शब्दाचे सामर्थ्य २५६

पंतप्रधान शास्त्री सोडून गेले. संकटाच्या डोंगरावरील चढउतार संपला नव्हता. शास्त्रीजी गेले आणि पंतप्रधान कोण होणार, हा वाद वाढला. इंदिराजी, की मोरारजी, असा तो वाद होता. बरीच भवति न भवति झाली आणि एक दिवस 'पंतप्रधान इंदिराजी' हे देशाला आणि जगाला कळलं. देशाची गाडी नीट रुळांवरनं चालली, असं वाटलं. पण नियतीच्या मनात दुसरंच काही तरी होतं. ६६ च्या नोव्हेंबरात एक दिवस साधू मंडळींनी गोहत्या - बंदीसाठी उठाव केला आणि दिल्ली उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला. त्या वेळी मी मुंबईत होतो. माझ्यावर एक शस्त्रक्रिया झाली होती आणि प्रकृती सुधारण्याची वाट पाहत होतो.

अचानक एक दिवस दिल्लीचा फोन खणखणला. ७ नोव्हेंबर हा तो दिवस असावा. मी गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी दिल्लीची इच्छा होती, सांगी होती. विचार करायलाही फुरसत नव्हती. साधू मंडळीनी दिल्ली डोक्यावर घेतली होती आणि कणखरपणे इलाज हवा होता. प्रकृतीच्या त्या अवस्थेतही मला दिल्ली गाठावी लागली आणि १४ नोव्हेंबरपासून गृहमंत्रिपदाचं काम सुरू केलंही. कामाच्या पहिल्याच आठवड्यात, मला आठवतं, विद्यार्थ्यांच्या अखिल भारतीय उठावाला काबूत आणण्याचा प्रश्न निर्माण झाला. गोहत्या - बंदी आणि साधू हा प्रश्न तयारच होता. एकामागून एक अशी संकटांची रस्सीखेच सुरू असतानाच ६७ च्या निवडणुका आल्या आणि देशाचं सारं चित्रच बदललं. काँग्रेस पक्षाला काही राज्यांत हादरा बसला. लोकसभेत अस्थिरता वाढली आणि सर्व देशातच कायदा आणि सुव्यवस्था हा प्रश्न डोकं वर काढीत राहिला.

सामान्य माणसाचं सुख हेच लोकशाही राज्याचं अंतिम ध्येय ! हे ध्येय साध्य करण्यासाठी आर्थिक नियोजनाचा कार्यक्रम यशस्वी करण्याची गरज देशात तीव्रतेनं निर्माण झाली होती आणि काँग्रेसला सर्व शक्ती पणास लावायला हवी होती. तसा प्रयत्‍न प्रत्यक्षात सुरू होताच. काँग्रेसअंतर्गत स्फोटाचे आवाज निघू लागले आणि त्यांतून १९६९ चा बंगलोरचा इतिहास घडला. काँग्रेसचा महासागर घुसळला जात होता. त्यातून काय काय वर येईल, याकडे सा-या देशाचं, जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. ठोकळेबाज आणि सैद्धान्तिक भूमिका दूर ठेवून, देशासमोरील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेसचा नव्या वाटांचा शोध सुरू होता आणि वाटा अडविण्यासाठी मोठमोठे मोहरे इरेला पडत होते. ६९ चं बंगलोर आणि त्यानंतर सुरू झालेलं पर्व हा सारा ताजा इतिहास आहे. 'बांगला देशचं स्वातंत्र्य' देशाच्या अलीकडील इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिलेली पानं आहेत. या सा-याच घटनांचा शोध आणि बोध घ्यावा लागणार आहे. इतिहासकारांनी पुढेमागे ते काम करावं. हा इतिहास अजून पुरा झालेला नाही. तो घडतो आहे.

१९४६ पासून इथे, तिथे असा कुठेतरी मी सत्तेत राहिलो आहे. लौकिक अर्थानं प्रतिष्ठा, वैभव, मानाची जागा हे वाट्यास आलं. तरीपण गैरसमज, टीका, मानसिक यातना अशा काटेरी मुलखातून सतत प्रवास करावा लागला. लढ्याच्या काळातले मित्र सच्चे राहिले, तर सत्तेच्या काळातले काही नकली निघाले. सत्तेच्या राजकारणातच ते मित्र म्हणून जवळ आले. माझी त्याबद्दल तक्रार नाही. कारण हा राजकारणाचा स्वभावही असेल. पण आनंद आहे, की या सा-या संघर्षातही तर्कशुद्ध विचारांचा पाठपुरावा, विषमतेला विरोध व समतेचा विचार यांची संगत कधी सुटली नाही. सत्ता ही ध्येयाकरता वापरायची, हे एक, आणि निर्णय अत्यंत निर्धारानं करावेत, पण अंमलबजावणी मानवी सहानभूतीनं करावी, त्यात सत्तेचा आवेश असू नये, असं माझं तत्त्वज्ञान आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org