मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १५१-१

दीड-दोन लाख असुरक्षित कष्टक-यांचा तो जमाव परिषदेच्या ठिकाणी एकत्रित आलेला पाहून यशवंतराव आश्चर्यचकित झाले. या परिषदेला श्री. वसंतराव नाईक, श्री. बाळासाहेब देसाई, श्री. नरेंद्र तिडके हजर होते. मुंबईतली ही प्रचंड शक्ती अर्धपोटी अवस्थेत राहून वाया जात आहे हे पाहून त्यांना धक्का बसला. या असुरक्षित कामगारांना कायद्याचे संरक्षण देऊ असे आश्वासन त्यांनी पूर्वी दिले होते परंतु त्या परिषदेचे भव्य रूप पाहून कायदा करण्याची नितांत गरज आहे याविषयी त्यांची खात्री पटली. त्यांनी तसे आपल्या शब्दात व्यक्त केले.

त्यानंतर सरकारी चक्रे फिरू लागली. कायदा करावयाचा तर त्यासाठी पूर्व तयार करावी लागणार होती. सुरुवातीला सरकारने एक आदेश काढून कमेटी नियुक्त केली. या कमेटीने असुरक्षित कामगारांच्या एकूण समस्यांचा अभ्यास करावा असे ठरविण्यात आले. या अभ्यासानंतर सरकारने ‘लेबर बोर्डस्’ बनविले. ग्रोसरी, लोखंडी जथा, कापड कामगार, कॉटन कामगार, गोदी कामगार अशा प्रकारची ‘लेबर बोर्डस्’ अस्तित्वात आली. असा उठाव सुरू होताच, मीठ कामगार, मच्छी कामगार असे निरनिराळ्या क्षेत्रातील कामगार संघटनेत सामील झाले.

इतके सर्व घडून आल्यावर आता प्रत्यक्ष कायदा तयार होऊन तशी घोषणा होण्याचे आणि या नव्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे हुकूम जारी होण्याचेच काय ते शिल्लक उरले होते.
त्या वेळी हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी यशवंतराव कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. महाराष्ट्र सरकारलाही त्यांनी स्वस्थ बसू दिले नाही.

अखेर कायदा झाला. या कायद्याचे स्वागत करून कायद्याची अंमलबजावणी सुरू करून देण्याचे ऐतिहासिक कार्य यशवंतरावांच्या उपस्थितीतच झाले पाहिजे असा संघटनेचे नेते श्री. आण्णासाहेब पाटील यांनी आग्रह धरला.

त्यानुसार यशवंतरावांना पाचारण करण्यात आले. त्यांनी अत्यंत समाधानाने आमंत्रणाचा स्वीकार केला. खास विमानाने तेवढ्या कार्यक्रमासाठी दिल्लीहून मुंबईला आले आणि उद्घाटन करून लगेच दोन तासात दिल्लीला परतले. त्या दिवशी प्रजासत्ताकदिन होता. दि. २६ जानेवारी १९७० या दिवशी यशवंतरावांच्या मुद्रेवर कार्यपूर्तीचे एक आगळेच समाधान होते.

या कायद्यामुळे कामगारांना रजा, रजेचा पगार, बोनस, औषधविषयक सवलती, घरभाडे असे विविध प्रकारचे लाभ घडले. मुख्यत: कष्टक-यांच्या मजुरीची निश्चिती होऊन त्यांच्या पिळवणुकीला आळा बसला. यशवंतरावांकडून असुरक्षित कामगारांना ही देन मिळाल्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर शतपटीने दुणावला. गरीब कष्टक-यांचे ते दैवत बनले.

मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट अॅण्ड जनरल कामगार युनियन अस्तित्वात आली, भक्कम बनली आणि या संघटनेमुळे पन्नास हजारावर कामगारांना संरक्षण मिळाले ते यशवंतरावांच्या मार्गदर्शनामुळे, कर्तृत्वामुळे होय. कामगारांना कायद्याचे संरक्षण मिळाल्यामुळे ते एकत्र आले आणि नंतरच्या काळात मुंबईप्रमाणे महाराष्ट्राच्या अन्य शहरात हे लोण पोहोचले. तेथील कष्टकरी कामगारांनाही हा कायदा लागू करण्यात आला.

माथाडी कामगार बंधू यशवंतरावांचे नेहमीच कृतज्ञ राहिले. यशवंतराव मुंबईत असले आणि त्या दिवशी दसरा असला तर बुहसंख्य कामगार बंधू यशवंतरावांना आणि सौ. वेणूतार्इंना सोने देऊन वंदन करण्यास जाण्याची प्रथा होती. कामगारांबरोबर तो एक वेगळा आनंद होता. सोने द्यावयास येणारामध्ये महिला कामगार असल्या तर सौ. वेणूताई त्यांना चोळी-साडी देत असत.

मला स्वत:ला तर ते आपल्या घरातलाच एक मानीत असत. त्यांच्याविषयी माझ्या मनात कमालीचा आदर असावयाचा. आम्ही दोघेही सातारा जिल्ह्यातले. मुख्यत: कराडचे. मुंबईमध्ये आल्यावर, सामान्य स्थितीतून मार्ग काढीत काढीत मी मुंबई महानगरपालिकेचा सभासद झाल्याबद्दल त्यांना अभिमान वाटत असे. १९७४ मध्ये महापालिकेत मी सभागृहाचा नेता म्हणून निवडून आलो. त्या वेळी मी त्यांना आवर्जून भेटावयास गेलो. त्यांना पुष्पगुच्छ देऊन नमस्कार केला आणि आशीर्वाद मागितला तेव्हा म्हणाले, ‘‘बाबूराव, मुंबई महापालिकेचा नेता होणे हे मंत्री होण्याइतके प्रतिष्ठेचे आहे. फोन करून मीच तुमचे अभिनंदन करणार होतो.’’

१९८१ मध्ये यशवंतराव सत्तेवर नव्हते. तरीपण सातारा जिल्ह्यातले, कराड भागातले लोक त्यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जात असत. त्या वेळी त्यातल्या काही जणांना ते मुंबईस माझ्याकडे पाठवीत असत. त्या वेळी ‘‘आपल्याकडीलच खेड्यातला हा माणूस मुंबईत स्थीर बनलेला आहे. व्यवहारचतुर आहे. बाबूरावांचे कर्तृत्व आपण ओळखले पाहिजे. तुम्ही त्यांचा जरूर लाभ घ्या.’’ असे सांगत असत. माझी त्यांची भेट झाली की त्यांनी ज्यांना माझ्याकडे पाठविलेले असेल त्यांच्याबद्दल चौकशी करीत असत. मी मुंबई महापालिकेचा महापौर झालो त्या वेळी यशवंतरावांनी दिल्लीहून फोन करून माझे अभिनंदन केले.

माथाडी कामगारांचे नेते आण्णा पाटील यांचे निधन झाल्याचे समजताच ते दिल्ली येथून मुंबईस आले आणि आण्णा पाटील यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी आवर्जून उपस्थित राहिले. प्रसंग सुखाचा असो वा दु:खाचा असो त्या त्या वेळी उपस्थित रहावयाचे हा कटाक्ष त्यांनी आयुष्यभर पाळला. राजकारणात वावरणारे यशवंतराव मोठ्या मनाचे मानव ‘‘माणूस’’ असलेले मुत्सद्दी होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org