शब्दाचे सामर्थ्य ९२

२३

लाल बहादूर शास्त्री

लालबहादूर शास्त्रींचे पुण्यस्मरण करताना त्यांच्या सहवासातील अनेक आठवणी जाग्या होतात. त्यांनी कधी मन मोहोरते, कधी उदासवाणे होते. शास्त्रीजींच्या व्यक्तिमत्त्वात एक गोडवा होता. माणसाला आपलेसे करण्याची जादू होती. त्यामुळे अगदी थोड्या सहवासाने आमची मने 'निरंतर' झाली. १९४८ मध्ये मी शास्त्रीजींना प्रथम भेटलो, ते मी पार्लमेंटरी सेक्रेटरी होतो, तेव्हा. ती अर्थातच जुजबी ओळख होती. पण पुढे मी मंत्री झाल्यावर दिल्लीला त्यांची भेट नेहरूंच्या निवासस्थानी झाली. प्रसंग साधाच आहे; पण तो आज आठवतो आहे.

नेहरूंच्या बंगल्याच्या हिरवळीवर चहापानासाठी आम्ही जमलो होतो. त्या वेळी एका बाजूला पं. पंत आणि शास्त्रीजी हिरवळीवर फे-या घालीत बोलत होते, इतक्यात पंडितजी आले, त्या दोघांकडे पाहून जवळ असणा-या आम्हां सर्वांना बोलावून म्हणाले, 'डू यू सी दॅट लाँग अ‍ॅण्ड शॉर्ट ऑफ यू.पी.?'

त्यानंतर शास्त्रीजी केंद्रीय मंत्री असताना एकदा मुंबईत आले. १९५८ साल असावे. द्वैभाषिक मुंबई राज्य स्थापन होऊन दोन वर्षे होऊन गेली होती. शास्त्रीजी नेहरूंच्या विश्वासातले. तेव्हा माझ्या मनात आले, की शास्त्रीजींची संयुक्त महाराष्ट्रासंबंधीची मते अजमावून पाहावीत. मी त्यांना सरळच विचारले,
'ह्या द्वैभाषिकाच्या प्रयोगासंबधी आपल्याला काय वाटतं?'
तेव्हा शास्त्रीजींनी स्पष्टपणे सांगितले,
'ते मला कधीच पसंत नव्हतं. ते टिकणार नाही, असं मला वाटतं.'
शास्त्रीजींचे हे मत माझ्या दृष्टीने महत्त्वाचे होते.

शास्त्रीजींशी खरी जवळीक होऊ लागली, ती मी दिल्लीला आल्यावर, ते गृहमंत्री होते नि मी संरक्षणमंत्री होतो. संरक्षण खात्याच्या व गृहखात्याच्या अनेक समान प्रश्नांसंबंधी चर्चा करण्यासाठी भेटीगाठी होत. त्यामुळे सहवास वाढत गेला. पुढे ते पंतप्रधान झाले, तेव्हापासून तर अधिकच संबंध येऊ लागला.

पहिले सहा महिने शास्त्रीजी आपली बैठक नीट मांडीत होते. पंतप्रधान म्हणून सहका-यांशी चर्चा होतात, तशा माझ्याशीही होत असत. त्यांच्या स्वभावातली अकृत्रिमता, त्यांची विश्वास देण्याची व घेण्याची पद्धत समजू लागली होती. त्यांच्याशी बोलताना त्यांच्या मनाचा ठाव घेणे सोपे नसे. ज्या विश्वासाने ते वागत, त्याच विश्वासाने, उमेदीने काम करावे, असे वाटे, पण तरीही या संबंधांत पडदा होताच. तो असतोच. ती जागाच तशी आहे.

पुढे एप्रिल, १९६५ पासून 'कच्छ प्रकरण' सुरू झाले. संरक्षण खात्याच्या धोरणाशी निगडित असे अनेक प्रश्न त्यातून उद्‍भवले. शास्त्रीजींचे मन कळावे, असे मला वाटत होते. याच काळात त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलणे होऊ लागले. ऑगस्ट १९६५ मध्ये परिस्थिती धोक्याच्या वळणापर्यंत पोहोचली होती. शास्त्रीजींशी केलेल्या विचारविनिमयातून त्यांची संरक्षणविषयक मते वास्तव आहेत, देशाच्या हितासाठी धोका पत्करण्याची त्यांची मानसिक तयारी आहे आणि त्याला लागणारी कणखर मनोवृत्ती त्यांच्याजवळ आहे, याचा अनुभव मला येऊ लागला. विचारांची देवाणघेवाण मोकळेपणाने होऊ लागली. स्वाभाविकच मी त्यामुळे निश्चिंतच झालो आणि समाधानही वाटले. कारण वेळ फार आणीबाणीची आली होती. संरक्षणमंत्री या नात्याने देशाच्या जीवनावर दूरवर परिणाम करणारे निर्णय घेण्याचे ते दिवस होते. अशा वेळी आपल्यावर पंतप्रधानांचा संपूर्ण विश्वास असणे ही त्या वेळची माझी गरज होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org