मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १०७-१

काँग्रेस अधिवेशनाचे मंडपावर मोर्चा सीमावासियांचे गा-हाणे काँग्रेस श्रेष्ठींच्या कानावर घालण्याचे ठरले. मोर्चाचे नेतृत्व क्रांतिवीर नाना पाटील यांनी करावी असे ठरले. या मोर्चासाठी महाराष्ट्रातून पाच हजारांवर कार्यकर्ते जमले होते. मोर्चा मंडपावर गेला असता तर प्रसंग बाका होता. अश्रूधूर, लाठीमार व प्रसंगी गोळीबार होण्याचा धोका होता. सीमा प्रश्नाची निकड साहेबांना होतीच. पण हा प्रश्न कडवटपणा निर्माण न करता सुटावा. प्रत्येक प्रश्नाची जाणीव व्हावी त्यासाठी मोर्चादेखील निघावा पण भलतेसलते वळण लागू नये अशा बिकट मन:स्थितीत साहेब होते.

डोळ्यात गेलेला काचेचा कण धसमुसळेपणाने न काढता तो मोरपिसाने काढावा ही साहेबांची राजनिती. आणि मोर्चा निघण्याचे आदले दिवशी साहेब केसरी कार्यालयात अचानक आले. श्री.जयंतराव टिळक यांची भेट घेतली. दोन नेत्यांचे बोलणे, विचारविनिमय झाला. मोर्चा काढण्याबद्दल एक मत झाले पण हा मोर्चा संभाजी पुलाजवळ पोलिसांनी अडवावा व मोर्चातील लोकांनी अतिप्रसंग न करता काही तास धरणे धरून बसावे असे मनोमन ठरले. ठरल्याप्रमाणे मोर्चा निघाला. तो पुलाजवळ पोलिसांनी अडविला. दुसरे दिवसाचे वर्तमानपत्रांत मोर्चाची छायाचित्रे व वृत्तांत ठळकपणे छापून आला. तो काँग्रेस श्रेष्ठींनी पाहिला. साहेबांनी मोर्चाला चतुराईने मूक संमती दिली व महाराष्ट्रातील राजकीय कार्यकर्ते कसे संयमी लोक आहेत याचे दर्शन झाले. न्याय्य मागणीला डावलावयाचे नाही पण तो चिघळू द्यावयाचा नाही हा साहेबांचा संयमी व लोकशाही प्रेमाचा चतूर मुत्सद्दीपणा.

संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या लढ्याचे महाभारत झाले. मध्यंतरीच्या काळात साहेब द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री झाले. अनेक वेळा त्यांना तारेवरची कसरत करावी लागली पण तोल सुटला नाही. इंदिरा गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्यावर त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला व मुंबईसह महाराष्ट्र व्हावा अशी त्यांची खात्री झाली. साहेबांनी हे ठरलेले दिल्लीला जाऊन पं.नेहरूंना आता द्विभाषिक डावलणे अवघड आहे असे सांगितले. दिल्लीत गेल्यावर त्यांनी  श्री.मोरारजीभाईची भेट घेतली नाही असा बराच बोभाटा झाला होता. खरे खोटे देवाला माहीत. पुढे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला. साहेब मुख्यमंत्री झाले व त्यांनी चळवळीत धारातीर्थी पडलेल्या हुतात्मा स्मारकाला पुष्पहार घालून वंदन केले. वार्ताहर म्हणून अनेक दौ-यातून त्यांच्याबरोबर हिंडलो. जवळून पाहात आलो. अंतरंगात शिरून गूढ मनाचे धागेदोरे समजलो. पुण्यातील वार्ताहरावर तर त्यांचे भारी प्रेम. महत्त्वाची वार्ता साहेब पुण्यातील वार्ताहर परिषदेत सांगत. त्याबद्दल तर ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी तक्रारी केल्या. कदाचित साहेबांच्या दोन ओळींमधील गर्भीत अर्थ पुण्यातील वार्ताहरांना कळत असावा.

साहेबांच्या यशस्वी जीवनात सौ.वेणूतार्इंचे स्थान फार मोठे आहे. मुंबईला सह्याद्री बंगल्यावर एकदा निवडणुकीच्या याद्या तयार होत होत्या. महाराष्ट्रातून शेकडो कार्यकर्ते तेथे जमले होते. आलेल्या कार्यकर्त्याचे स्वागत स्वत: वेणूताई करीत. कुणाला चहा फराळ मिळाला की नाही हे जातीने पाहात. अनेकांच्या घरची विचारपूस करीत. जुन्या आठवणींना उजाळा देत हास्यविनोद करण्यात वेणूताई रात्रंदिवस कष्ट घेत. त्या वेणूताई नव्हे तर महाराष्ट्राची मोठी आईच!

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org