मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ४५-१

यशवंतराव म्हणजे एक समर्थ नेतृत्व, अशी राघुअण्णांची बालंबाल खात्री होती. एखादा मावळा शिवाजीराजाबद्दल बोलला असेल तसे ते यशवंतरावांबद्दल बोलत. मला गुंगवून टाकत. शाहीर निकम आणि राघुअण्णा लिमये यांनी यशवंतरावांविषयी माझ्या मनात एक आगळा आदरभाव निर्माण करून ठेवला. यशवंतरावांची एकदा प्रत्यक्ष भेट व्हावी असे मला सारखे वाटत राहिले. मी वावरत होतो चित्रपटात, साहित्यात, पण मनाचे धागेदोरे राजकारणापासून सर्वस्वी तुटू शकत नव्हते. तुरुंगवास भोगलेले मित्र राज्यकर्ते झालेले पाहण्याची तहान डोळ्यांना होतीच.

भेटीचा योग आला तेव्हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेले होते. त्यांचा फार मोठा सत्कारसमारंभ साजरा होत होता. मुंबई महानगरातील शेकडो संस्था त्यांना पुष्पहार अर्पण करायला उत्सुक होत्या. त्या सर्व संस्थांचे प्रतिनिधी हातात पुष्पमाला घेऊन उभे होते. सर्वांत शेवटी माझा क्रमांक होता. मराठी चित्रपटव्यवसायाचा प्रतिनिधी एवढाच माझा अधिकार होता. मोजता येणार नाही इतका जनसमुदाय लोटला होता. त्या अगणित डोळ्यांच्या साक्षीने हा सत्कार चालला होता. माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावत होत्या.

माझी पाळी आली. आम्ही दोघे एकमेकांसमोर आलो. मीच काय, अवघा भारत आता यशवंतरावांना ओळखत होता. माझी ओळख, सत्कार करणा-यांची नावे पुकारणा-या गृहस्थाकडून आपोआपच झाली. दूरध्वनिक्षेपकातून आवाज आला. ‘‘श्री.ग.दि.माडगूळकर... मराठी चित्रपट व्यवसायाच्या वतीने!’’

मी पुढे सरलो. माझ्या जिल्ह्यातला, शिवघडी खेळलेला, गरिबीत वाढलेला, एक सामान्य शेतक-याचा मुलगा माझ्यासमोर, उभ्या महाराष्ट्राचा लोकनियुक्त मुख्यमंत्री म्हणून आपादमस्तक उभा होता. नखशिखान्त शुभ्र खादीचा पेहराव. आर्जवी-आनंदी मुद्रा. सह्याद्रीच्या शिलाखंडासारखा देह. विलक्षण बोलके डोळे. त्या डोळ्यांनी ओळख दिली. मी हार घातला. तेवढ्यानं समाधान झालं नाही. माझ्या मनातल्या भाबड्या खेडुताने बाहु पसरले. समोरच्या खेडुताला कडकडून आलिंगन दिले. मी आणि यशवंतराव एकमेकांना कडकडून भेटलो. शब्द उमटलेच नाहीत!

मुंबईच्या नागर संस्कृतीला कदाचित ते चमत्कारिक वाटले असेल, रुचले नसेल. मुख्यमंर्त्र्यांचे सचिव, अंगरक्षक, जागच्या जागी चुळबुळले असतील. आम्ही एकमेकांना भेटलो. कडकडून भेटलो. बस्स! ही माझी आणि यशवंतरावांची पहिली प्रत्यक्ष भेट.

संघर्षापेक्षा सामंजस्याकडे यशवंतरावांचा अधिक कल आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरून त्यांनी केलेली काही कार्ये बोलकी आहेत. गांधीहत्येच्या गदारोळात कैक ब्राह्मण कुटुंबांचा आसरा गेला होता. हुल्लडीच्या भरात मुळीच होऊ नये ते होऊन गेले होते. नामशेष होत आलेला एक द्वेष पुन्हा उसळण्याच्या बेतात होता. घरे पुन्हा उभी करण्यासाठी ब्राह्मणांना दिलेली कर्जे यशवंतरावांनी माफ करून टाकली. ब्राह्मण आणि बहुजन यांच्यातील द्वेषाची कीड दृष्टोत्पत्तीस येताच एका फवा-याने ती मारून टाकली. धर्मांतर केलेल्या पूर्वास्पृश्यांना ते स्वत:ला ‘‘बौद्ध’’ म्हणवू लागले तरी हरिजनत्वाच्या सा-या सवलती त्यांनी देऊ केल्या. बाराशे रूपयांच्या आत वार्षिक उत्पन्न असणा-या पालकांच्या मुलांना शिक्षण मोफत मिळेल, असे उभे केले. मराठी रंगभूमी करमणूककरातून मुक्त केली. साहित्यिक, कलाकार, नायक, नट-तमासगीर, कुस्तीगीर, शाहीर या सर्वांसाठी त्यांनी अनुदाने सुरू केली.

उभ्या महाराष्ट्रात त्यांनी एक चैतन्य भरले. ‘‘कृष्यौद्योगिक समाज’’ ही शब्दसंहिता यशवंतरावांचीच. शेती सुधारावी, उद्योग वाढावे, विज्ञानाचे वरदान समाजाला लाभावे, शिक्षण जीवनोपयोगी व्हावे, यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले.

दिल्लीचे बोलावणे आले तेव्हा इथले काम इथल्या सहका-यांच्या स्वाधीन करून यशवंतराव दिल्लीला गेले. मला आठवतं यशवंतराव दिल्लीला जायला निघाले, त्या वेळी मी विधानपरिषदेचा सदस्य होतो. त्यांना निरोप देणारी अतिशय उत्तम भाषणे अनेक माननीय सदस्यांनी केली. माझ्यावर पाळी आली. भारावल्यासारखा मीही काही बोललो. म्हणालो, ‘‘यशवंतरावांनी राजकारण काय केलं, ते सांगण्याचा माझा अधिकार नाही. या महाराष्ट्रदेशात कलासाहित्याला शासनाकडून जी प्रतिष्ठा मिळाली ती यशवंतरावांमुळे. यशवंतराव मनानं रसिक आहेत, साहित्यिक आहेत.’’

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org