मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ३९-१

प्रिय श्री.जोगळेकर यांस,

स.न.वि.वि.

येथे आल्यापासून तुम्हांला पत्र लिहावे असे सारखे वाटत होते. तरूण भारत मधील सौ.वेणूतार्इंवरील तुमचा लेख वाचला. तुम्ही तिला चांगले समजून घेतले होते असा त्याचा अर्थ आहे. आभारी आहे. हे औपचारिक नव्हे.

जून अखेर ऐवजी आता अर्ज करून मुदत नोव्हेंबर अखेरपर्यंत मिळवली आहे. तुम्हास यावयास कोणता महिना सोयीचा, ते कळविले म्हणजे मी माझे येथे ओळीने हजर असणारे दिवस तुम्हास कळवीन. कमिशनरचे दौरे सुरू आहेत. या कामात काही वेळ जातो म्हणून बरे. एकटा असलो की आठवणींनी माझे सगळे जागेपणाचे जग भरून जाते. तुम्ही चार-दोन दिवस आलात म्हणजे तेवढेच माझे दिवस बरे जातील. रिटर्न खेरीज माझे दुसरे अनेक खासगी प्रश्न तुमच्याशी बोलायचे आहेत. सवडीने उत्तर द्या. कळावे  
                                
आ. यशवंतराव चव्हाण.

नंतर एकदा मी रविवार १६ सष्टेंबरच्या संध्याकाळच्या विमानाने दिल्लीस गेलो. जेवण आटोपून साहेब माझी वाट पाहात बसले होते. मी त्यांना घोडके हलवाईचा एक पेढ्याचा पुडा दिला आणि दुसरा बर्फीचा दिला. त्यांनी प्रश्नार्थक चेहरा करून पाहिले. मी म्हणालो, ‘‘एक आपला नेहमीचा आणि दुसरा आपल्या ‘‘कृष्णाकाठला’’ केळकर पारितोषिक मिळाल्याचा’’. तोपर्यंत हा निकाल त्यांना माहितच नव्हता. जरासा विचार करीत ते म्हणाले, ‘‘पारितोषिक म्हणजे जरा शाळकरी मुलांसारखे वाटतं नाही!’’ मी म्हणालो, ‘‘तो ख-या अर्थाने पुरस्कार आहे.’’ आणि पारितोषिक साहित्य सम्राटांच्या नावाने आहे.’’ पुन्हा क्षणभर विचार करून म्हणाले, ‘‘खरंच आहे. आता मला दुस-या भागाकडे झपाट्याने जायला हवं.’’

परवाच्या मुक्कामात साहेबांचे मन मुंबई आणि दिल्ली या दोन्ही मुक्कामांतील आठवणी साठवण्यात व्यग्र दिसले आणि अशा आठवणी सांगता सांगता मध्येच वेणूतार्इंची आठवण येई. गळा दाटून येई, शब्द माघारी जात.

एक दिवस मी माझी कामे आटोपून संध्याकाळी बंगल्यावर परत आलो. गाडीतून उतरलो तो हॉलमध्ये साहेब अेकटेच बसलेले होते. त्यांना एकटे बसलेले पाहून मन गलबलले. पण तोंडावर उसने हासू आणतच मी आत जाऊन त्यांच्या शेजारच्या कोचावर बसलो. त्या हॉलमधल्या सा-या रिकाम्या खुच्र्या, टेबले आणि सोफा यांकडे नजर फिरवत साहेब म्हणाले, ‘‘जोगळेकर, गेली वीस वर्षे मी विचार करीत असे की, मला सरकारी फर्निचर असताना माझी बायको दरवर्षी थोडे थोडे फर्निचर विकत घेऊन सरकारी फर्निचर परत का धाडते? तो तिचा छंद असावा असे वाटे. पण आता वाटतं की, तिला हे उमजत असेल की, एक दिवस ह्यांना सरकारी फर्निचर परत करावे लागेल. तेव्हा सारी जागा भकास दिसेल, म्हणून तिने----’’ आणि मग अक्षरक्ष: अश्रुधारा सुरू झाल्या. मी मनातल्या मनात फार हेलावलो. वाटले हे म्हणतात की आता मी त्या धक्क्यातून सावरलो. पण ते खरे नाही. हे दु:ख या हळव्या मनाला कुरतडून कुरतडून छळत राहणार. छळणार अगदी अखेरपर्यंत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org