मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ११३ -१

नव्या जीवनाचा नाद
मला ऐकू येत आहे
लक्ष शून्यातून
काही श्रेय आकारत आहे

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर यशवंतरावांनी ग्रामीण व शहरी या दोन्ही समाजांच्या मनाची पकड घेतली. सहकारी साखर कारखान्याचा प्रयोग पूर्वीच सुरू झाला होता, पण तो एकुलता एक होता. यशवंतरावांनी सरकारी धोरण म्हणून अशा साखर कारखान्यांची योजना आखली व ती पार पाडण्यासाठी सरकारी यंत्रणेचे पाठबळ उभे केले. नंतर या क्षेत्रात काही अपप्रवृत्ती निर्माण झाल्या ख-या, पण तसा विचार केला तर त्या अनेक क्षेत्रांत झाल्या व होऊ शकतात. तथापि सहकारी साखर कारखानदारीने राज्याच्या काही ग्रामीण भागात मोठा उत्पादक व्यवसाय सुरू झाला. नवे रचनात्मक कार्य झाले. नवे कार्यकर्ते व पुढारी तयार झाले आणि ते काही कोटींचा व्यवहार करू लागले. सहकारी बँका, उपसासिंचन इत्यादींची वाढ हीसुद्धा रचनात्मक होती. यातून शिक्षणाच्या प्रसारास वाव मिळाला. शाळा व महाविद्यालये यांची संख्यावाढ झाली. ज्या भागात व समाजात शिक्षणाचा वारा लागणे शक्य नव्हते तेथे तो पोहोचला. हे एक सामाजिक परिवर्तन होते, त्यास चालना देण्याचे कार्य यशवंतरावांच्या धोरणामुळे झाले. जिल्हा परिषदांमुळे विकेन्द्रीकरण झाले. तीही गरज होती. मराठवाडा व शिवाजी या दोन विद्यापीठांच्या स्थापनेच्या मागे यशवंतरावांची प्रेरणा होती. या सर्वांचा गुणात्मक दर्जा वाढावयास हवा हे मान्य असले तरी प्रारंभ होणे अत्यावश्यक होते. हे फार मोठे महत्त्वाचे काम यशवंतरावांमुळे झाले. साहित्य-संस्कृती मंडळाची स्थापना, येथे साहित्य व संस्कृतीला वाव मिळावा, नव्या शास्त्रीय विचारांचा प्रसार व्हावा, यासाठी झाली. यशवंतराव मुख्यमंत्री होते तेव्हा सर्व खात्यांचे सचिव मुख्यमंत्र्यांचे बोलावणे येताच यथायोग्य माहिती पुरविण्यासाठी तत्पर असत. त्यांच्या मुख्यमत्र्यांबरोबर ठरावीक अंतराने भेटी होत.

यशवंतरावांनी तात्यासाहेब केळकरांच्या संबंधात जे सुंदर भाषण केले होते त्यातील केळकरांच्या मध्यममार्गी धोरणाबद्दलचे विवेचन काही प्रमाणात यशवंतरावांनाही लागू होते. काही प्रमाणात म्हणण्याचे कारण असे की, तात्यासाहेब कधी सत्तास्थानावर होते? पण सत्तेच्या राजकारणात त्यांच्या वृत्तीचा कल मध्यममार्गी होता. यशवंतराव तात्यासाहेबांबद्दल लिहितात, ‘‘दुस-यांच्या म्हणण्यातील तथ्य ते मान्य करीत...ते एकांतिक विचाराचे नव्हते, व्यवहारी व मध्यममार्गी होते...केळकरांची मध्यममार्गावर जी श्रद्धा होती त्यामागे एक तर त्यांचे त्याला अनुकूल असे सौम्य व बुद्धिवादी व्यक्तिमत्त्व होते आणि दुसरे, अनुभवी व्यवहारवाद होता. केळकरांनी मध्यमक्रमासंबंधी जे विवेचन केले आहे त्यात म्हटले होते की, मध्यमक्रम, म्हणजे निखालस वाईटाशी समेट किंवा तडजोड असा नाही, तर जे सामान्यत: चांगले म्हणून समजले जाते त्याचीच मर्यादा शोधून तारतम्याने जे युक्त वाटेल, त्याचे आचरण म्हणजे मध्यमक्रम होय. ‘‘सदगुण्याच्या आचरणातही तारतम्याने सुचविणारे मर्यादादर्शन’’ असे त्याचे शास्त्रीय वर्णन केळकरांनी केले आहे...‘‘ भावना जेव्हा उद्दीपित होतात तेव्हा अशा वृत्तीच्या लोकांची उपेक्षा होते, तशीच ती केळकरांची झाली.’’ असे यशवंतरावांनी समर्पक रीतीने सांगितले.

शेवटी मनाने व शरीराने यशवंतराव खचले होते. प्रथम डोंगरे, नंतर किसन वीर आणि अखेरीस वेणूताई यांच्या निधनाने, त्यांच्या मनावरील जखम अधिकाधिक खोल होत गेली. आपल्या सार्वजनिक जीवनात इतके सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व असलेला नेता सहजासहजी भेटणार नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org