मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ४९-१

खरं म्हणजे मी यशवंतरावजींच्या सहवासात फार उशिरा आलो. त्यांच्या उशिरा सहवासात येण्याचं कारण माझं वय हे जसं होतं तसंच दिल्लीला ते असल्यामुळं विद्यार्थी जीवनात तिथंपर्यंत मला पोंचणं कठीण होतं. मात्र यशवंतरावांचं कार्य, त्यांचे विचार, त्यांची मृदुता ही माझ्या मनापर्यंत कधीच पोंचली होती. यशवंतरावांसारखा शेतक-याचा मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आजपर्यंत तरी झाला नाही. पुढचं कोणी बोलावं?

मी मराठवाडा विकास आंदोलनातला एक आघाडीचा विद्यार्थी नेता. १९७२च्या आसपास यशवंतराव केव्हातरी मराठवाड्यात आले आणि एका सभेत त्यांनी सांगितलं की, आणखी पाच वर्षे वसंतराव नाईक हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. मराठवाड्याला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद मिळालं पाहिजे ही मागणी ऐरणीवर आली होती. वातावरण तयार झालं होतं. आणि यशवंतरावांनी ऐन दुष्काळी वातावरणात मराठवाड्याच्या मागणीवर पाणी फिरवलं होतं. या पाश्र्वभूमीवर औरंगाबादच्या शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसदेच्या उद्घाटनाला चव्हाण येणार हे पक्क झालं. त्याच्या पाच-सहा दिवस अगोदर मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची जाहीर सभा गुलमंडीवर भरली होती. त्या सभेत मी सहज बोलून गेलो, ‘‘यशवंतरावजी चव्हाण यांच्याकडून मराठवाड्याच्या मोठ्या अपेक्षा होत्या, त्या अपेक्षांचा यशवंतरावजींनी चुराडा केला आहे. यशवंतरावजी तुम्ही लवकरच मराठवाड्याच्या दौ-यावर येत आहात त्या वेळी आम्ही तुमचं स्वागत निषेध म्हणून मराठवाडा बंद ठेवून करणार आहोत.’’ विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या पावसात मी भाषण संपवलं आणि यशवंतरावांनी आपला दौराच रद्द केला! कटुता कशी टाळावी याचं भान त्यांना पूर्ण होतं.

मराठवाडा विद्यापीठानं यशवंतरावजींना डी. लीट्. देऊन त्यांचा बहुमान जसा केला तसाच तो विद्यापीठाचाही बहुमान होता. यशवंतरावजींच्या पुढाकारानंच मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली होती. या सभेत यशवंतरावजींसोबत स्वामी रामानंद तीर्थ यांनाही डी. लीट्. हा बहुमान देण्यात आला. स्वामी रामानंद तीर्थांनी या सभेत मराठवाड्याचं गा-हाणं मांडलं. ‘‘आम्ही महाराष्ट्रात अटी न घालता सामील झालो. आमचा विकास होत नाही. आमचं मागासलेपण दूर झालं पाहिजे’’ अशा आशयाचे विचार त्यांनी मांडले. त्यानंतर यशवंतरावजी बोलायला उठले आणि त्यांच्या नेहमीच्या सहजसुंदर विचारशैलीनं सबंध सभा त्यांनी जिंकलीच पण मराठवाड्याच्या लोकमनालाही जिंकून घेतलं. त्यांनी सांगितलं, ‘‘आपण विनाअट महाराष्ट्रात सामील झालात हे खरं आहे. मराठवाडा म्हणजे मराठी संस्कृतीचं माहेर, उगमस्थान. खूप दिवसांनी आसुसलेला महाराष्ट्र आपल्या संस्कृतीच्या माहेरात सामील झाला.’’ महाराष्ट्र मराठी संस्कृतीचं माहेर असलेल्या मराठवाड्यात सामील झाला, हे त्यांचं विधान राजकारणासाठी नव्हतं. मराठी संस्कृतीच्या ओढीतून फुटलेलं ते सत्य होतं.

पुण्याच्या अशाच एका सभेत मराठवाड्यातल्या युवक कार्यकर्त्याचा एक गट यशवंतरावांना मराठवाड्याला मुख्यमंत्रिपद पाहिजे या मागणीचं निवेदन देण्यासाठी गेला. निवेदन घेत यशवंतराव या कार्यकर्त्याना अगदी सहजपणे बोलून गेले, ‘‘मराठवाडा, प. महाराष्ट्र, विदर्भ ही भाषा बाळांनो आमच्या पिढीपुरतीच संपू द्या! तुमच्या पिढीच्या मुखात ही भाषा नको. मराठवाड्याचा मुख्यमंत्री पाहिजे असं कशाला मागता? मराठवाड्याचं नाही महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद मागा. आपले हे प्रादेशिक भेद तुमच्या पिढीनं विसरले पाहिजेत.’’ यशवंतराव चव्हाण यांचं संभाषण त्यांच्या अंत:करणाच्या तळवटातून फुटत असे. ख-या अर्थाने हा नेता कृष्णाकाठानं दिलेला महाराष्ट्राच्या सुसंस्कृततेचा सोनहिरा होता हेच खरं.

मी प्राध्यापक झाल्यावर त्यांच्याशी माझा पत्रव्यवहार झाला. मी बीडला असताना राजर्षी शाहू व्याख्यानमाला चालवत होतो. त्या व्याख्यानमालेत यशवंतरावजींनी यावं ही माझी इच्छा. मी त्यांना १० जानेवारी १९७९ला लिहिलेल्या पत्रात त्यांना व्याख्यानमालेचं निमंत्रण तर दिलंच शिवाय सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपण परखड बोलण्याची गरज आहे हे लिहिलं. युगकर्ता मासिक याच दरम्यान सुरू केलं होतं आणि या मासिकासाठी मुलाखत देण्याची विनंती केली होती. यशवंतरावजींचं १८ जानेवारी १९७९चं पत्र आलं. त्यांनी लिहिलं, ‘‘तुमची दोन्ही पत्रं मला मिळाली. बीडला तुमच्या व्याख्यानमालेस येण्यास होकार देऊनही मी अद्याप येऊ शकलो नाही. युगकर्ता अजून माझ्या हाती यायचा आहे. आल्यानंतर तो जरूर पाहीन. हल्लीच्या अस्वस्थ व अस्थिर राजकीय वातावरणात जाहीर बोलण्याची गरज आहे. परंतु तूर्त मला ते टाळले पाहिजे म्हणून निश्चित तारीख मी आपणाला देत नाही.’’ जून ७९च्या दरम्यान यशवंतरावजींना एक पत्र लिहून माझे सहित्यिक मित्र श्री. शिवाजी सावंत यांच्या प्रकृतीविषयी आणि त्यांना करावयाच्या मदतीसंबंधी विनंती केली. ७ जून १९७९ चं त्यांचं पत्र तात्काळ आलं. त्यांनी लिहिलं,

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org