शब्दाचे सामर्थ्य ५२

११

राजकीय आयुष्याची घोडदौड

आयुष्य हे घोडेस्वारासारखं आहे, असं मला नेहमी वाटतं. द-याखो-यांतून घोडेस्वाराला नेहमीच धावावं लागतं. डोंगरद-या पार कराव्या लागतात, आणि सुखरूप तर राहावं लागतंच. एखाद्या घोडेस्वाराच्या चित्राकडे मी पाहतो, तेव्हा वैयक्तिक काय किंवा राजकीय जीवनात काय, असंच संकटांतून एकसारखं धावावं लागलं, असं दिसतं. संकटाशिवाय आजवर काही मिळालं नसलं, तरी एक खरं की, कामाचं समाधान आहे.

१९४१ साली वकील झालो आणि वकिली सुरू करण्याच्या इराद्यानं कराडला पोचलो. पण वकिलीत चित्त लागत नव्हतं. लक्ष होतं राजकारणाकडे. जिल्ह्यानंही त्या वेळी मला एक नेता म्हणून मान्य केलं होतं. आजवर कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नव्हता. मी काही मिळवावं, अशी घरच्या लोकांची अपेक्षा असणं स्वाभाविक होतं. तशातच १९४२ च्या २ जूनला विवाहबध्द झालो आणि जीवनाचा एक नवा अध्याय सुरू झाला. आशा उत्तरोत्तर वाढत चालली होती. एक नेता बनलो होतो. वकील झालो होतो आणि संसार सुरू केला होता; पण मन पुढेच कुठेतरी धावत राहिलं होतं. मनाची स्थिती मोठी विलक्षण असते. क्षणात आनंद, क्षणात खिन्न, तर क्षणात विमनस्क. पण असंही वाटतं की, मनानं केलं जातं, तेच खरं कर्म ! मनाच्या निश्चयानं जे केलं जातं, त्याचा नाश करण्यास कुणीही समर्थ नाही, हा अनुभव आजवर घेत आलो होतो. नियतीनं तेच ताट पुढंही वाढून ठेवलं होतं.

मी भूमिगत असतानाच थोरल्या बंधूंचं निधन झालं. मधले गणपतराव स्थानबद्धतेत असतानाच त्यांना क्षयानं पछाडलं आणि विवाहानंतर पहिल्या संक्रांतीलाच पत्‍नीला - सौ. वेणूताईंना पोलिसांनी पकडल्यानं तिच्या मनालाही धक्का बसला. एका भल्या घराण्यातनं आलेली ही चव्हाणांच्या घरातली सून, तिला तुरुंगाची हवा आणि तुरुंगाचं वातावरण नवीन होतं. अपरिचित होतं. असह्य झालं तिला ते आणि तिनं अंथरूण धरलं. बंधूंच्या आणि पत्‍नीच्या औषधाची व्यवस्था करण्यासाठी म्हणून मग पॅरोलवर सुटून बाहेर यावं लागलं.

कुटुंबानं माझ्यासाठी सर्व काही वेचलं होतं. भोगलं होतं. माझं शिक्षण केलं होतं. राजकारणात उडी घेऊ दिली होती; पण कुटुंबासाठी मी काय केलं होतं आणि करीत होतो? ४५ साली मधले बंधू गणपतराव यांना औषधासाठी मिरजेला दाखल केलं. आणि वकिलीचा व्यवसाय सुरू करून, कुटुंबाला स्थैर्य प्राप्त करून द्यावं, असा विचार केला. पण कुटुंबाचं स्थैर्य हे नियतीला मंजूर नव्हतं.

वकिलीची पुस्तकं नुकती कुठं उलगडू लागलो होतो, तोच १९४६ च्या पहिल्या असेंब्ली निवडणुकीचे नगारे वाजू लागले आणि राजकारणाच्या गाड्याला मला पुन्हा जुंपून घ्यावं लागलं. त्या निवडणुकीला मीच उभं राहावं, असा माझ्या बंधूंचा गणपतरावांचा आणि मित्रांचा आग्रह होता. मला ते टाळता आलं नाही. मी उभा राहिलो आणि यशस्वीही झालो. पण या निवडणुकीतील विजयानं मला सातारा जिल्ह्याच्या बाहेर काढून महाराष्ट्राच्या राजकारणात आणून उभं केलं. कराडात वकील म्हणून जम बसवीत राहिलो असतो, तर राजकारणातले हे नंतरचे अध्याय आज कदाचित दिसले नसते. नियतीच्या मनातच ते होतं. सर्वज्ञ असो, बहुज्ञ असो, नियतीला, सृष्टीनियमाला बदलण्यास कुणीही समर्थ नाही, हेच खरं! म्हणूनच नाश पावलं असेल, त्याची उपेक्षा करावी लागते आणि जीवनात जे प्राप्त होतं, त्याचा अंगीकार करावा लागतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org