शब्दाचे सामर्थ्य २९

आठवणींचा गुच्छ : २

१९३१ साली शिक्षा भोगून मी तुरुंगाबाहेर आलो. तुरुंगातून मुक्त झालो होतो; परंतु चळवळीच्या विचाराच्या पगड्यातून सुटका झाली नव्हती. उलट, ते विचार अधिक प्रक्षोभक बनले होते आणि त्यांतूनच चळवळीच्या प्रचारासाठी बुलेटिन्स वाटणं, तरुणांमध्ये जागृती करणं या कामास प्रारंभ झाला आणि त्याची परिणती, कराडच्या म्युनिसिपालिटीवर काँग्रेसचा झेंडा फडकावण्याचा बेत आम्ही तरुण कार्यकर्त्यांनी मुक्रर केला आणि एक संधी साधून झेंडा फडकाविला. १९३२ सालाची ही घटना, त्यामुळे पुन्हा तुरुंगाची वारी करण्याचा प्रसंग निर्माण झाला. तुरुंगातून बाहेर येण्यासाठी १९३३ साल उजाडलं आणि मगच मॅट्रिकच्या वारीची तयारी सुरू झाली. १९३४ साली मॅट्रिक झालो, त्या वेळी वयाच्या एकविसाव्या वर्षात पदार्पण केलं होतं. मॅट्रिक पदरात पडण्यास वयाचं एकविसावं साल उजाडलं. तीन-चार वर्षं गेली. पण ही वर्षं वाया गेली, असं मला कधीच वाटलं नाही. राजकीय विचाराच्या दृष्टीनं तो प्रारंभीचा काळ मला आजही महत्त्वाचा वाटतो. कारण याच काळात तुरुंगामधे असताना मला विविध राजकीय प्रवाहांचं वाचन करता आलं. समाजवादाचे विचार त्या काळात जोर धरून उठले होते. मार्क्सच्या विचारांचा अभ्यासही सातारच्या भूमीत रुजवला जात होता. विचार, संस्कार, चर्चा, संभाषणं निरनिराळ्या गटांत सुरू होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण त्याग करू शकतो, ही भावना वाढत होती. दलित जनतेची दुःखं दूर करण्याच्या विचाराला आणि कृतीला प्राधान्य दिलं जात होतं.

मार्क्सचं तत्त्वज्ञान आणि रशियन राज्यक्रांतीवरील ग्रंथ मी वाचीत होतो. एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेलेच डांगे, मिरजकर, रणदिवे, पी. सी. जोशी, आदी काँग्रेसमधेच सवता सुभा निर्माण करण्याच्या तयारीत होते. त्याचा परिणाम माझ्या तरुण मनावर घडत होता. ३४-३५ चा काळ महाराष्ट्रात समाजवादी पक्षाची बैठक तयार करीत होता. राष्ट्रीय पातळीवर जयप्रकाश नारायण, नरेंद्र देव, अरुणा असफअल्ली, एस्. एम्. जोशी, अच्युतराव पटवर्धन, ना. ग. गोरे, आदी समाजवादी विचाराला निश्चित स्वरूपाची पक्षाची बैठक तयार करीत होते. काँग्रेसअंतर्गत या समाजवादी पक्षाच्या स्थापनेत मीही सहभागी झालो होतो. काँग्रेसमधील काहीजण या डाव्या विचारसरणीकडे झुकत होते; पण फक्त ‘भारताचं स्वातंत्र्य’ या विचारावर आणि ध्येयावर स्थिर झालेले निर्भेळ गांधीवादीही काँग्रेसमध्ये बहुसंख्येने होते, ते फक्त ‘स्वातंत्र्य’ पाहत होते. अन्य कोणत्या गोष्टीचा विचार त्यांना मान्य नव्हता. महात्माजींनी त्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्याच्या ध्येयाशी आणि विचाराशी बांधून ठेवलं होतं.

१९३४ ते ३८-३९ हा काळ त्या दृष्टीनं माझा वैचारिक संघर्षात आणि धामधुमीत गेला. एम्. एन्. रॉय यांचं नेतृत्व १९३७ नंतर जोर करून उठलं होतं आणि तरुण मनाला या नेतृत्वानं मोहिनी घातली होती. १९३९ मधे तासगावला एम्. एन्. रॉय हे एका परिषदेसाठी आले होते. त्यांचे विचार आणि विचारांतील जोश पाहून मी त्यांच्या जवळपास गेलो. पण दुस-या महायुद्धाच्या काळात, ब्रिटिशांच्या विरुद्ध उठावणी करण्याच्या बाबतीत त्यांच्या विचाराशी माझं जमेना.

काँग्रेसनं त्या वेळी पूर्ण विचाराअंती ब्रिटिशांशी असहकार करण्याचा निर्णय केला होता. ब्रिटिशांशी असहकार पुकारण्यात हिटलरच्या हुकुमशाहीला काँग्रेसचा पाठिंबा होता, असं नव्हे, रॉय मात्र घटपटादी वादात अडकून पडले आहेत, असं मला वाटत होतं, आणि त्यातूनच पुढे त्यांनी रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाला जन्म दिला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org