मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ४०-१

मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कारकीर्दीची आठवण आजही सर्व थरांतील लोकांना सुखावते. त्यांच्या कारकीर्दीत जातीय वाद, प्रांतीय वाद यांचे भांडवल न करता सर्वांना आपापले काम समाधानाने करता येते याचा अनुभव मिळत होता. सर्वच क्षेत्रात जिव्हाळा व जवळीक साधण्याची अवघड कला त्यांच्याजवळ होती, साहित्याची त्यांना मनापासून आवड होती, त्यामुळे साहित्यिकांची बूज राखीत असत म्हणून ते खूष होते, पण सिनेमावाल्यांनाही त्यांच्याशिवाय चैन पडत नसे याची मला गम्मत वाटायची. राजकीय विरोधक त्यांचा उल्लेख मनापासून आदराने करीत.

जर्मनीतील अभ्यासक्रम पुरा करून परतल्यानंतर पाच वर्षे मला कराडातील यशवंतरावांच्या सायन्स कॉलेजचे प्राचार्यपद लाभले. या काळात त्यांच्या स्वभावातील अनेक पैलूंचे जवळून दर्शन झाले. व्याख्यान देण्याच्या त्यांच्या शैलीने मी त्या काळात भारावून गेलो होतो. एकदा तर कोल्हापुरातील त्यांच्या दोन दिवसांच्या दौ-यातील सर्व व्याख्यानांना हजर राहिलो. त्यांच्या बोलण्यात संथपणा असायचा, आवाजातील चढउताराची आवश्यकता नव्हती, अभिनय नाही, विचारांची वा विनोदाची पुनरावृत्ती नाही. थोडेसे स्वगत, थोडेसे हितगूज करीत दिलेले व्याख्यान कधीच लांबायचे नाही. त्यामुळे ही व्याख्याने मला खूप आवडायची.

प्रत्येक गोष्टीत त्यांची स्वत:ची खास शैली असायची. कॉलेजवर एखाद्या पाहुण्यास घेऊन यायचे. माझी प्राचार्य म्हणून, ओळख करून दिल्यावर मला पाहुण्यांना कॉलेज दाखवायला सांगून स्वत: त्या ठिकाणी जमलेल्या अनेक मंडळींच्या बरोबर कॉलेजच्या प्रांगणात बोलत राहायचे. अन्य ठिकाणी अशा वेळी चालकमंडळी प्राचार्याला गुंडाळून ठेवून आलेल्या पाहुण्याला आपणच कॉलेज चालवितो अशा आविर्भावात समजावून देतात, या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर असे कॉलेज चालविण्याची जबाबदारी आपल्याला लाभली याबद्दल धन्यता वाटायची. आणखी एक अविस्मरणीय आठवण, राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसादनी कॉलेजच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्याचे मान्य केले त्या वेळची.

कराडला राष्ट्रपतींची पहिली भेट, त्यामुळे प्रचंड जनसमुदाय येणार,त्यांच्या बसण्याची व्यवस्था, राष्ट्रपतींच्या भेटीचा रिवाज (Protocol) सांभाळणे, एवढ्या लोकांना राष्ट्रपतींचे भाषण नीट ऐकण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय अशा अनेक गोष्टींच्या पूर्ततेकरता सर्व कॉलेज रात्रंदिवस झटून तयारी करीत होते. कॉलेज समारंभानंतर प्राचार्यांच्या ताब्यात सुपूर्त होते अशा भावनेने प्रत्यक्ष समारंभात चालकांनी प्राचार्यांचा समावेश केलेला नव्हता. मला ते माहीत होते. मला किंवा प्राध्यापकांना त्याचे बिलकुल वैषम्य वाटले नाही, कारण चालकांच्यात व आमच्यात अत्यंत सलोख्याचे संबंध असल्याने मुद्दाम काही केले असणार ही शंका येत नसे. समारंभाच्या आदल्या दिवशी यशवंतराव मुंबईहून आले. सायंकाळी कॉलेजवर येऊन सर्व व्यवस्था तपशीलवार तपासून ठीक आहे याची खात्री करून घेऊन सर्किटहाऊसवर गेले. आमंत्रणपत्रिकेवर नजर टाकल्यावर त्यात प्राचार्यांचा समावेश नाही हे पाहून ती गोष्ट त्यांना खटकली. संस्था चालकांनी याबाबत आपली विचारसरणी सांगितली, पण ती त्यांना पसंत पडली नाही. रात्री ११ वाजता एक व्यक्ती माझ्याकडे साहेबांचा निरोप घेऊन आली. निरोप होता उद्याच्या समारंभात मी पाच मिनिटे प्रास्ताविक भाषण करावे. या वेळी मला काय वाटले असेल याची कल्पना करा. प्रत्येकाला तुला मानाचे स्थान आहे याची जाणीव प्रत्यक्ष कृतीने देण्याची त्यांची शासनपद्धती होती, त्यामुळे सुपूर्त केलेली जबाबदारी जीव तोडून पूर्ण करण्यापलीकडे दुसरा पर्याय त्या व्यक्तीजवळ राहातच नसे.

वर्षातून शिक्षणमंडळाच्या एक दोन बैठकी त्यांच्या अध्यक्षतेखाली होत असत, या बैठकीत तास दोन तास अत्यंत गांभीर्याने लहान मोठ्या कॉलेजशी निगडित विषयांचा ऊहापोह होत असे. त्यामुळे आम्ही या बैठकांची चातकासारखी वाट पाहात असू. नुसती चर्चा व त्यावर ठराव यावर त्यांचा विश्वास नसे. गेल्या बैठकीतील ठरावांची काटेकोर पूर्तता झाली की नाही याची कसून पाहणी करीत नसल्यास संबंधिताला त्याचा जाब द्यावा लागत असे. समस्या वाजवी असल्यास त्यावर तोडगा काढलाच पाहिजे हा आग्रह. अशाच एका बैठकीत गावाकडून येणारे मुलांचे जेवणाचे डबे एस. टी. तून वेळेवर येत नसल्याने मुलांचे हाल होतात असे ऐकल्यावर स्वत:च उठले. फोन उचलला व एस. टी. प्रमुखाला ‘‘ऐकले ते खरे आहे का?’’ हे विचारून, त्यांची अडचण काय याची विचारणा अत्यंत सौम्य शब्दात विचारली. ते काय अडचण सांगणार? दुस-या दिवसापासून सर्व डबे वेळेवर येऊ लागले. मुले प्राचार्यांवर खूष. प्राचार्य साहेबांवर खूष!

प्रगतिशील व उदार विचार हे त्यांचे वैशिष्ट्य. कराडसारख्या लहान गावी इंजिनिअरिंग कॉलेज, सायन्स कॉलेजसारख्या शिक्षण संस्था उत्तम स्थितीत चालवायच्या असल्यास सर्व पथ्ये पाळली पाहिजेत याची जाणीव व आग्रह त्यांच्याजवळ होता. ‘‘आपल्याला उत्तम प्राध्यापकवर्ग मिळाल्याशिवाय मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणार नाही. चांगला प्राध्यापक नुसत्या चांगल्या पगारावर कराडला येणार नाही’’ त्यांची राहण्याची अपेक्षा सध्याचे कराड पुरे करू शकणार नाही याची त्यांना जाणीव होती. कराड अर्बन बँकेच्या चालकांना नवीन पद्धतीची घरे प्राध्यापकांच्या करता बांधण्याची सूचना त्यांनी दिली व त्याप्रमाणे ब-याच प्राध्यापकांच्या निवासाची सोय केली. औषधोपचाराकरता कॉटेज हॉस्पिटल सुरू केले. कुशल व कल्पक व्यवस्थापन कशाला म्हणायचे याचे अनेक धडे माझ्याप्रमाणे त्यांच्याबरोबर काम केलेल्यांना शिकायला मिळाले असणार !

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org