मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ५२-१

ती भेट आमची जवळीक ठरली. मग आमचा अनेक वेळेला अनेक ठिकाणी परिचय वाढत गेला. ‘‘स्वामी’’ नंतर ‘‘श्रीमान योगी’’ मी लिहिलं. बाळासाहेब देसाई ही ‘‘श्रीमान योगी’’ च्या पाठीमागची प्रेरणा होती. बाळासाहेबांच्या आग्रहास्तव यशवंतरावांनी माझ्या हाती सोन्याचं कडं घातलं. समारंभ संपला आणि यशवंतराव म्हणाले, ‘‘देसाई, आज तुमचा मोठा सन्मान झालाय. पण या सन्मानानं विचलित होऊन जाऊ नका. तुम्हाला पुष्कळ मोठं व्हावयाचं आहे.’’ ज्या ज्या वेळेला मला यश मिळत असे त्या वेळी माझी पावलं जमिनीशी खिळवून ठेवायला साहेब कारणीभूत होत असत. ही वृत्ती सांगण्यापुरतीच नव्हती, ती त्यांच्या आचरणातही होती.

इचलकरंजीला साहित्य संमेलन भरलं होतं. मी त्याचा स्वागताध्यक्ष होतो. अध्यक्ष होते पु. ल. देशपांडे. त्यांनी अट घातली होती की, ‘‘साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर कुठालाही मंत्री मला चालणार नाही.‘‘ इचलकरंजीमध्ये यशवंतरावांना अतिशय मान्यता. या संकटातून बाहेर कसं पडावं, याची आम्हाला चिंता लागली होती. अध्यक्षांनी सांगितलेले कोणी तुमचे मंत्री येवोत अथवा न येवोत संमेलन साडेचार वाजता सुरू होणार. तीही मनात धास्ती. या सर्व नियमांमुळे स्वागताध्यक्ष या नात्यानं माझ्यावर पुष्कळ दडपण आलं होतं. आयको स्पिनिंग मिलचा पायाभरणी समारंभ करून यशवंतरावजी डेक्कन स्पिनिंग मिलवरती येणार होते. मी हार घेऊन डेक्कन स्पिनिंनग मीलच्या दाराशी उभा होतो. साहेब दीड वाजता आले. मी पुढे आलो आणि म्हणालो, ‘‘स्वागताध्यक्ष या नात्यानं मी हार आपल्याला घालत आहे.’’ साहेबांनी हार स्वीकारला. ते आपल्या नेहमीच्या हास्यवंदनानं मला म्हणाले, ‘‘रणजित, मला सर्व ठाऊक आहे. मी इथं आलो ते साहित्याचा प्रेमी म्हणून, तुम्हा गुणीजनांचा गौरव पाहावा म्हणून, तेव्हा मी कुठं बसतो याची चिंता तुम्ही करू नका.’’ स्वागताध्यक्ष या नात्यानं माझ्या माथ्यावरचा सारा भार उतरला होता. तरीही एक पाल चुकचुकत होती. मी सांगितलं, ‘‘साहेब, एक विनंती आहे. साडेचारला संमेलन सुरू होतंयं, त्या आधी तुम्ही यावं असं मला वाटतं.’’ ते म्हणाले, ‘‘काही काळजी करू नका, मी सर्व गोष्टी पाळीन’’ आणि काय आश्चर्य? बरोबर सव्वाचार वाजतां यशवंतरावजी साहित्य संमेलनाच्या मांडवामध्ये हजर होते. कार्यक्रम सुरू होण्याआधी ते मला म्हणाले, ‘‘रणजित, असा सुखसोहळा पाहण्याचं भाग्य कोण सोडेल? ते मी डोळे भरून पाहीन. पण मला असं वाटतं की तुम्ही सर्व साहित्यिकांनी हा कार्यक्रम झाल्यानंतर माझ्याकडं यावं.’’ मी त्यांना ‘‘हो’’ म्हणालो. साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं. सोहळा पार पडला. मी सर्व साहित्यिकांना यशवंतरावांचं आमंत्रण दिलं होतं. आमच्या जाण्याची व्यवस्था केली होती आणि त्यानुसार सारे साहित्यिक डेक्कन स्पिनिंनग मिलवर गोळा झाले. साहेबांच्या बरोबर जेवण झालं. नंतर मी साहेबांना म्हणालो, ‘‘साहेब, आता आपली बैठक खाली मांडू या.’’ साहेबांनी त्याला होकार दिला. तातडीने पलीकडच्या हॉलमध्ये जमखाने मांडले गेले. लोड आणला गेला आणि आम्ही सारे तिथे गेलो. आमच्या बैठकीत कवी बा. भ. बोरकर, पाडगावकर, महानोर इत्यादी सारे साहित्यिक होते. कवी अनिल हेही त्यात होते. कोणी कविता वाचत होतं. कोणी कविता म्हणतं होतं. गप्पांची मैफल, काव्याची मैफल रंगत होती. यशवंतराव हे कोणी मंत्री आहेत, याचंही भान आम्हाला राहिलेलं नव्हतं. तेही त्यामध्ये संपूर्ण सहभागी झालेले होते. अध्यक्षपदाची कामं आटोपून श्री. पु. ल. देशपांडे आणि सुनिताताई बाराच्या सुमारास येथे आल्या. सोन्याला सुंगध यावा तसं त्यांचं आगमन झालं. आम्ही सर्वांनी भाईना (पु. ल. देशपांडे) यांना काहीतरी म्हणण्याचा आग्रह केला. पु. ल. देशपांड्यांनी ‘‘जोहार मायबाप’’ हा अभंग म्हटला आणि त्या बैठकीची सांगता झाली. काही न बोलता यशवंतरावांनी आम्हा सर्वांचा निरोप घेतला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org