मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ४९-३

मी पुण्यात होतो. संयोजकांनी मला Seminar मध्ये १० मिनिटांसाठी येण्याची विनंती केली. मी तिथं गेलो. एकं चांगले शिक्षणतज्ज्ञ मला प्रश्न करीत होते. ज्यांचं उत्पन्न रु. १२००/-च्या आत आहे त्यांच्या मुलांना युनिव्हर्सिटीपर्यंतचं शिक्षण मोफत करून काय संकट निर्माण करीत आहात याची जाणीव आहे का? प्रश्न मला विचारून उत्तर त्यांनीच दिलं. शिक्षणाचे असले निर्णय घेऊन तुम्ही शिक्षित आणि प्रशिक्षित लोकांचं सैन्य निर्माण करीत आहात. हे शिक्षित लोक उद्या बंड करून उठतील याचा काही विचार केला का आपल्या मनाशी? मला विचार करायला वेळ थोडा होता, पण माझे विचार पक्के होते. 

मी त्यांना सांगितलं की, ‘‘मी जरूर याचा विचार केलाय. माझं असं मत आहे की, ही अशिक्षित सेना राहण्यापेक्षा शिक्षित सेना जर झाली आणि स्वत:चे आणि देशाचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी बंड केलं तर माझ्या कामाचा हेतू सफल झाला असं मी मानेन.’’ यशवंतरावजींनी हा विचार सांगितला आणि जमलेल्या १० हजार श्रोत्यांनी टाळ्यांचा पाऊस त्यांच्या या वक्तव्यावर पाडला. यशवंतरावजींनी ज्ञानाची लोकशाही निर्माण करण्याचं किती मोठं काम केलं याची जाणीव त्यांच्या या निर्णयामुळं येते. अॅटम बॉम्बनी क्रांती होणार नाही इतकी मोठी क्रांती शिक्षण झोपडीतल्या समाजापर्यंत त्यांनी पोचवून केली आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांचे राजकारणातील खरे वारस होते असे मला वाटते. यशवंतरावजी चव्हाण यांची मी युगकर्ताच्या दिवाळी अंकासाठी मुलाखत घेतली होती. पंजाबचा प्रश्न फार नाजूकपणे सोडवला पाहिजे असे ते म्हणाले होते.

दरम्यान माझा ‘जागल’ हा कवितासंग्रह मी त्यांच्याकडे पाठविला. १ एप्रिल १९८२ च्या पत्रात त्यांनी या माझ्या पुस्तकांसंबंधी खूपच सुंदर अभिप्राय पाठविला तो मला कोणत्याही पुरस्कारपेक्षा मोठा वाटतो. ‘तुमचा जागल’ वाचला. ज्या ग्रामीण जीवनात तुम्ही वाढलात त्याचे इतके वास्तव आणि भावनाशील काव्यात झालेले व्यक्तीकरण मी प्रथमच पाहिले. कविता पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटल्या. पुन्हा वाचल्या म्हणजे अर्थ लक्षात येतो. कवितांचे जे समीक्षक आहेत त्यांनी तुमच्या कवितांचे समीक्षण केले की नाही माहीत नाही. त्या समीक्षकांची सर्व परिमाणे थिटी आहेत. कृष्णाकांठचं लिखाण गतीने नाही तर संथ गतीने चालले आहे.’’ मराठी संस्कृतीच्या राजाने इतका मनापासून आणि इतका मनस्वी अभिप्राय माझ्या कवितांना दिला. माझी पुढची कविता फुलायला, बहरायला त्यांचा आशीर्वाद मला सतत प्रोत्साहित करीत असतो.

१९८३च्या दरम्यान माझा ‘दिशा आणि दृष्टी’ हा वैचारिक लेखांचा संग्रह प्रकाशित झाला. या पुस्तकाला मी यशवंतरावजींची प्रस्तावना मागितली. त्यांनी पुस्तकाची मुद्रणप्रत पाठवा, प्रस्तावना देतो असं सुचवलं. पुस्तकाची मुद्रणप्रत पाठविल्यानंतर त्यांनी ती वाचली आणि प्रस्तावना नाकारली. १५ एप्रिल १९८३च्या त्यांच्या पत्रात प्रस्तावनेसंबंधी नकार जसा होता तसाच त्यांचा माझ्यासंबंधीचा स्नेह त्या पत्रात चिंब भिजलेला होता. त्यांनी लिहिलं,

‘‘तुमचे दि. ९ एप्रिलचे पत्र आणि ‘दिशा आणि दृष्टी’ या पुस्तकाची मुद्रणप्रत मिळाली. मी हाती येताच ती वाचून काढली.

शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्याबद्दलचे तुमचे लेख निरपवाद व उत्तम आहेत. परंतु चालू राजकीय परिस्थिती आणि त्यावरील तुमची निदाने हे वाचल्यानंतर माझ्या हे लक्षात आले की, तुमच्या पुस्तकावर मी प्रस्तावना लिहिणे हे अशक्य आहे. प्रस्तावना लिहायची म्हटले म्हणजे तुमच्या विचारावर सपाटून टीका करावी लागेल आणि अशी प्रस्तावना लिहिण्याची माझी इच्छा नाही. कारण मला तुमच्याबद्दल लोभ आहे व तुमच्या साहित्य गुणाबद्दल कौतुक आहे. स्पष्ट लिहिल्याबद्दल राग मानू नका. असेच प्रेम असू द्यावे.’’

यशवंतरावजी चव्हाण हा माणूस किती मोठा होता हे पाहण्यापेक्षा हा माणूस मनाने किती मोठा माणूस होता हे पाहणे मला अधिक रास्त वाटते. तरच त्यांना न्याय देता येईल. त्यांच्या सहवासात मी आलो. त्यांचा स्नेह, जिव्हाळा आणि मायेची ऊब मला जी मिळाली ती व्यावहारिक लाभापेक्षा मला लाख मोलाची वाटते. ‘दिशा आणि दृष्टी’ या पुस्तकाला त्यांची प्रस्तावना लाभली नाही. ते भाग्य माझ्या ‘सूर्यपंख’ या पुस्तकाला लाभले. त्यांच्या निधनाच्या अगदी एक-दोन महिने अगोदर त्यांनी ही प्रस्तावना लिहिली. त्यांचे अखेरचे साहित्यिक व वैचारिक लेखन माझ्या पुस्तकाला प्रस्तावना देण्याच्या निमित्ताने झाले. ५ नोव्हेंबर १९८४ ला त्यांच्याशी फोनवर बोललो. दिवाळी अंकाला मुलाखत मागितली. प्रश्न पाठवा, मुलाखत लिहून पाठवतो म्हणाले. २५ नोव्हेंबर उजाडला आणि महाराष्ट्रासोबत मीही कृष्णा-गोदेच्या आसवांनी मनसोक्त रडलो. माझा घरचा माणूस गेला इतका रडलो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org