शब्दाचे सामर्थ्य ७३

आता हे खरे आहे, की माझ्या पिढीतील अनेक तरुणांना गांधीजींचे टकळीचे तंत्र किंवा रामनामावरचा त्यांचा जोर पटत नव्हता. परंतु हा मतभेद किरकोळ होता. परदेशी सत्तेशी झगडण्याचा जो मूलभूत दृष्टिकोन गांधीजींनी देशापुढे ठेवला होता, तो आकर्षित करीत होता. परकीय सत्तेशी सामना देता-देता एका नव्या धर्तीचा माणूस व समाज भारतामध्ये निर्माण व्हावा, ही गांधीजींची दृष्टी होती. शतकानुशतकामध्ये भारतात जसे मूलगामी कार्य झाले नव्हते, तसे हे कार्य होते. भारताच्या जागृतीचा एक नवा रस्ता प्रकाशमान केला जात होता.

सामाजिक समतेचा जो विचार गांधीजींनी मांडला, त्या वेळी तर बहुजन समाज त्यांच्याकडे फार वेगाने आकर्षित होत गेला. माझ्या समजुतीने बुद्धानंतर एवढा क्रांतिकारक समतावादी विचार मांडणारा व त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करणारा गांधींशिवाय कोणीच झाला नाही. समाजक्रांतीचा नुसता विचार मांडणारे अनेक जण होऊन गेले, परंतु सामाजिक समतेसाठी एवढा जबरदस्त सामूहिक प्रयत्‍न करणारे आधुनिक काळात फक्त गांधीजीच होऊन गेले, हे मान्य करावे लागेल.

वृद्धत्व आल्यावरही तरुण पिढीला आकर्षित करण्याची अपूर्व शक्ती गांधींमध्ये होती. त्यामुळेच १९३० नंतर देशातील व महाराष्ट्रातील उगवती नवी पिढी जेव्हा समाजवादाकडे वळू लागली, तेव्हा तिच्या विचारांना मार्गदर्शन करण्याचे महत्त्वाचे कार्य गांधीजींनी केले, असे म्हटले, तर ते अवास्तव ठरणार नाही. त्यामुळेच, टिळक व गोखले यांचे अनुयायित्व सांगणारी पिढी सोडली, तर त्यानंतर गांधीजींच्या जीवनकार्याने प्रभावित झालेली पिढीच-शहरातील व ग्रामीण भागातली महाराष्ट्रातही वर आलेली दिसत आहे.

गांधीजींचा व महाराष्ट्राचा संबंध केवळ संस्कारांच्या पातळीवर राहिलेला नाही, तर प्रत्यक्ष सहवासाच्या रूपानेही त्यांनी हजारो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. गांधीजींचे वास्तव्य जेवढे महाराष्ट्रात झाले, तेवढे इतरत्र कोणत्याच प्रांताच्या वाट्याला आलेले नाही. गांधी-जीवनदृष्टीचा व गांधी-विचारांचा स्वीकार करीत असताना मराठी मनाला, महाराष्ट्राच्या संतपुरुषांच्या परंपरेचे साहाय्य झाले असावे, असे म्हणण्यास मुळीच हरकत नाही. ‘रक्त व तलवार’ या शब्दांपेक्षा ‘सत्य व अहिंसा’ या शस्त्रांचा स्वीकार भारतीय जीवनात व्हावा, ही गांधीजींची तळमळ होती. त्यात त्यांना यश किती आले, हा प्रश्न वेगळा; परंतु त्यांची धडपड अपूर्व होती व सर्वसामान्य माणूस त्या धडपडीमध्ये रंगून जाऊ शकत होता; हे विसरता येणार नाही. दांडीयात्रेनंतर पराकाष्ठेचे आत्मक्लेश सहन करण्याचे जे अभूतपूर्व वातावरण देशभर तयार झाले, त्यात मराठी माणूस कोठेही मागे पडला नाही.

गांधी व महाराष्ट्र यांच्या संबंधांचा विचार करताना एक शेवटचा मुद्दा मनात येऊन जातो, तो असा, की आज गांधी-विचारांचा परिणाम कितपत उरला आहे? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक माणूस आपापल्या अनुभवातूनच देऊ शकेल. मी मात्र असे निश्चितपणे म्हणेन की, महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनावर, अनेक सामाजिक संस्थांवर, शेकडो, हजारो लहानमोठ्या कार्यकर्त्यांवर गांधी-विचारांचा व गांधी-जीवनाचा ठसा आजही जाणवतो. अर्थात, जुन्या पिढीचे प्रतिनिधी हयात आहेत, म्हणून असे जाणवत असावे. परंतु त्यानंतर काय होईल, हे सांगणे कठीण आहे.

मात्र एक आशा व्यक्त करणे अस्थानी ठरणार नाही. गांधी-जीवन व गांधी-विचार यांमध्ये जो क्रांतिकारक आशय आहे, तो समजून घ्यावा, अशी एक प्रेरणा जगात पुन्हा निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. हिंसा व सांप्रदायिक राजकीय आचार यांआधारे मानवाचे प्रश्न सुटत नाहीत, ही जाणीव दृढमूल होऊ लागली आहे. गांधीजींच्या विचारांची उजळणी घडू लागली आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. गांधीजींनी जे विचार दिले आहेत, ते युगायुगांत पुरणारे विचार आहेत. एका देशासाठी, एका पिढीसाठी किंवा एका विशिष्ट समाजासाठी गांधीजी जगले नाहीत. त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांपैकी प्रत्येक गोष्ट आंधळेपणाने आपण स्वीकारावी, अशी त्यांचीही अपेक्षा नव्हती. राजकीय स्वातंत्र्यप्राप्तीशी संबंधित नसणा-या अशा कितीतरी मूलभूत विषयांवर गांधीजींनी मौलिक विचार प्रदर्शित केले आहेत. त्या विचारांचा अभ्यास बदललेल्या काळात व नव्या दृष्टिकोनातून, त्या पिढीत चालू व्हावा आणि स्वत:ला पटणारे विचार प्रत्यक्ष कृतीत आणणारे धाडसी प्रयोगवीर निर्माण व्हावेत, एवढीच अपेक्षा आहे. गांधीजींच्या जीवनकार्याचे यथार्थ मूल्यमापन करण्याची शक्ती आपल्याला आहे, असे समजणे धाडसाचे होईल, परंतु काळ जसजसा उलटत जाईल, तसतसा गांधी-विचारांचा आशय अधिक स्पष्ट होऊन मानवजातीचा एक अलौकिक ठेवा म्हणून त्यांची महती वाढत जाईल, अशी माझी अपेक्षा आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org