शब्दाचे सामर्थ्य ७१

गांधीजींच्या कार्याची व व्यक्तिमत्त्वाची एक नवी झलक भारताला त्या वेळी दिसून आली. राजकीय नेता कसा असावा, याची विवक्षित कल्पना त्या वेळी लोकांपुढे होती. लोक असा शब्द जो मी वापरला, त्यात तत्कालीन शिक्षित वर्गाचा समावेश मला प्रामुख्याने करावयाचा आहे. त्या वेळचे राजकारण हे बहुतांशी शिक्षित वर्गाचेच राजकारण होते. या शिक्षित वर्गामधून दोन प्रकारचे नेतृत्व देशभर निर्माण झाले होते. एका नेतृत्वाचा घाट लोकमान्य टिळकांच्या विचारांचा होता. दुस-या नेतृत्वाचा घाट नामदार गोखल्यांच्या विचारांचा होता. योगायोगाने हे दोन्ही सर्वमान्य, देशमान्य नेते मराठीच होते. परंतु या दोन्ही प्रकारांपेक्षा वेगळ्या व तिस-या प्रकारचे नेतृत्व वर येईल, अशी अपेक्षा त्या काळातही कोणी केली असेल, असे वाटत नाही.

म्हणून गांधीजींच्या रूपाने एक चमत्कारच भारतीय राजकारणात घडला, असे म्हणावे लागेल. गांधीजींच्या मृत्यूनंतर आईनस्टिन म्हणाला की, ‘गांधींसारखा माणूस या अवनीतलावर होऊन गेला, यावर आगामी पिढ्यांचा विश्वासही कदाचित बसणार नाही.’ आईनस्टिनला जर असे वाटले, तर गांधींचा उदय ज्या पिढीने पाहिला, त्या पिढीला काय वाटले असेल. याचा विचारच केलेला बरा!

युगपुरुष जेव्हा आपल्या युगप्रवर्तक कार्याची सुरुवात करतो, तेव्हा असेच काहीतरी होणे स्वाभाविकच मानले पाहिजे. व्याकरणाचे जुने नियम तो जणू फेकून देतो. जुनी फूटपट्टी तो मोडून टाकतो, स्वतःच्या गायकीला साजतील, असे नवीन स्वर आणि ताल बसवितो आणि नवे सूर आळवू लागतो. गांधीजी प्रथम जेव्हा भारतात कार्य करू लागले, ते नेमके कोणत्या क्षेत्रात उतरणार, याबद्दल जाणकारांनी वेगवेगळे अंदाज केले असणे शक्य आहे. कोणाला वाटले असेल, की गांधीजी सामाजिक कार्याला वाहून घेतील. कोणाला वाटले असेल की, ते राजकीय कार्याला प्राधान्य देतील. ‘आधी सामाजिक सुधारणा, की आधी राजकीय चळवळ’ असा एक मोठा वाद महाराष्ट्रात त्यापूर्वी रंगून गेला होता व त्याचे खोल परिणाम महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या सार्वजनिक जीवनावर उमटले होते.

परंतु गांधीजींनी जो मार्ग स्वीकारला, तो अगदी वेगळा. सामाजिक, राजकीय, आर्थिक, इतकेच काय, परंतु धार्मिक, शैक्षणिक अशी वेगवेगळी क्षेत्रे त्यांनी अलग मानली नाहीत, त्यांनी असा काही तरी संकलित, मूलभूत व मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारला, की त्यामुळे सर्वजण विस्मयचकित झाले.

टिळक व गांधी यांच्या विचारांमध्ये व कार्यपद्धतींमध्ये एक प्रचंड तफावत लोकांना भासू लागली असल्यास नवल नाही. गोखले यांना गांधीजी आपले राजकीय गुरू मानीत होते. परंतु याबाबतही मला असे वाटते की, जर का गोखले आणखी जगले असते, तर अगदी थोड्या वर्षांतच गुरुशिष्यांच्या विचारधारांमध्ये कमालीचा फरक दिसू लागला असता, असो.

गांधीजींच्या रूपाने जेव्हा एक नवे, नव्या घाटाचे नेतृत्व उभे राहिले, तेव्हा गोखलेवादी किंवा टिळकवादी मंडळी गोंधळून जाणे स्वाभाविक होते. कारण तोपर्यंत राजकारणाचा व्याप हीच मंडळी सांभाळीत होती. गोखलेपंथीयांपेक्षा टिळकपंथीय जनतेच्या अधिक जवळ होते, हे जरी खरे असले, तरी त्यांच्या चळवळीची रीतभात बरीचशी शहरी होती. त्यात शब्दांना, भाषेला व भाषणांना प्राधान्य होते. लोकमान्यांच्या हयातीत त्यांनी जे तेजस्वी स्वरूप राजकारणाला दिले होते, त्याचा साक्षात्कार टिळकपंथीयांच्या कार्यात येत नव्हता.

 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org