शब्दाचे सामर्थ्य ६९

उद्योगधंद्यांची वाढ, नव्या शेतीचे आगमन व शिक्षणप्रसार यांनी पूर्वीची गावे व शहरे यांच्यामध्ये काही मौलिक फरक होत चालला आहे. त्याची दखल घेऊन शहरे व गावे यांच्यामध्ये एक नवा संवाद सुरू केला पाहिजे. आचार-विचारांची देवाणघेवाण वाढविली पाहिजे. हे झाले, तर एकजिनसी समाजजीवन निर्माण करण्याच्या दिशेने बरीचशी प्रगती होईल.

शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्रात गेल्या अठरा-वीस वर्षांत विद्यापीठे, कॉलेजे यांच्या संख्येत वाढ झाली असल्यामुळे प्रगती झालेली नाही, असे मी म्हणणार नाही. ग्रामीण क्षेत्रापर्यंत, सामान्य माणसापर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे प्रयत्‍न झाले आहेत, ते तसेच वाढते ठेवले पाहिजेत. परंतु प्राथमिक शिक्षणाचा पाया ग्रामीण भागात अजून कच्चा आहे. तो दुरुस्त केल्याशिवाय माध्यमिक आणि उच्च क्षेत्रांत केलेले प्रयत्‍न वाया जातील, अशी साधार भीती वाटते. विदर्भ, मराठवाडा, कोकण, मुंबई यांच्यामध्ये एक भावनात्मक, सांघिक भावना ब-याच प्रमाणात वाढली आहे, परंतु विकासाचा असमतोल या प्रक्रियेच्या आड येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्याच्या कार्याला सुरुवात झाली, तेव्हा पूर्वीच्या काळातील असमतोल दूर करण्याचे दृष्टीने काही वचने आम्ही दिली होती. माझ्या कल्पनेने ती बरीच पुरी करण्याचा प्रयत्‍न झाला आहे. त्याच्यामधील असमतोल पूर्णतः दूर झाला, असे नाही; पण काही वचनांची पूर्तता झाली, असे मानता येईल.

कोकणच्या प्रश्नासंबंधी अनेकविध प्रयत्‍नांची गरज आहे. पण माझ्या मताने सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, कोकणच्या मनुष्याचे कर्तृत्व कोकणात दिसून येत नाही, हा त्यांचा असलेला समज. कोकणचा मनुष्य बाहेर गेल्याशिवाय त्याचे कर्तृत्व दिसत नाही, असे काही जण म्हणतात. ते कितपत खरे आहे, हे मला माहीत नाही. कर्तृत्ववान माणसे कामासाठी तेथेच थांबली आणि त्यांना लागणारे साहाय्य आणि साधने शासनाकडून मिळत गेली, तर हा प्रश्न सुकर होईल. थळ प्रकल्पाच्या निमित्ताने मिळालेल्या मान्यतेमुळे कोकणच्या विकासाची नवी आशा निर्माण झाली आहे. परंतु या क्षेत्रात कोकणचा माणूस क्रियाशील झाल्याशिवाय याचा खरा फायदा मिळणार नाही. किनार्‍यावरील बंदरांची वाढ व सुधारणा हा कोकणचा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे पहिल्यापासून मला वाटत आले आहे व या दृष्टीने मी पश्चिम सागराच्या किना-याची जवळजवळ एक आठवडा यात्रा १९६१ साली केली आहे. नौदलाची ‘त्रिवेणी’ ही युद्धनौका संरक्षण खात्याने माझ्यासाठी देऊ केली होती. अ‍ॅडमिरल करमरकर यांच्याबरोबर मी किना-यावरची सर्वच महत्त्वाची ठिकाणे व महत्त्वाची बंदरे यांचे दर्शन घेतले आहे. त्या प्रवासाची आठवण आजही माझे मन भावनाशील बनविते. खरे कोकण मी त्या वेळी पाहिले. कोकण ही महाराष्ट्राच्या समृद्धीची एक महत्त्वाची भूमी आहे, ही जाणीव झाली. परंतु राष्ट्रीय शासनाच्या व साधनांच्या मदतीशिवाय एका राज्याची शक्ती या क्षेत्रातील कामात कमी पडते, हा खरा प्रश्न तेव्हा होता व आजही आहे, असे कितीतरी प्रश्न कितीतरी क्षेत्रांत आहेत, त्यांचा विचार करावा लागेल.

महाराष्ट्र राज्याची स्थापना ही एक सोन्याची घटना आहे, असे मी मानतो. प्रगतीच्या दिशेने पावले पडली आहेत व काही बाबतींत निराशा झाली आहे. परंतु प्रगतीच्या दिशेने चालेलेली ही सफर मध्येच अडून चालणार नाही. १९६० साली नव्या महाराष्ट्राला मी अत्यंत आवडीने ‘जगन्नाथाचा रथ’ अशी सार्थ उपमा देत असे. सर्वांचे हात लागल्याशिवाय हा रथ हालणारही नाही व चालणारही नाही. महाराष्ट्राचा जन्म होताना जी दृष्टी आणि भावना होती, ती स्वयंस्फूर्त प्रयत्‍नांनी पुनरुज्जीवित केली पाहिजे. या दृष्टीने महाराष्ट्र राज्य जन्माच्या वेळी जे म्हटले होते, त्याचा येथे पुनरुच्चार करीत आहे.

‘महाराष्ट्राच्या भवितव्याची ही मोठीच मोठी, लांबच लांब सफर आहे.... त्या सफरीतील आम्ही प्रवासी आहोत, ही सफर तुम्हां-आम्हांला पुरी करावयाची आहे... ती सफर आज मला माझ्या डोळ्यांसमोर दिसते आहे.... ती लांबची सफर आहे.... पण ती पुरी केलीच पाहिजे... कारण त्यात जनतेचे कल्याण आहे....’

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org