शब्दाचे सामर्थ्य ९७

भारताच्या राजकीय जीवनात जनआंदोलनांनी देशाला बरेच नवे नेते दिले. १९३० च्या आंदोलनाने काकासाहेब गाडगीळ महाराष्ट्राला मिळाले आणि त्यानंतरच्या पंधरा-वीस वर्षांत महाराष्ट्राचे ते कर्ते राजकीय नेते होते व अखेरपर्यंत एक वडिलधारे मान्यवर म्हणून त्यांची बूज राहिली. १९३० साल हे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दृष्टीने फार महत्त्वाचे यामुळे आहे की, या आंदोलनाच्या काळात महाराष्ट्र काँग्रेस ख-या अर्थाने ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचली. काँग्रेसचे नाव व गांधीजींबद्दलचा पूज्यभाव ग्रामीण जनतेपर्यंत यापूर्वीच पोचला होता, परंतु सक्रिय त्यागपूर्वक भागीदारी करण्यासाठी ग्रामीण भागातील तरुण या वेळी प्रथम फार मोठ्या संख्येने पुढे आला व एका अर्थाने काँग्रेसचा कायापालट झाला. हा राजकारणात झालेला महत्त्वाचा बदल ज्यांनी प्रथम हेरला, अशांपैकी काकासाहेब प्रमुख होते. जातीयवादाने पछाडलेल्या जुन्या राजकारणाला नवीन आरोग्यदायी वळण दिले पाहिजे, असा विचार व प्रयत्‍न करून जनमनापर्यंत पोचणा-या पहिल्या पुढा-यांपैकी काकासाहेब एक आघाडीचे पुढारी होते. नागरी विभागातही महत्त्वाच्या असलेल्या तरुण वर्गाचे महत्त्व जाणून, त्यांना संघटित करण्याची दूरदृष्टी त्यांना होती. १९३० नंतर ग्रामीण शेतकरी व शहरांतील तरुण या सर्वांना हवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व काकासाहेबांच्या रूपाने साकार झाले, ही एक महत्त्वाची घटना मानावी लागेल. या पूर्वीच्या पाच-पंचवीस वर्षांच्या काळात ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीची पार्श्वभूमी महाराष्ट्राच्या राजकारणाला होती. ती पुसट करून, त्या जागी एक नवे समजुतीचे व बंधुभावाचे नवीन चित्र रेखाटण्याचे काम करावयाचे होते आणि हे काम साकार करण्याचे ऐतिहासिक श्रेय श्री. काकासाहेब गाडगीळ व केशवराव जेधे या महाराष्ट्राच्या नेतेद्वयाला द्यावे लागेल. श्री. काकासाहेब गाडगीळ व तात्यासाहेब जेधे यांची राजकारणात जोडी होती. या दोघांनी महाराष्ट्राच्या शहराशहरांतून व ग्रामीण भागातून शेकडो सभा एकत्र केल्या आणि राष्ट्रीय विचारांच्या नव्या शक्तीचे पोषण होईल, असे वातावरण महाराष्ट्रात तयार केले. महाराष्ट्राचा राजकीय व सामाजिक इतिहास पुढेमागे कोणी लिहिला, तर त्यांना तात्यासाहेब जेधे व काकासाहेब गाडगीळ या दोघांच्या कार्याची दखल घेतच पुढे जावे लागेल, इतके हे महत्त्वाचे कार्य आहे.

स्वतःच्या वाणीच्या शक्तीवर आत्मविश्वास असलेला त्यांच्यासारखा राजकीय पुढारी क्वचितच पाहण्यास मिळतो. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे १९३४ साली त्यांनी जिंकलेली मध्यवर्ती असेंब्लीची महाराष्ट्रातील निवडणूक. त्या वेळी असेंब्लीचा मतदारसंघ उत्पन्नाच्या अधिकाराने मर्यादित केलेला होता. आजच्या परिभाषेत बोलावयाचे म्हटले, तर श्रीमंत शेतकरी, सरदार, महाराजे आणि सावकार, व्यापारी यांचाच हा मतदारसंघ होता, असे म्हटले, तरी चालेल. या मतदारसंघापुढे राष्ट्रीय विचार मांडण्याच्या स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून त्यांनी ही निवडणूक लढविली. असंख्य कार्यकर्ते प्रचार करीत होते. महाराष्ट्रातील मानसिक अवस्था जातीयवादाला फारशी अनुकूल नव्हती. या दोन जमेच्या गोष्टी सोडल्या, तर निवडणूक लढविणे अवघड होते. निवडणुकीची साधने कमी होती. विरोधी शक्ती सुसंपन्न व सुसंघटित होत्या, परंतु लोकमताला कौल लावून, आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या सामर्थ्यावर लोकशिक्षण करीत-करीत त्यांनी असे एक वातावरण निर्माण केले, की त्यामुळे पारिजातकाच्या फुलांचा सडा पडावा, तसा मतांचा सडा पडला आणि त्यांनी जे भविष्य वर्तविले होते, ते खरे करून दाखविले. स्वातंत्र्यपूर्व काळातील ही निवडणूक म्हणजे एक ऐतिहासिक लढाई होती, असे म्हणावे लागेल. कुशल सेनानी लढाईची रणनीती जशी आखतो, तशी रणनीती आखून निवडणूक कशी लढावी व जिंकावी, याचा तो एक अविस्मरणीय नमुना होता.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org