मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १३८-४

पण मग कसं कोण जाणे एक दिवस साहेबांनीच मला गळ घातली, ‘‘पाळणा म्हणायचा आक्काताई!’’ म्हणताना मी ‘आ’ वासून त्यांच्याकडून आलेल्या फोनकडे पाहिलं तशी वेणूताई बोलून गेल्या, ‘‘आत्याबाई आहात ना? बाळाचं नाव ठेवायचंय!’’ ... मला एकदम समजेनाच त्यांचं हे टेलिफोनवरचं बोलणं! राहिले गप्प गप्प! उत्तरच केलं नाही!

तेवढ्यात आमचे जी. डी. पाटील गाडी सोडून आले न् मधुकरराव चौधरींच्या बाळाचं नाव ठेवायला मला मुंबईला घेऊन गेले! .. ही मंडळी तेव्हा साहेबांच्या मंत्रिमंडळातील ना? आणि मी ‘कॅबिनेट सिस्टर!’ गेले तर सगळे एकत्र जमलेले. बारशाचा थाट उडून गेलेला. बाळलेणी मांडून ठेवलेली. पाळणा सुगंधी फुलांनी सजविलेला. सगळी नटून थटून हजर!

‘‘नाव काय ठेवायचं?’’ मी सहजीच विचारलं. तर वेणूताई बोलून गेल्या, ‘‘ते तुम्हीच सांगायचं. आम्ही फक्त तुमच्या तोंडात पेढा घालून पाठीत बुक्क्या घालणार!’’

बापरे! मी कुठं काही विचार केलावता? गेले गडबडून तर साहेब लांबून बोलले, ‘‘आवरा लौकर. आम्हाला मीटिंग आहे. आणि लेखकाला कशाला हवा एवढा विचार? चट्कन सांगून टाका न् म्हणा पाळणा, एकदम सातारी!’’.. त्यासरशी मागचा पुढचा विचार न करता बाळाचं नाव मी ‘शिरीष’ ठेवलं न् आमच्याकडे बारीक मोतीराम म्हणतात तो पाळणा म्हटला! ..

‘‘भले शाब्बास!’’ साहेबांनी पाठीवर शाबासकीची माया थापली. ते निघून गेले न् मग आम्ही सगळ्या बसलो गप्पागोष्टी करीत. सगळ्यांनी उखाणा घालीत नाव घेतलं. वेणूताई मुख्य यजमानपदी, तर त्यांनी लाजत मुरकत प्रारंभ केला, ‘‘पाची पांडव साध्वी धुरपती, यशवंतरावांसारखे मिळाले पती तर देवा तुमचे आभार मानू किती’’ ...सगळ्यांनी टाळ्या पिटल्या. पाठोपाठ सगळ्यांनी लाह्या फुटाव्यात तशी ‘‘नावं’’ घेतली... बारसं मग जेवण खाण होत मस्तपैकी रंगलं... आनंदी आनंद झाला... साहेबांनी आपल्या नेत्रांच्या साक्षीनं भरभरून कवतिक मांडलं.. माझ्याकडून नवीन कविता म्हणून घेतल्या... ‘‘आक्काताईला साडी द्या वेणूबाई’’ म्हणाले न् मग जो हशा पिकला की, विचारू नक्का!...साहेब देखील खळखळून हसले...

साहेब खरंच मोठा गुणाचा, अगत्याच्या विचारपुशीचा माणूस. कोणा एकाचं काही आवडलं की, दाबून कवतिक मांडणार. स्वत: लिहिलेल्या पत्रानं आपली आवडनिवड कळवणार. प्रत्येकाचा वडीलधारा होणार. उत्तेजनाची थाप पाठीवर टाकीत ‘आगे बढो’ म्हणणार. अशा वेळी त्यांच्यातला गुणग्राही रसिक खडबडून जागा होणार.

आमच्या बाबतीत मागं एकदा अशीच वेळ चालून आली. त्या वेळी मी फलटणच्या राणीसाहेबांच्या आग्रहाखातर विकास योजनांचे संदर्भात एक कविता लिहून दिलेली. तर साहेब फलटणला आल्यासरशी त्यांच्यापुढं मुलींनी ती गाऊन दाखविलेली. साहेबांना ती कविता त्या वेळी एवढी आवडली की, रातोरात खास दूताकरवी त्यांनी मला आपला अभिप्राय स्वत:च्या हस्ताक्षरात कळविला –

भल्या पहाटेला हे पत्र घेऊन माणूस आला तशी काय वाटलं कसं सांगू? ‘‘भाऊ असावा तर असा’’ हा विचार मनात घोळला न् मी घरातल्यांशी बोलून गेले, ‘‘साहेब, स्वत: लेखन का नाही करीत? त्यांनी लिहिलं तर लोक त्यांचं पुस्तक डोक्यावर घेऊन नाचतील!’’ त्या वेळी आमच्या कुटुंबानं तसा ठराव पास केला. साहेब पुन्हा भेटले रे भेटले की, त्या ठरावाची प्रत सदैव वाचली गेली... आमच्या त्या तगाद्यातूनच मग ‘होय’ ‘नाही’ करीत ‘कृष्णाकाठ’ चा जन्म झाला!

साहेबांची जिद्द तशी दांडगी. मनावर घेतलं की, ठरली गोष्ट करणार म्हणजे करणारच! मग काही होवो. पण आमचा हा भाऊ तसा फार हळवा. माणसांचा लोभी. इष्टमित्रांच्या सहवासाला हपापलेला. मतभेदांच्या पोटी रागावेल, चिडेल, संतापेलही. पण मनाचा दिलदार. सुप्पाएवढ्या काळजाचा. आभाळाएवढ्या मायेचा. तर त्यातलं सगळं ठाकठीक राहावं म्हणून आमची कधी कधी तारांबळ उडायची!

एकदा मोठा विलक्षण गंभीर प्रसंग उभा राहिला. साहेबांचं न् बाळासाहेब देसार्इंचं कडाक्याचं भांडण झालेलं!... एकमेकांचं बोलणं भाषण एकदम बंद! कारणंबिरणं हरी जाणे! पण कुणालाच चैन पडेना. हे मेतकूट जमवायचं कसं? वेणूतार्इंनी विचार केला. मला बोलावून घेतलं न् म्हणाल्या, ‘‘मोठ्या दिराला बोलावून घ्या. साहेब पार्लमेंटमध्ये असू देत. तेवढ्या वेळात येवून जा म्हणावं. लावा फोन.’’

बापरे! केवढं अवघड काम? पण आमच्या किसनवीर आबांनी दिलेला अत्तराचा फाया कानातून काढून वेणूतार्इंच्या न् माझ्या हाताला माखला. फोनलाही लावला! मग फोन करून बाळासाहेब देसार्इंना रातोरात या म्हटलं.’’ गळ घातली. मेहेरबानही ठरल्या वेळी आले!...

साहेब पार्लमेंटकडे गुंतले असताना बाळासाहेब वेणूताईकडे जाऊन भेटले. काय बोलणं झालं देवाला माहीत! पण दोघेही हुंदक्यानं दाटले असावेत असा अंदाज आला. दीरभावजय जेवले खावले. बोलले बसले. ब-याच वेळानं जेवायला म्हणून साहेब न् मी घरी आलो तर पाहताक्षणीच बाळासाहेब न् साहेब क्षणार्धात एकमेकांच्या मिठीत विसावल्याचं भाग्य साक्षात आम्हाला दिसलं!... तीच गोष्ट पुढं काही दिवसांनी अशी मध्यंतरी वसंतदादांच्या न् साहेबांच्या बाबतीत घडून गेली... अंकलखोपला दोघांची दिलजमाई झाली. महाराष्ट्राला या मित्रांचा भरभक्कम आधार मिळाला!...

त्या वेळी तर आम्ही आपापल्या घरी. पण हे कळलं मात्र न् असा ब्रह्मानंद झाला की, त्यापुढं इंद्राघरचं वैभव पार फिक्क फिक्क पडून जावं!...

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org