शब्दाचे सामर्थ्य ३१

एका बाजूला काँग्रेसच्या कार्याचं असं जागृतीचं चित्र निर्माण झालं असताना त्याच वेळी म्हणजे १९३७ सालात, असेंब्लीच्या निवडणुकीच्या निमित्तानं जिल्ह्यात एक लहानसा संघर्षाचा प्रसंग निर्माण झाला. अनिच्छेनं त्या संघर्षात मलाही पडावं लागलं. संघर्ष निर्माण झाला, उमेदवार म्हणून कोणाची निवड करावी, यावरून ! जिल्ह्यातील प्रमुखांचा आणि मान्यवर नेत्यांचा आग्रह, उमेदवार हा शिकलेला, शक्यतर वकील असावा, असा होता; आणि उमेदवार हा तरुण १९३० च्या चळवळीतून आलेला, तयार झालेला असावा, असं दुसरं मत होतं. त्या दृष्टीनं आत्माराम पाटील या त्यागी कार्यकर्त्याबद्दल दुस-या मताच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आणि त्यातूनच मतभेदाची ठिणगी उडाली. प्रमुख नेत्यांना परोपरीनं सांगूनही ते आत्माराम पाटील यांना उमेदवार म्हणून स्वीकारण्यास तयार होत नव्हते. किंबहुना त्यांनी त्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती आणि त्यातून अंतर्गत संघर्ष मग अटळ ठरला.

मला आठवतं, आत्माराम पाटील यांच्या उमेदवारीबाबत काँग्रेस श्रेष्ठींपर्यंत वाद नेण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी केला आणि माझ्यावर ही कामगिरी सोपविण्याचा निर्णयही त्यांनी पक्का केला. कामगिरी अवघड होती. श्रेष्ठींशी तशी जवळीक नव्हती. पण कामाची तर जबाबदारी होती. कार्यकर्ते जिद्दी बनले होते. स्थानिक वाटाघाटी निराशा निर्माण करीत होत्या. त्यातूनच मग एक दिवस ठरल्याप्रमाणे मी पुण्यास देव-जेधे यांच्या भेटीसाठी गेलो. चर्चा केली. कार्यकर्त्यांची इच्छा सांगितली. जेधे त्यामधे काहीसे अनुकूल दिसले; पण निर्णय कुणीच दिला नाही. मी तसाच सातारला परतलो. यश मिळालं नव्हतं. पण कार्यकर्ते स्वस्थ बसण्यास तयार नव्हते.

मुंबईपर्यंत जावं आणि निर्णय करून घ्यावा, असा त्यांचा आग्रह सुरू झाला. ‘भाड्यासाठी पैसे द्या, मी मुंबईला जातो’, असं त्यांना सांगितलं आणि अखेर एक दिवस मुंबईला पोचलो. सरदार पटेल हे त्या वेळी मुंबईला आपल्या मुलाकडे राहत होते. त्यांच्या घरी गेलो आणि भेटीसाठी चिठ्ठी आत पाठवली. बराच वेळ झाला, तरी काही जमेना आणि भेटीचं लक्षण दिसेना. म्हणून मग तिथेच बैठक मारली. थोड्या वेळानंतर सरदार पटेलांनी बोलावलं आणि कुठले, कोण, का आलात वगैरे विचारलं. धाडस करून सांगितलं. सीनिअर बी. ए. च्या वर्गातला मी एक विद्यार्थी. खालच्या वर्गातून आलेला मी एक कार्यकर्ता, हेही त्यांच्या नजरेस आणलं. सरदारांनी सर्व ऐकून घेतलं. पण हो नाही; आणि नाही, असंही नाही. सरदारांनी मनाचा थांगपत्ता लागू दिला नाही.

मी सातारला परतलो. कार्यकर्त्यांना सर्व सांगितलं; कोणालाच काही सुचत नव्हतं, अन् आश्चर्य असं की, चार दिवसांनंतर उमेदवारांची नावं जाहीर झाली, त्यांमध्ये आत्माराम पाटील यांचा समावेश झालेला होता. सा-यांनी नि:श्वास सोडला. पहिल्या फेरीत तर विजय संपादन केला होता. पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समोर कामाचा, अडचणींचा डोंगर उभा राहिला. प्रत्यक्ष निवडणुकीचं आणि प्रचारकार्याचं काम हा प्रश्न भंडावू लागला. जवळ पैसा नाही, साधनं नाहीत, जिल्ह्यातले सन्मान्य नेते तटस्थ. त्यांचा जिव्हाळा कमी. निवडणुकीचा पहिला अनुभव मी घेत होतो. प्रचारमोहिमेचा पहिला धडा, पहिलं शिक्षण घेणारा मी प्रमुखांपैकी एक होतो. पण कार्यकर्त्यांची जिद्द दांडगी. सारा जिल्हा सभा-भाषणांनी ढवळून काढावा, असं सर्वांनी ठरवलं. जिद्दीनं सारे कामाला लागले, तहानभूक विसरले. हळूहळू जम बसू लागला आणि पक्षाचं नशीब असं बलवत्तर की, सातारा जिल्ह्यातून जे उमेदवार निवडणूक लढवीत होते, त्या सर्वांपेक्षा आत्माराम पाटील यांना सर्वांत जास्त मतं मिळाली. महाराष्ट्रातही सर्वाधिक मतं मिळविणा-यांपैकी ते एक विजयी उमेदवार ठरले. निवडणूक संपली. तरुण कार्यकर्त्यांना विजय मिळाला; पण खरी अडचण पुढेच होती. मनं फाटली होती. विजयानंतर तर फाटलेली मनं अधिकच उधळतात. हे सारं सांभाळायचं होतं. रोखायचं होतं, पण विजयाचं मूल्य जोखणा-या जिल्ह्याच्या सन्माननीय नेत्यांनीच स्वतःला सावरलं आणि त्यामुळे कार्यकर्तेही सावरले गेले. निवडणूक संपल्यानंतर भाऊसाहेब सोमणांनी संघर्ष सावरून धरला. इतकंच नव्हे, कार्यकर्त्यांच्या पाठीशी त्यांनी आपला आशीर्वादही उभा केला. आज मागे वळून पाहताना, निवडणुकीतील तो पहिला विजय किती तरी आठवणींची उजळणी मनात करून जातो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org