मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १२८-१

उक्ती आणि कृती यांचा प्रत्यक्षात मेळ घालणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून या काळात यशवंतराव सर्वत्र गौरविले गेले. याचे कारण स्पष्ट आहे. मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी जेव्हा महाराष्ट्राची धुरा स्वीकारली तेव्हा, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी नेमके काय करावे लागणार आहे, महाराष्ट्रासमोर प्रमुख समस्या कोणत्या, सरकारचे निर्णय आणि लोक यांच्यात फार मोठी दरी निर्माण होऊ नये, यासाठी काय करावयाचे आदी संबंधी स्वत: विचार करून आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी विचारविनिमय करून त्यांनी सर्वप्रथम राज्याची धोरण सूत्रे निश्चित बनविली. महाराष्ट्र हे ख-या अर्थाने लोकशाही राज्य बनावे हा या मुख्यमंत्र्यांचा हेतू होता. या धोरण-सूत्रांनुसार जेव्हा निर्णय होऊ लागले, विकासाचे कार्यक्रम निश्चित करून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली त्यावेळी ते निर्णय लोकांच्या दैनंदिन जीवनाला स्पर्शून जाणारे, चांगल्या अर्थाने स्पर्शून जाणारे, आणि लोकांना त्याचा वाजवी लाभ करून देणारे, त्यांचे जीवन सुसह्य ठरविणारे असेच हे निर्णय ठरले. शेती, शिक्षण, सहकार, उद्योग, विविध कला, साहित्य आणि प्रशासन या संदर्भात त्या काळात मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार यांनी केलेले निर्णय ऐतिहासिक ठरले. सांस्कृतिक आणि करमणुकीच्या क्षेत्रातले त्यांचे निर्णयही समाजाच्या या अंगाला उत्तेजन देणारे ठरले.

महाराष्ट्र राज्य हे सार्थ कल्याणकारी राज्य व्हावे या दिशेनेच यशवंतरावांची वाटचाल सुरू राहिली.

यशवंतराव हे स्वत: विचारवंत राजकारणी, मुत्सद्दी पुरूष होते. काँग्रेस पक्षाचे ते नेते होते. राजकीय क्षेत्रात राजकारण चालविण्यासाठी अनेक पक्ष असावे लागतात हे जरी खरे असले तरी यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी जो विचार सांगितला तो अत्यंत महत्त्वाचा विचार होता. पक्षोपक्षांच्या राजकारणाचा गोंधळ महाराष्ट्राला परवडणारा नाही या मुद्द्याचे विश्लेषण करताना त्यांनी सांगितले होते की, महाराष्ट्रापुढे फक्त एकच राजकारण आहे आणि ते म्हणजे सर्वांगीण विकास साधण्याचे राजकारण, महाराष्ट्रापुढे असलेल्या मुलभूत, सामाजिक आणि आर्थिक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने खटपट करणे हे महाराष्ट्राचे राजकारण होय, याच दृष्टिकोणातून या राज्याकडे सर्वांनी पहावे अशी त्यांची अपेक्षा होती, हाक होती.

हे अत्यंत उत्तम संसदपटू म्हणून यशस्वी झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ही गोष्ट आपणास जाणवली असेल विशेषत: १९५६-५७ साली राज्यामध्ये काँग्रेस पक्षाला नाममात्र बहुमत असताना आणि एका बाजूला सर्वश्री एस.एम.जोशी, उद्धवराव पाटील, आचार्य अत्रे, यांच्यासारखे धुरंधर पुढारी असताना त्यांनी ज्या पद्धतीने सदनाचे काम चालविले त्यावरून हे सिद्ध होते. आणि त्यानंतर अतिशय कठीण काळामध्ये ते देशाचे गृहमंत्री झाले. विशेषत: त्या काळामध्ये अनेक राज्यांमध्ये वेगळ्या पक्षांची सरकारे सत्तेवर आली होती. देशात अनेक समस्या होत्या.; त्याचबरोबर पूर्वेकडील राज्यांचा प्रश्न बिकट झाला होता. अरूणाचलसारखी छोटी राज्ये निर्माण झालेली होती. त्या काळामध्ये प्रभावी संसदपटू म्हणून ते गाजले. ते चांगले प्रशासकसुद्धा होते. त्यांनी देशाला स्वच्छ प्रशासन दिले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org