मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ११५-१

श्री.यशवंतराव चव्हाण गरिबीतून जन्माला आल्यामुळे गरिबांसाठी सतत प्रयत्नशील राहिले. कारण त्यांना गरिबीची जाणीव होती. मोठमोठ्या पत्रकारांबरोबर आणि भांडवलदारी वृत्तपत्रांबरोबर त्यांचे संबंध जरी प्रेमाचे होते तरी त्यांनी छोट्या वृत्तपत्रांकडे सदैव आपुलकीने पाहिले, हे मी स्वानुभवाने सांगू शकेन. संरक्षणमंत्री असताना श्री.यशवंतराव चव्हाण यांनी ‘‘शिवनेर’’ साप्ताहिकाच्या दशवार्षिक उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहावे अशी त्यांना मी विनंती करता यशवंतरावजींनी ती मान्य केलीच पण या छोट्या पत्राच्या समारंभासाठीही दिल्लीहून १९६४ साली ते खास मुंबईला आले. शिवजंयतीच्या शुभमुहूर्तावर झालेल्या घोडपदेव येथील कामगार मेळाव्यात यशवंतरावजींचे आणि ‘‘लोकसत्ता’’ कार श्री.ह.रा.महाजनी यांचे भाषण झाले. त्या वेळी यशवंतरावांनी छोट्या वृत्तपत्रांबद्दल काढलेले उद्गार त्यांच्या लोकशाही मनाची साक्ष देणारे आहेत. श्री.यशवंतरावजी म्हणाले होते की, ‘‘अमेरिकेमध्ये ५०० प्रतींचा खप असलेल्या नियतकालिकांच्या मताचा सुद्धा विचार केला जातो आणि शासन अशाही पत्रांना आदराने वागविते असे सांगून त्यांनी ‘‘शिवनेर’’ ने केलेल्या ऐतिहासिक कार्याची आठवण करून सांगितले की, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सारी मराठी पत्रकार सृष्टी त्यांच्याविरूद्ध गेली असताना ‘‘शिवनेर’’ आणि ‘‘लोकसत्ता’’ ने या काळात यशवंतरावजींना दिलेला पाठिंबा ते विसरू शकत नाहीत. फुले, आंबेडकर, शाहू महाराजांच्या चळवळीतून निर्माण झालेले नवे नेतृत्व नव्या राज्यात देण्याची कामगिरी ‘‘शिवनेर’’ ने मोठ्या निष्ठेने केली हा विचार जेव्हा यशवंतरावजींनी व्यक्त केला. तेव्हा घोडपदेव येथे जमलेल्या हजारो लोकांनी टाळ्यांच्या गजरात यशवंतरावाच्या विचारांचे स्वागत केले.

चिपळूण येथे भरलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाला श्री.यशवंतराव चव्हाण अगत्याने आले होते. त्या प्रसंगी त्यांनी केवळ भाषणच केले नाही तर पत्रकारांबरोबर मनमोकळेपणाने गप्पाही मारल्या. त्या वेळी महाराष्ट्रातील तमाम ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकार उपस्थित होते आणि त्या सर्वांचे समाधान करणारी उत्तरे यशवंतरावजी मोकळ्या मनाने पण तल्लखपणाने देत होते. यशवंतरावजी पत्रकारांबरोबर बोलताना आणि वागवताना इतका समंजसपणा दाखवीत असत की, स्वत:ला विचारवंत म्हणविणारे बुद्धिवादी पत्रकार यशवंतरावजींच्या विचारामुळे दिपून जात असत. असे जरी असले तरी, ‘‘लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा’’ या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे लहान पात्रातील महान विचारांचाही ते नेहमीच आदर करीत असत. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जरी त्यांना ‘‘शिवनेर’’ ने संपूर्ण पाठिंबा दिला तरी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण होताच त्यांच्याविरूद्ध एक सणसणीत अग्रलेख मी लिहिला. त्या वेळी शिवनेर साप्ताहिकाचा प्रसार फार झालेला नव्हता, परंतु जेव्हा त्यांनी ‘‘शिवनेर’’ मधील टीका वाचली तेव्हा त्यांनी माझ्या घरी खास दूत पाठवून मला बोलावून त्यासंबंधी चर्चा केली. वास्तविक त्या वेळी ‘‘शिवनेर’’ चा प्रभाव लोकमतांवर पडण्याइतका त्याचा खपही नव्हता तरी पण यशवंतरावजींनी मला बोलावताच मी त्यांना विचारले, ‘‘माझ्या या अग्रलेखाची आपण एवढी दखल का घेतली?’’ त्याबरोबर यशवंतरावजींनी दिलेले उत्तर त्यांच्या बहुजन समाजासंबंधी असलेल्या आत्मीयतेची साक्ष पटविणारे होते. यशवंतरावजी म्हणाले, ‘‘एकवेळ ‘टाईम्स ऑफ इंडिया’ मध्ये काय आले याला मी महत्त्व देणार नाही, पण ‘‘शिवनेर’’ सारख्या लहान वृत्तपत्रातून आलेल्या विचारांचा विचार मला केलाच पाहिजे. यशवंतरावजींच्या त्या विचारांचा प्रभाव माझ्यावर नेहमीच पडल्यामुळे मी माझ्या विचारांपासून आजपावेतो ढळलेलो नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org