मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ११७-२

मराठी भाषेवर, व साहित्यिकांवर त्यांचे प्रेम होते. अखंड वाचन हा त्यांचा छंद होता. ललित तसेच वैचारिक साहित्याची त्यांना आवड होती. प्रवासात, भले मोठे ग्रंथ त्यांचे सोबत असत. म्हणूनच, कोल्हापुरात, त्यांचे वि.स.खांडेकरांच्या साहित्यावरचे समीक्षणात्मक भाषण एवढे रंगले की त्याचे स्मरण अद्यापीही तसेच आहे. म्हणूनच ते साहित्य संमेलनात, सामान्य साहित्यप्रेमी म्हणून रस घेत. साहित्यिकांना हातभार लावण्यात आनंद मानीत.

मराठी इतिहास संशोधक, नाटककार, कवि कै.वासुदेवशास्त्री खरे यांचे वाङ्मय व लेख संग्रह जपले जावे, ते रद्दीमध्ये विकले जाऊ नयेत म्हणून त्यांनी अंदाजे दहा हजाराला, महाराष्ट्र शासनातर्फे, अधिका-यांचा सल्ला बाजूस सारून सर्व विकत घेण्याची व्यवस्था केली. कै.खरे शास्त्री यांचे चिरंजीव यशवंतराव खरे हे वृद्ध झालेले. आपल्यानंतर मुले हे साहित्य रद्दी म्हणून विकतील हे त्यांना भय होते. आर्थिक ओढग्रस्तीने त्यांना पैशाच्या मदतीची गरज होती. प्रस्तुत लेखकाने, मुख्यमंत्री यशवंतरावांचे कानावर ही वस्तुस्थिती घातली. कै.खरे शास्त्री यांची ‘‘जन्मभूमी’’ कविता ना.चव्हाणांना आवडली होती. मुख्यमंत्री म्हणून दौ-यावर असता, अगोदर कार्यक्रम ठरला नसताही मिरजेच्या रेस्ट हाऊसमध्ये ना.चव्हाण व यशवंतराव खरे यांची भेट घडवून आणता आली. खरे यांनी, यशवंतरावांना, काही ग्रंथ भेट म्हणून दिले. त्यानंतर पत्रव्यवहार झाला. एकेदिवशी शासकीय अधिका-यांची नकारात्मक तार आली. त्यानंतर ही वस्तुस्थिती नजरेस आणताच ना.चव्हाण यांनी चक्रे फिरवल्यावर कै.खरे शास्त्री यांचे सर्व साहित्य पुण्यास ३१ मार्च पूर्वी पोहोचविण्याची तार आली. त्यानुसार यशवंतराव खरे सारे ग्रंथ पुण्यास, शिक्षण संचालकाचे कचेरीत घेऊन गेले व चेक घेऊन परत आले. केंद्राचे महाराष्ट्रीय मंत्री जे करू शकले नाहीत ते, यशवंतराव चव्हाणांनी मनावर घेऊन केले. त्याने शास्त्रीबुवांच्या मुलांना, नातवांना आधार मिळाला व शास्त्रीबुवांचे सारे वाङ्मय जतन झाले. असे संपन्न, व्युत्पन्न व्यक्तिमत्त्वाचे यशवंतराव होते नि म्हणूनच, भारताच्या व महाराष्ट्राच्या आजच्या संक्रमणकालात त्यांच्यासारख्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी, सर्वांना जाणवते, सलते. त्यांच्या चरित्राचे ‘सागरतीर’ व ‘यमुनाकाठ’ हे खंडही अप्रकाशित , अलिखित राहिले याचीही बोच जाणवते. त्यांचे चरित्र लिहिले जात आहे; त्याच्या विधायक प्रवृत्तींना व विचारांना प्रगत करणारे स्मारक होत आहे. त्यातूनच यशवंतरावांचे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी महाराष्ट्रीयांनी, विशेषत्वाने पत्करली पाहिजे.

कारण: - अतो न रोदितव्यंहि

क्रिया: कार्या; स्वशक्तिश: ।।

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org