शब्दाचे सामर्थ्य ३२

आता तीस-चाळीस वर्षानंतर मी माझ्या आठवणींच्या फुलांची ओंजळ भरत आहे. त्या वेळी त्यांतील अनेक रंगांची आणि मधुर व कडवट वासांची फुलं अजूनही ताजी टवटवीत दिसतात. स्मृतिपुष्पं म्हणावीत, फार तर; पण त्यांचा रंग आणि सुगंध ताजा असल्यासारखा वाटतो. तळाला काही फुलं कोमजलेली असतील, पण निसर्गाची करणी. नियतीची इच्छा. काही फुलं कोमेजली असली, तरी सुंगध परिचयाचा आहे. वाळा वाळलेला असला, तरी सुगंध देतोच. ओलाव्याचा शिडकावा केला, तर सुगंध अधिकच दरवळतो. आता आठवणींना उजाळा देत असताना, ज्यांनी अलोट प्रेम दिलं, त्यांच्या त्या प्रेमाचा ओलावा मनातून पाझरत-पाझरत हाताच्या ओंजळीपर्यंत पोचत आहे आणि त्या ओलाव्याचा स्पर्श झाल्यामुळे, की काय, ओंजळीतील आठवणींची फुलं अधिकच सुगंध देत आहेत.

सदतीसची निवडणूक जिंकली आणि अडतीसला बी. ए. झालो. तेव्हा कोल्हापूर आणि सातारचं क्षेत्र अपुरं वाटू लागलं. पाय पुण्याकडे वळत होते. डोक्यात विचार घोळत होते वकील बनण्याचे. त्यासाठी पुण्याला जाण्याची हौस होती. लोकमान्य टिळकांचं राजकीय पुणं. शिक्षणाचं आणि विद्वानांचं माहेरघर. पुण्यात येण्यानं अनुभवाचं आणि ज्ञानाचं, अभ्यासाचं क्षेत्र रुंदावणार होतं. राजकारण वळण घेत पुढं आणि पुढंच चाललं होतं. अनुभवाच्या गाठी बांधण्याची जरुरी वाटत होती. डोळ्यांपुढं पुणं होतं.

मनात विचार फिरत होते. पण... पुण्यात जायचं, ते कुठं-कुणाकडं ?

- आणि एक दिवस या प्रश्नालाही उत्तर मिळालं. पुण्यात राहायचं कुठं, हे कोडं सुटलं होतं. आत्माराम पाटील हे पुण्यात मुक्काम करून होते. त्यांच्याकडेच बाडबिस्तारा टाकण्याचं ठरवलं आणि एक दिवस पुण्यात दाखल झालो. वकील होण्यासाठी मग लॉ कॉलेजात नाव दाखल केलंही !

वकील होण्यासाठी पुण्यात आलो खरा. पण इथला दोन-तीन वर्षांचा म्हणजे १९४१ अखेरपर्यंतचा काळ हा माझा वैचारिक संघर्षाचा काळ ठरला. मॅट्रिक होताना १९३० ते ३३ ही तीन वर्षे अशीच वैचारिक संघर्षाची गेली. अगोदर हे, की अगोदर ते, हे निश्चित ठरत नव्हतं. तीच स्थिती ३९ ते ४१ या तीन वर्षांत पुन्हा उद्‍भवली. १९३९ ते ४१ हा काळ, तसं पाहिलं, तर राजकीय जीवनात क्राइसिसचा, वैचारिक अस्थिरतेचा काळ होता. अनेक प्रश्न निर्माण होत होते आणि कशातच समाधान होत नव्हतं. दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं. कुणी काय करायचं, या वादात सारे पक्ष गोंधळून गेले होते.

काँग्रेस पक्ष प्रत्यक्ष कृती करण्यापासून दूर होता. रॉय यांचा पक्ष बुद्धिवादी विचारमंथन करण्यात गुंतला होता. या युद्धाचं वर्णन ‘इंपीरियलिस्ट वॉर’ असं कम्युनिस्ट पक्ष करीत होता. पंडित नेहरू चीनमध्ये होते. फॅसिझमविरुद्ध उभं राहायचं, की कम्युनिझमविरुद्ध ? वसाहतवादाच्या विरुद्ध सुरू केलेल्या लढ्यांचं काय ? असे प्रश्न विविध अंगांनी चर्चिले जात होते. युद्ध सुरू झालं. ती सारी रात्र आम्ही चर्चेत संपविली. पुण्याला त्याच वेळी अखिल भारतीय काँग्रेसची बैठक झाली. राजाजी, सरदार, पंत, आदी उपस्थित होते, पण काही निश्चिती होत नव्हती.

मनाच्या अशा कोंडमा-यातच सापडलो असताना एक दिवस कम्युनिस्ट पक्षाचं बोट धरावं, असा विचार मनात डोकावू लागला. काही तरी करावं, यासाठी धडपडणारं मन, कुणी काहीच करत नाही, करू देत नाही, म्हणून कुचंबलं होतं. कम्युनिस्ट काही वेगळं बोलत होते, सांगत होते. पण करीत नव्हतं कुणीच काही ! मनाची अस्वस्थता वाढत होती. अभ्यासाकडं, परीक्षेकडं लक्ष लागत नव्हतं. त्यातूनच ऑक्टोबर परीक्षेला न बसण्याचा निर्णय केला आणि सहा महिने वाया गेले. आमचे मित्र आत्माराम पाटील, ह. रा. महाजनी यांनी काँग्रेस सोडली होती. त्याच्यावर विचार करीत होतो. कम्युनिस्ट बनायचं, असं मन सांगत होतं. पण ज्यांच्याबरोबर काम केलं, त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय निर्णय ठरत नव्हता आणि एक दिवस त्यासाठी सातारा गाठला.

कम्युनिस्ट होण्याचं वैचारिक आकर्षण कार्यकर्त्यांना, मित्रांना सांगितलं. रात्र रात्र चर्चा झाल्या. पण कम्युनिस्ट झालात, तर आम्हांला साथ देता येणार नाही, असं बरोबरचे साथीदार सांगू लागले. त्यांचंही बरोबर होतं. स्वातंत्र्यासाठी काँग्रेस झगडत होती आणि आम्हां सर्वांचं ते प्रमुख ध्येय होतं. उलटसुलट चर्चा होऊन अखेर काँग्रेसमधे राहूनच झगडायचं, असा सर्वांच्याबरोबर माझ्या मनानं निर्णय केला आणि समाधानानं पुण्याला परतलो. दरम्यान ४० सालानंतर काँग्रेसनंही वैयक्तिक सत्याग्रहाचा निर्णय केला आणि मग मन स्थिर झालं आता काही करायला मिळेल, म्हणून ! मन स्थिर बनलं होतं. म्हणून मग परीक्षेला बसायचं ठरवलं आणि ४० साली एकदाची फर्स्ट एल्एल्. बी. पदरात पडली. पण पुढं सेकंड एल्एल्. बी. चा विचार मनात असतानाच सातारा जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं सांभाळण्याची जबाबदारी निर्माण झाली. ही जबाबदारी सांभाळत-सांभाळतच अखेर १९४१ मधे सेकंड एल्एल्. बी. पास होऊन पदवीच्या अर्थानं वकील बनलो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org