषेचे, लोकभाषेचे खूप वेड असे. पण म्हणून ते इतर भाषांचा कधी अव्हेर करायला सांगत नसत. उलट व्यावहारिक विचार करून विवेकाने सांगत की, ‘‘हिंदी आणि इंग्रजी’’ ही असू द्या अभ्यासात. पण ज्ञान मिळते ते ज्ञान म्हणून, भाषा म्हणून नव्हे. पण ते सहजतेने घेता येते ते मात्र भाषेतूनच, आणि ती भाषा असावी लागते मातृभाषाच, लोकभाषाच. यशवंतराव म्हणत मी भाषेवर प्रेम करणारा मनुष्य आहे, पण संकुचित अर्थाने भाषेचा अभिमानी नाही, पण ज्ञानासाठी मातृभाषा पाहिजे. ज्ञानभाषा आणि लोकभाषा एक झाल्याशिवाय समाजाचे जीवन समर्थ होत नाही. उन्नत होत नाही, विकसित होत नाही असे ते सोमय्या कॉलेजच्या पायाभरणी समारंभात, कोपरगावला म्हणाले होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org