मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १२४-१

खासदार मगर यांचा सल्ला मला एकदम पसंत पडला. मी साहेबांना दिल्लीला पत्र लिहिले. त्यांचेकडून लागलीच पत्रोत्तर आले. त्यांनी मला दिल्लीला येण्याचा दिवस कळविला होता. मी दिल्लीला गेलो. त्यांना फोन केला, त्याच दिवशी एक रेसकोर्स रोडवरील आपल्या बंगल्यात रात्री दहाची वेळ मला दिली.-शांत व निवांत !

‘‘यशवंता, देव पाठीशी आहे’’ हे माझ्या आईचे वाक्य तिच्या जीवन कवितेतील ध्रुपद आहे.’’ साहेब सांगत होते, ‘‘क-हाडला टिळक हायस्कूलमध्ये मी होतो. सोळा वर्षाचं माझे वय. द्विवेदी नावाचे गुरूजी, महात्मा गांधींचे भक्त होते. ते आम्हाला शिकवताना देशभक्तांच्याही कथा सांगत. त्या वेळी आम्ही मुलांनी शाळेतील लिंबाच्या झाडावर तिरंगा झेंडा लावण्याचे ठरवले. ही कामगिरी मजवर सोपवण्यात आली होती. मी ती केली, इतकेच नव्हे तर आम्ही मुलांनी नंतर गावातून प्रभात पेâरी काढली. त्यात पोलिसांनी मला पकडले. क-हाडच्या पोलीस कोठडीत मला ठेवले होते. आपुलकीने गावातील काही मंडळींनी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची भेट घेतली आणि यशवंता लहान आहे त्याला आम्ही माफी मागायला सांगतो, तुम्ही त्याला सोडून द्या.’ अशी विनंती त्यांनी पोलीस अधिका-यांना केली. पोलीस अधिका-यांनी ती विनंती मान्य केली. पोलीस कोठडीत येऊन गावक-यांनी मला तसे करण्यास सांगितले. त्याच वेळी माझे बंधू, माझी आई विठाईला घेऊन पोलिस कोठडीत आले होते. मला पाहताच तिचे डोळे पाण्याने भरून आले. पाच-सात मिनिटे तिच्या तोंडून शब्दही फुटला नाही. कोठडीत मला भेटायला आलेले लोक मला माफी मागणीचा सल्ला देत असल्याचे तिच्या कानावर पडले. तेव्हा अशा स्थितीत ती मला म्हणाली, ‘‘यशवंता, तू चोरीबिरी काही केलेली नाहीस, माफी मागायची नाही, देव पाठीशी आहे.’’ आई घरी परत गेली. पुढे मला त्या गुन्ह्यात तुरूंगवासाची शिक्षा झाली. असे अनेक प्रसंग पुढे माझ्या आयुष्यात आले. दु:खाचे आले तसेच सुखाचे पण आले. दर वेळी त्या त्या प्रसंगी एकच वाक्य आई बोलत असे, ‘‘यशवंता, देव पाठीशी आहे.’’

असे ते सुखदु:खाचे अनेक प्रसंग साहेब मला सांगत होते. ते सांगता सांगता रात्रीचे बारा वाजून गेले होते. रात्री दीडपर्यंत आमची ती मुलाखत चालली होती. मुलाखत संपली तेव्हा काहीशा गद्गद्लेल्या प्रेममय आवाजात ते म्हणाले, ‘‘आईच्या आठवणी सांगणे ही एक पूजा आहे-पूजा आहे.’’

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org