शब्दाचे सामर्थ्य ९३

प्रत्यक्ष संघर्षाच्या काळातील आमच्या भेटीगाठी मला नेहमी आठवतात. त्या वेळी बहुधा रोज दोनदा तरी शास्त्रीजींना मी भेटत असे. त्यांना परिस्थितीची कल्पना देत असे. आलेल्या अडचणींची, प्रश्नांची चर्चाही होई. त्यांचे मार्गदर्शन मोलाचे वाटे. 'सावधपण' (सर्वांविषयी) हे शास्त्रीजींचे वैशिष्ट्य. त्यांचा माणसांचा अनुभव मोठा, पारखही तशीच अचूक. त्यामुळे शास्त्रीजींच्या अनेक बारीक सूचना उपयोगी ठरत. त्या काळातल्या सगळ्याच आठवणी सांगणे शक्य नाही. पण एक सांगतो.

काश्मीर-आघाडीवर परिस्थिती गंभीर झाली होती. मी माझ्या सचिवालयातील कचेरीत होतो. तिथे हवाई व सेना दलाचे अधिकारी माझ्याकडे घाईने आले आणि त्यांनी सांगितले,

'प्रसंग बाका आहे, शत्रू पुढं सरकतो आहे. त्याचा वेगही काळजी उत्पन्न करणारा आहे. आता त्याला अटकाव करण्याचा मार्ग एकच आणि तो म्हणजे विमानांतून बाँबफेक सुरू करणे. त्यासाठी आपली व पंतप्रधानांची संमती हवी आहे.'

ती वेळ संध्याकाळची होती. सेनापतींना माझा निर्णय अक्षरशः पाच-दहा मिनिटांत हवा होता.

क्षणभर विचार केला. निर्णय घेणे तर आवश्यक होते. पंतप्रधानांची भेट घेऊन, चर्चा करून सर्व करावयाचे, म्हणजे त्यात अर्धा तास तरी गेला असता. तेवढा वेळही नव्हता. शेवटी विचार केला आणि सेनापतींना सांगितले, 'गो अहेड!'

हा आदेश देऊन झाल्यानंतर काही वेळाने शास्त्रीजींना भेटायला गेलो. त्याच दिवशी सकाळी मी परिस्थिती बिकट आहे, हे सांगितलेच होते. संध्याकाळी गेलो, तेव्हा मी म्हटले,
'काश्मीर आघाडीवर परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. मी आपल्या हवाई दलाला बाँबहल्ल्याचा हुकूम दिला आहे.' हे सांगितले आणि शास्त्रीजींची प्रतिक्रिया पाहू लागलो.

एकच वाक्य त्यांनी उच्चारले, ते म्हणाले,
'अच्छा किया!'
मला अर्थातच फार बरे वाटले, मनावरचे मोठे ओझेही हलके झाले. कारण, एक फार महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या समितीची बैठक घेऊन शास्त्रीजींनी त्यांची संमती मिळविली.

या सर्व युद्धकाळात शास्त्रीजींचे जे मला दर्शन घडले, ते खरोखर अविस्मरणीय आहे. युद्धात नेहमीच चढउतार होतात. परिस्थिती क्षणाक्षणात बदलते. पण युद्धनेत्याला आपले मन खंबीर ठेवावे लागते. शास्त्रीजींनी हा खंबीरपणा, हे मनोधैर्य या सर्व काळांत दाखविले. मनाशी त्यांनी पक्के ठरविले होते, की हा प्रसंग लेचेपेचे धोरण ठेवण्याचा नाही. प्रतिटोला हाणण्याची तयारी ठेवण्याचा आहे. त्यांचे हे मन आम्ही रोजच्या चर्चेतून पाहत होतो. त्यामुळे अनेक निर्णय घेणे सोपे गेले. पार्लमेंटला धीर आला. जनतेलाही या खंबीरपणाचा प्रत्यक्ष प्रत्यय आला, तो लाहोरच्या दिशेने आपले सैन्य घुसले, तेव्हा शास्त्रीजींनी जनतेला आकाशवाणीवरून आवाहन केले. त्यांचे ते भाषण, त्यांचे ते 'कम व्हॉट मे' हे शब्द म्हणजे त्यांच्या दृढ निर्धाराची, भारताच्या अशरण वृत्तीची ॠचा होती. त्यांच्या शब्दांना त्या काळी धार आली होती. युध्यमान भारताची ती प्रतिमा आणि भारतीयांना लाभलेले शास्त्रीजींचे त्या काळातील खंबीर नेतृत्व हे आपल्या आधुनिक इतिहासाचे एक सोनेरी पान आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org