शब्दाचे सामर्थ्य ९१

थोड्याशा अवधीत माझा जो परिचय राजेंद्रबाबूंशी झाला, जो संबंध त्यांच्याशी आला किंवा वेळोवेळी गप्पागोष्टींच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाची जी संधी मला मिळाली, त्यातून माझी ही धारणा दृढ झाली आहे की, केव्हा केव्हा समस्यानुकूल निदान करताना, त्यांची अस्वीकृती असतानासुद्धा मी अनुभवलेले आहे, परिस्थित्यनुसार जेव्हा मी त्या उचित मार्गावरून तेज गतीने जाऊ शकत नसे, तेव्हा सुद्धा मी अनुभवले आहे की, त्यांच्या सौजन्यशीलतेने माझ्यात नवीन शक्तीचा संचार केला आहे आणि काळ व्यतीत होताच मी त्या मार्गावरून जाण्यास समर्थ झालो आहे.

अशा प्रकारे त्यांची सौम्यता माझ्यातील दुर्बल तेसच नाही, तर माझ्यातील शक्तीस मजबूत बनविणारी होती. जसा एखाद्या पित्याचा आपल्या जबाबदार पुत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो, तसा त्यांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. असा पिता आपल्या पुत्राच्या कार्याची दखल घेत नसतो; पण त्यास उचित मार्ग दाखवितो. सतत आपल्या आशीर्वादातून आणि शुभकामनेतून त्याच्यात हिंमत निर्माण करतो. माझ्याबद्दलचे त्यांच्यांतील या प्रकारच्या प्रेमाचे प्रत्यंतर मला एक-दोन वेळा अनुभवण्यास मिळाले.

राजेंद्रबाबू अधून-मधून पुण्यात येत असत. सन १९६० मध्ये ते पुण्यास आले होते. कदाचित पुण्यातील हे त्यांचे येणे शेवटचेच होते. मी काही कारणास्तव माझ्या गावी कराडला गेलो होतो. कराड पुण्याहून अंदाजे १५० मैल आहे आणि रस्ताही घाटाचा आहे. तेथून एकदा मी वेळेअभावी अत्यंत गतीने कारने केवळ अडीच तासांत कराडवरून पुण्यास पोहोचलो. सरळ राजभवनात गेलो. राजेंद्रबाबू समोरच बसले होते. कारमधून उतरताच मी त्यांना भेटलो. बोलता-बोलता त्यांना हे कळाले, की मी इतक्या गतीने आलो आहे, तेव्हा त्यांनी मोठ्या गोड शब्दांत, परंतु चिंतेच्या स्वरात सुनावले की, 'अशा त-हेचा धोका पत्करणे योग्य नाही. भले, थोडा उशीर झाला, तरी चालेल.'

त्यांचे हे प्रेमळ शब्द आजसुद्धा मी विसरू शकत नाही. राजकीय जीवनातील कर्तव्य आणि कर्म यांमधील अशी मृदुता हृदयावर अशी अवीट छाप घालते, ज्यास मी कधीच विसरू शकत नाही.

राष्ट्रपतिभवनात सुद्धा त्यांना भेटण्याचा योग मला अनेक वेळा आला. जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटलो, तेव्हा तेव्हा मला त्यांच्यांतील अधिक जवळिकीचा अनुभव आला. त्यांच्या सहवासात मला जी शांती आणि समाधान मिळे, त्यांचे वर्णन करणे शब्दातीत आहे. हे मी माझे सौभाग्य मानतो, की त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या शुभेच्छा, त्यांचे आशीर्वाद त्यांचे प्रेम मला प्राप्त झाले. हे सत्य आहे, की जेव्हा जेव्हा अनौपचारिकरित्या त्यांच्याशी भेटण्याचा मला योग आला, तेव्हा तेव्हा मला वाटायचे, की आणखी काही वेळ त्यांचा सहवास मला मिळावा आणि त्यांच्याजवळ बसण्याची संधी मिळावी. त्याचे कारण केवळ मला त्यांच्यापासून समसामयिक समस्यांवर सुदृढ सल्लाच नसे, तर त्यांच्या प्रत्येक शब्दातून सहजपणे माझ्याबद्दलचे वात्सल्य ओसंडत असे.

मला आठवते की, नवीन जबाबदारी सांभाळण्यासाठी मला मुंबईवरून दिल्लीस जावे लागले. देशावर संकटांचे ढग अंधारून आले होते. या स्थितीत देशवासीयांच्या आकांक्षा मी किती फलद्रूप करू शकेन, या विचाराने माझ्या मनास घेरले होते. राजेंद्रबाबू तेव्हा पाटण्यात होते. त्यांनी तारेने माझे अभिनंदन केले, परंतु केवळ तारेने त्यांचे समाधान झाले नाही. म्हणून त्यांनी पत्रही लिहिले. त्यांची सद्‍भावना आणि शुभाशीर्वाद माझ्यातील धैर्य वाढवितात आणि धीरगंभीरतेने कर्तव्य पार पाडण्याची मला प्रेरणा देतात. त्यांचे हे ते शब्द.

'बिघडलेल्या गोष्टी सुधारण्यास आणि त्यांना ठीक करण्यास वेळ लागतो, म्हणून बिघडलेल्या गोष्टींची लगेचच सुधारणा करण्याची आशा बाळगणे उचित नाही. धैर्याने योग्य मार्ग अनुसरून सर्वांना याप्रमाणे सुधारणे, त्यांना ठीक बनविणे आवश्यक आहे. जसे इंग्रजांनी डंकर्कच्या लढाईनंतर स्वतःस सुधारले, ठीकठाक बनविले, मला आशा आहे, की आता असेच होईल!... म्हणून मी भविष्याकडे धीराने पाहतो. तथापि, आता आमची पुन्हा परीक्षा होईल!'

राजेंद्रबाबूंच्या या शुभेच्छा आणि सद्‍भावना माझ्या जीवनाच्या आश्रयस्थान बनल्या आणि कठीण प्रसंगी माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला.

आज त्या महापुरुषाचे, जे केवळ राष्ट्रपतीच नव्हते, तर आदर्श मानवी पुरुष होते, त्यांच्या स्मरणाने आमच्या हृदयांत आणि राष्ट्रात चैतन्यशील जीवनाचा संचार होत आहे. अशा या महापुरुषाच्या स्मरणाने देशाबद्दलचे कर्तव्य पूर्ण करणे, देशाची मनापासून सेवा करणे आणि त्यांचे रक्षण करणे यांसंबंधीची प्रेरणा मला निश्चितच मिळत राहील. त्या दिवंगत नेत्याच्या आत्म्यास ही माझी खरी श्रद्धांजली ठरेल.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org