मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १२१-१

साने गुरूजींच्या साधनेने जेव्हा कुमार कला विशेषांक सुरू केला तेव्हा महाराष्ट्र शासनाने मदतीचा हातभार लावला पाहिजे असे त्यांना वाटले व अंकाच्या हजार प्रती त्यांच्यामुळे प्रसिद्धी खात्याने घेतल्या. पण त्याचे वितरण करण्याऐवजी त्याचे गठ्ठे त्यांच्या कार्यालयात तसेच पडून राहिले ! त्याची मला चीड आली. मी यशवंतरावांजवळ आपली चीड व्यक्त केली व पर्याय सांगितला.

महाराष्ट्रातील मराठेतर माध्यमाच्या शाळा व महाराष्ट्राबाहेरच्या मराठी माध्यमाच्या शाळा यांना पोस्टाने पाठवल्याचे प्रमाणपत्र घेऊन माझ्या खर्चाने मी अंक पाठवायचे व शासनाने त्यांचे पैसे द्यायचे अशी ही योजना. यशवंतरावांना ती तर्कशुद्ध वाटली व त्यांनी तसे करण्याला संमती दिली, लेखी व्यवहार काहीच झाला नाही.

पुढे यशवंतराव दिल्लीला गेले आणि त्याचा फायदा घेऊन महाराष्ट्र शासनाचे प्रसिद्धी खाते पैशांबाबत घोळ घालून बसले. पुन्हा यशवंतरावांना भेटल्यावर ते काम मार्गी लागले.

दिल्लीला केंद्र सरकारात यशवंतरावांनी संरक्षण, गृह आणि अर्थ अशी महत्त्वाची खाती कार्यक्षमतेने सांभाळली आणि चांगला प्रशासक अशी आपली छाप बसवली.

अखेरच्या दिवसांत भारतीय लोकशाही व्यवहारामुळे ते चिंताक्रांत होते. लोकशाहीत साधनसुचितेला फाटा दिला की ती लोकशाही धनिकांकडे गहाण पडते, जातीची रखेली बनते आणि दादांची दासी होते. मग लोकशाहीचे कलेवर फक्त शिल्लक उरते. साधनसुचितेचे पुनरूज्जीवन व्हावे अशी त्यांना तळमळ होती.

स्वातंत्र्य आणि लोकशाही यांना केवळ राजकीय अंगच नसते तर सामाजिक अंगही असते आणि राजकारणाला इतके अप्रमाण महत्त्व चढल्यामुळे सामाजिक प्रश्नांची उपेक्षा होते याची खंत ते व्यक्त करत. त्यांनी ह्याच जाणिवेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र नॅशनल बुक ट्रस्टसाठी लिहायचे ठरवले होते, पण त्यांचा तो संकल्प कधीच पूर्ण झाला नाही.

त्यांची आत्मकथा ते लिहीत होते. त्यातील काही प्रकरणे वृत्तपत्रात आली तेव्हा मी त्यांना पत्र पाठवले. त्यांचे तत्काळ उत्तर आले आणि समग्र पुस्तक वाचून पुन्हा लिहावे असे त्यांनी लिहिले. ते त्यांचे अखेरचे पत्र.

यशवंतरावांजवळ कार्यकुशलता आणि कार्यक्षमता चांगलीच होती, पण त्यांच्या मनाने एक निर्णय घेतला होता आणि तो असा की अविकसित देशात शासन हे समाजबदलाचे एकमेव जरी नसले तरी प्रभावी साधन असते आणि शासकीय पक्षांबरोबर राहूनच आम्ही समाजकल्याण करू शकू. त्यामुळे १९४७ साली ते पार्लमेंटरी सेक्रेटरी झाले आणि चळवळीचा अस्त काळ सोडला तर सतत सत्तेवर राहिले. पण सत्तेचा कैफ त्यांनी चढू दिला नाही आणि सुजनता कधी सोडली नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org