शब्दाचे सामर्थ्य २७

या सामुदायिक वाचनानंतर इतरही काही पुस्तकांच्या सामुदायिक वाचनाची पद्धतही आमच्या बराकीमध्ये रूढ झाली, याचे नेतृत्वही आचार्य भागवत यांच्याकडे होते. ते उत्तम शिक्षक असल्यामुळे आपल्याला जे आवडते आणि माहीत आहे, ते सर्वांना सांगून जाणते करावे, हा त्यांचा स्वभावधर्म  होता आणि त्यामुळे ते मोठ्या आनंदाने हे काम करीत असत. या तर्‍हेने शिक्षण देण्याची त्यांना हौस होती, पण त्याचबरोबर अर्धवट. अपु-या त-हेने वाचन करणा-या लोकांवर त्यांचा राग होता.

मला एकदा आठवते. एक चांगले वकील असलेले गृहस्थ ‘गीतांजली’वाचत होते. त्यांना काही शंका उद्‍भवल्या, म्हणून ते आचार्य भागवत यांना विचारू लागले.

‘आचार्यजी, मी‘गीतांजली’वाचतो आहे. परंतु त्यातल्या ‘दाऊ’ आणि ‘हिम’ यांचा नेमका अर्थ काय ?’ आचार्यांच्या डोळ्यांत आग उभी राहिली.

‘तुम्ही रवींद्रनाथांची‘गीतांजली’ वाचता आहात आणि त्यातल्या ‘दाऊ’ आणि ‘हिम’ चा अर्थ तुम्हांला कळत नसेल, तर वाचायचे बंद करा !’ असे तुसडे उत्तर देऊन ते मोकळे झाले.

जिज्ञासूला शिक्षित करावे, परंतु दांभिकपणाने वाचन करणार्‍यांचा तिरस्कार करावा, अशी त्यांची मनोवृत्ती होती.

मी भुस्कुटे यांच्याकडेही जाऊन बसत असे आणि त्यांच्याकडून मार्क्सवादाचा विचार समजावून घ्यायचा प्रयत्‍न करी. भुस्कुटे हे आचार्यांसारखे प्रतिभासंपन्न विद्वान नव्हते; परंतु त्यांनी आपला मार्क्सवादाचा अभ्यास अत्यंत प्रामाणिकपणाने चालू केला होता. त्यावरील काही ग्रंथांचे मराठी वाचकांसाठी भाषान्तर करण्याच्या कामातही गुंतले होते. त्यांनी दिलेली ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ ही पुस्तिका मी त्यांच्याजवळ बसूनच समजावून घेऊन अभ्यासली. मार्क्सच्या विचारांचे, पुसट का होईना, दर्शन व्हायला ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ ही पुस्तिका पुरेशी आहे, असे माझे तेव्हापासून मत बनले आहे.

एस्. एम्. जोशी हे विशेषतः तरुण कार्यकर्त्यांच्या चळवळीकडे आणि त्यांच्या प्रश्नांकडे मोठ्या आत्मीयतेने पाहत असत. ते त्या वेळी   ‘यूथ लीग’ चे पुढारी होते. बारा नंबरच्या बराकीमध्ये एके दिवशी संध्याकाळी युवक चळवळीच्या संबंधाने त्यांचे एक सुरेख व्याख्यान झाल्याची मला आठवण आहे. त्यांची त्या विषयाची तळमळ आणि स्वातंत्र्यासंबंधी असलेल्या भावनेची तीव्रता, सर्व जातींच्या मंडळींना एकत्र घेण्यासाठी वाटणारी गरज या त्यांच्या विचारसरणीने माझ्या मनात त्यांच्याबद्दल जिव्हाळा निर्माण झाला. दररोज चाललेल्या वादाच्या खटपटीत ते फारसे भाग घेत नसत. प्रसंगोपात्त ते वादात पडत. परंतु जेव्हा पडत, त्यांच्या सेवाभावी वृत्तीबद्दल मला फार मोठा आदर वाटण्यासारखा अनुभव या काळात आला. जेलमध्ये त्यांनी सत्याग्रहींचे केस कापण्याचे आणि दाढी करण्याचे काम आपणहून आपल्याकडे मागून घेतले आणि हळूहळू ते त्यात थोडे-फार तज्ज्ञ झाले, असे म्हणायला हरकत नाही. हे काम ते मोठ्या आनंदाने आणि हसत-खेळत करीत असत. त्यामुळे एस्. एम्. जोशी हे बाराव्या बराकीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org