मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ११७-१

यशवंतराव, पार्लमेंटरी सेक्रेटरी, मंत्री, मुख्यमंत्री असे महाराष्ट्रात, व दिल्लीत संरक्षण, गृह, अर्थ, परराष्ट्र मंत्री व शेवटी उपपंतप्रधान अशा श्रेणीने वाढले. अभ्यासू, विचारवंत, मुत्सद्दी, साहित्यिक, नेते म्हणून त्यांनी राष्ट्रात व परदेशात नाव मिळवले. अशा मोठ्या पदावर झपाझप ते चढले तरी त्यांची सर्व सामान्याबाबतीत सक्रिय सहानुभूती, क्रियाशील माणुसकी अखंड जागी होती. अनेकांना सामान्यजनांना, ते उच्चपदी असताही कामाचे, अडचणीचे सत्यत्व व महत्त्व पटताच मदतीस धावत हा त्यांचा फार मोठेपणा आहे. हीच खरी सुसंस्कृतता आहे. प्रत्येक माणसाच्या पत्राचे उत्तर धाडीत ! हा विशेष, इतरांशी तुलना करता फार जाणवावा असाच आहे. उत्तरे स्वत:च्या सहीने शक्य तो धाडली जात !

पार्लमेंटरी सेक्रेटरी असता ते मिरजेत अधूनमधून रहात. ते स्टेशनवरच्या कोडोलीकरांच्या, बांधल्या जात असलेल्या घरी वास्तव्य करीत. त्यामुळे मिरजेच्या हवेत वेणूतार्इंची प्रकृती सुधारली, त्या ब-या झाल्या म्हणून मिरजेबाबत त्यांना कृतज्ञतेतून उद्भवलेली विशेष आपुलकी होती. मिरजेत मेडिकल कॉलेज होण्यास, ही आपुलकी उपयुक्त व प्रेरक ठरली.

याच काळात, प्रस्तुत लेखकाचा व त्यांचा संबंध आला तो अखंड तीस वर्षांहून अधिकाधिक वाढत गेला. पत्रकार व कार्यकर्ता म्हणून ते विश्वासाने व आदराने मला वागवीत. त्यांची भाषणे, त्यांच्या मुलाखती इंग्रजी मराठी पत्रांत योग्य रीतीने आली. त्यांचेविषयीचे लेख छापून आले की, गुणग्राहकवृत्तीने मनपसंतीचे त्यांच्या सहीचे पत्र आल्याविना राहात नसे. निरपेक्षवृत्तीने, वस्तुनिष्ठेने योग्य ते महत्त्व जाणून लेखन करणारा जबाबदार पत्रकार म्हणून ते उल्लेख करीत व विश्वासाने काम करवून घेत. दि.३ डिसेंबर १९५३ ला, त्यांचे सांगण्यावरून, ओगलेवाडीहून, श्री.पाध्ये यांची खालील तार प्रस्तुत लेखकास आली. – "Yeshwantrao Chavan desires your presence at Karad tomorrow morning for press conference."

या पत्रकार परिषदेला बाळासाहेब देसाईही उपस्थित होते. इंग्रजी, मराठी वृत्तपत्रात या पत्रकार परिषदेचा मजकूर व्यवस्थित आल्यावर, आभाराचे धन्यवादाचे पत्र आले. महाराष्ट्राचे अन्नमंत्री म्हणून शिधा पद्धती उठवणार हा निर्णयही त्यांनी प्रस्तुत लेखकास, ते इचलकरंजीस आले असता, विशेष मुलाखतीत सांगितला. तो मुंबईच्या पत्रांनी पहिले पानभर ठळक शीर्षकात छापला. या विश्वासामुळे ते विविध राजकीय घटना, त्यांची पाश्र्वभूमी समजावून देत. अर्थात ते कार्यकर्ता म्हणून घडे.

मिरजेत, रेस्ट हाऊसवर कार्यकर्त्याची एक महत्त्वाची बैठक भरली. वादग्रस्त, गरमनरम चर्चा होती. प्रस्तुत लेखक पत्रकारही असल्याने काही कार्यकर्ते संशयाने टवकारून पहात असल्याचे दिसताच, स्वत: यशवंतरावांनी भर सभेत खुलासा केला की-

-‘‘श्री. घोरपडे हे या सभेस कार्यकर्ते म्हणून हजर आहेत!’’ मला, सभेतून बाहेर जाण्यास न सांगता, भावनांची बूज राखून त्यांनी अशा सन्मानाने वागवले. हा त्यांचा दुर्मिळ व आगळा गुण अनेकदा अनुभवण्यास मिळे. प्रस्तुत लेखकाला एस.टी.बसचा अपघात होऊन १९६८ साली खुब्याचे हाड मोडल्याने, मोठेच संकट आले. त्या काळात भारताचे गृहमंत्री असलेल्या यशवंतरावांनी सक्रिय सहानुभूती स्वयंप्रेरणेने व्यक्त केली.

प्रस्तुत लेखकाने, त्यांच्या मातोश्री श्रीमती विठाबाई यांची मुलाखत घेऊन, यशवंतरावांना मातेने कसे घडवले याचे चित्र, मातेच्या शब्दात लेखरूपाने उभे केले. हा लेख प्रसिद्ध होताच त्यांनी आभाराचे पत्र धाडले. पसंती व्यक्त केली इतकेच नव्हे मृत्यूपूर्वी काही महिने भेटले असता, म्हणाले, मागचे कागदपत्र चाळीत होतो. तेव्हा तुमचा तो लेख व तुमची आठवण, नुकतीच विशेषपणे झाली.

मिरजेतील गेल्या पिढीतील नामवंत कायदेपंडित कै.भा.वा.मराठे यांनी घेतलेल्या कर्जापायी त्यांचे घरदार, लिलावास निघण्याची सूचना आली. तेव्हा प्रस्तुत लेखकाने त्यांना याबाबत, लक्ष घालून सहानुभूतीने प्रश्न सोडवण्याची विनंती केली असता, त्यांनी जप्ती त्वरेने थांबवली, एवढेच नव्हे तर सर्व ब्राह्मण वर्गाची म.गांधी वधोत्तराची कर्जे माफ करून, विशाल मनोवृत्तीची आपली राजवट असल्याचे प्रत्ययास आणून देऊन, सामाजिक सामंजस्य निर्माण केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org