शब्दाचे सामर्थ्य २५३

माझ्या जिल्ह्यात - सातारा जिल्ह्यात मी देशासाठी, समाजासाठी काम सुरू केल्यानंतर कालांतराने लोक मला नेता समजू लागले, म्हणू लागले. त्या वेळी मात्र नेता या शब्दाने माझ्यासमोर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे केले. नेता, नेतृत्व हे शब्द आजकाल बरेच घसरडे झाले आहेत. चेष्टाविषय बनले आहेत. परंतु नेता, नेतृत्व हे शब्द माझ्या बाबतीत उच्चारण्यास प्रारंभ झाला, या प्रारंभीच्या काळापासून माझ्या विचारचक्राला एक वेगळी गती मिळत राहिली. नेतृत्वाचा अर्थ काय? खरा नेता कोण? नेत्याचे आणि नेतृत्वाचे स्थान आणि भान कोणते? असे अनेक प्रश्न मनात गर्दी करू लागले. पुढे  स्वातंत्र्यपूर्वकाळातील नेता आणि नेतृत्व व स्वातंत्र्योत्तर लोकशाही जमान्यातील नेता आणि नेतृत्व यांतील फरक तीव्रतेने जाणवू लागला.

खरे म्हणजे, लोकांना योग्य त-हेने, योग्य ठिकाणी नेतो, तो नेता. उदात्त उदाहरण घालून देणे, प्रगल्भ प्रात्यक्षिक निर्माण करणे म्हणजे नेतृत्व करणे होय. कोणत्याही समस्येत नेता हा अग्रभागी असावा लागतो. त्याला सर्वांच्या पुढे राहावे लागते. समस्या निर्माण करण्यासाठी आणि निर्माण झाल्यावर, सर्वांच्या अगोदर त्याला तेथे पोहोचावे लागते. पोहोचल्यावर अखेरपर्यंत थांबावे लागते. नेता असणा-याला, नेतृत्व करणा-याला सर्वांच्या अग्रभागी, शिरोभागी राहावे लागते, पण ते श्रेणीने - सर्वांच्या शिरोभागी म्हणजे प्रत्यक्ष डोक्यावर नव्हे. तसा तो डोक्यावर बसून राहिला, तर त्याला ज्यांचे नेतृत्व करावयाचे आहे, त्यांच्या भावना, आशा-आकांक्षा स्वभावातःच तो पायदळी तुडवू लागतो. असे घडले, म्हणजे त्या नेत्याबद्दलचा, नेतृत्वाबद्दलचा आदर संपुष्टात येतो. इतकेच नव्हे, तर ते नेतृत्वही संपुष्टात येते. ज्याला नेतृत्व करावयाचे आहे, त्याने अशी काही पथ्ये पाळली पाहिजेत.

लोकशाहीच्या जमान्यात नेतृत्व करणार्‍या नेत्याने लोकशाही म्हणजे एक लोकसंस्था आहे, याचा विसर पडू देऊ नये. लोकशाहीत जो नेता लोकांशी निरंतरचा संलग्न राहून लोकांचा आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवितो, त्यालाच लोक आराध्यदैवत मानतात. लोक, लोकसंस्था आणि नेता यांच्यांत खरेखुरे तादात्म्य नांदले, तर नेत्याच्या शब्दाला ब्रह्मवाक्याचे रूप प्राप्त होते. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, स्वा. सावरकर, महात्मा फुले हे या श्रेणीचे नेते होऊन गेले.

या नेत्यांनी लोकनेतृत्व तर केलेच, त्याचबरोबर नेता हा नीतिमान असावा लागतो, तसा तो असलाच पाहिजे, हा आदर्शही त्यांनी प्रत्यक्ष आचरणाने देशासमोर, जगासमोर ठेवला. हा आदर्श स्वीकारावाच लागतो. मी तरी, माझ्या आयुष्यात सद्‍गुणाचे हे कण वेचण्याचा आणि साठविण्याचा प्रयत्‍न केला. देश, देशातील लोक, लोकशाही यांवरील माझी श्रद्धा दृढमूल बनली, ती त्यामुळेच.

श्रद्धा ही एक शक्ती आहे. सत्य धारण करते, ती श्रद्धा. सत्याचा पाठपुरावा हा त्या अर्थाने श्रद्धेचाच पाठपुरावा असतो. अढळ आणि निस्सीम श्रद्धा सत्याच्या आचरणातून, तशा आचरणामुळेच वाढते आणि स्थिर बनते. अढळ आणि निस्सीम श्रद्धा मानवाला सर्वस्वाचा स्वाहाकार आनंदाने करण्यास सिद्ध बनवते. स्वातंत्र्याविषयीची श्रद्धा ज्यांनी जोपासली, त्यांच्या सर्वस्वाच्या स्वाहाकाराची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. इतिहासाने त्यांची नोंद घेतलेली आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org