मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १०६-१

ग्रामीण भागात शाळा-कॉलेज सुरू करण्यास प्रोत्साहन देऊन शेतक-यांच्या, कामगारांच्या, दलितांच्या मुलामुलींना शिक्षण घेण्याची संधी प्राप्त करून दिली. चव्हाणांचा दृष्टिकोण विशाल होता. बैठक उदारमतवादी होती, कामाचा उरक दांडगा होता. आपल्या सहका-यांना ते जवळ घेत, शिकवत-सांगत. त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींशी, कर्तृत्ववान मंडळींशी संपर्क ठेवीत, त्यांच्याशी सुसंवाद साधीत. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी या मंडळींचाही उपयोग करून घ्यायला हवा ही त्यांची दृष्टी होती. म्हणूनच टाटा, बिर्ला, मफतलाल, गोदरेज, किर्लोस्कर, चौगुले, गरवारे, यांसारख्या कारखानदारांना त्यांनी महाराष्ट्रात उद्योगधंदे उभारण्यास, वाढविण्यास प्रवृत्त केले.

यशवंतराव कमी बोलत. चर्चेत, सभेत आणि सभागृहातही वृत्तपत्र प्रतिनिधींशीही आवश्यक तेवढाच संपर्क ठेवीत. पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमध्ये खासदारांच्या घोळक्यात बसून गप्पा-टप्पा करणे त्यांना आवडत नसे. उत्तर प्रदेश, बिहारचे खासदार विचारायचे, ‘‘ काय रे तुझा साहेब असा सुस्त का वागतो ! आमच्यात येऊन बसत नाही, चहा घेत नाही.’’ मंत्र्यांना उत्तर द्यायचो, ‘‘येथे वृत्तपत्रांचे प्रतिनिधी हजर असतात आणि ते आपल्या वृत्तपत्रांतून काहीही बातम्या-अफवा प्रसिद्ध करतात म्हणून साहेब दूर राहतात.’’ आणि खरोखरच अशी वस्तुस्थिती होती. सेंट्रल हॉल म्हणजे हितसंबंधी मंडळींचा राजकारणाचा अड्डा-ठिय्या. असले राजकारण करणे चव्हाणांच्या स्वभावात नव्हते. लोकसभागृहात उत्तरे देताना किंवा बोलताना चव्हाण कधी रागावत-चिडत-ओरडत नसत. शांत-संथ प्रवाह जसा पुढे पुढे जातो तशी ओघवती भाषा. साहेब म्हणायचे, ‘‘पार्लमेंटमध्ये काम करताना गृहावर प्रेम करावे लागते, राग-रूसवा दूर ठेवावा लागतो.’’ गृहाला त्यांचा दरारा असे, त्यांना कोणी कधी ठोकरलेले मला आठवत नाही.

माझ्यावर त्यांनी केलेले प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. १९५९ मध्ये राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांच्या समवेत पत्रकारांच्या तुकडीबरोबर मी रशियाला जावे असे निमंत्रण दिल्लीहून मला आले. चव्हाणांची इच्छा होती मी जावे म्हणून.

तथापि वृत्तपत्र नुकतेच सुरू केले होते आणि अडचणी खूप होत्या म्हणून मी नम्र नकार कळविला. साहेबांना वाईट वाटले. पुढे १९६२ मध्ये मला अमेरिका भेटीचे निमंत्रण आले. मी मुंबईला जाऊन साहेबांच्या कानावर घातले. त्यांनी मी काही बोलायच्या आधीच पासपोर्टच्या व कपड्यांची तयारी करा असे सांगून श्री.डोंगरे यांच्याकडून माझ्या पासपोर्टची व कपड्यांची व्यवस्था केली. त्यानंतर ब्रिटन, जर्मनी, जपान, रशिया आदी देशांना मी वेळोवेळी भेटी दिल्या. या प्रत्येक वेळी यशवंतरावांनी मला उत्तेजन व प्रोत्साहन दिले. माझ्या प्रवासवर्णनांचे कौतुक केले. ‘‘विशाल सह्याद्री’’ वृत्तपत्र चालविताना येणा-या लहानसहान अडचणींची ते दखल घेत, मार्गदर्शन करीत व मदतही करीत. पुण्यात एक दैनिक पत्र चांगले चालते, त्याची स्वत:ची इमारत होते, लोकांत वृत्तपत्र प्रिय होते याचा त्यांना आनंद व अभिमान वाटायचा.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org