शब्दाचे सामर्थ्य २५२

मला वाटते, विशाल आणि विधायक विचाराची स्वप्ने साकार करावयाची, प्रत्यक्ष कृतीने दर्शवायची, तर त्यासाठी आणखी काही आत्मसात करावे लागत असावे. ज्यांनी ही स्वप्ने साकार केली, प्रत्यक्ष कृती केली, त्यांनी आपले विचार मेंदूत अडकवून ठेवले नाहीत. ते रक्तात भिनविले. देशाला स्वतंत्र करण्याचे विचार पूर्वीच्या पिढीने रक्तात भिनविले, म्हणूनच त्यांच्याकडून विधायक कृती घडली असली पाहिजे. क्रांतिकारकांनी इतिहास घडविला, तो त्यांचे रक्त तापलेले होते, असे आपण म्हणतो. याचा खरा अर्थ, त्या तरुणांनी देशाच्या स्वातंत्र्याचे विचार रक्तात भिनविले होते, असाच केला पाहिजे. देश सर्वार्थाने सुखी बनविण्याचा विचार स्वातंत्र्योत्तर नव्या पिढीने असा रक्तात भिनविला, तर नव्या पिढीकडून विधायक कार्य घडू शकेल, यावर माझा विश्वास आहे.

समाजातील मूलगामी अशा काही प्रश्नांचा नवीन पिढीला विचार करावा लागणार आहे. काही आव्हाने स्वीकारावी लागणार आहेत. ती आव्हाने देशातील गरीब, दरिद्री समाजाबद्दलची असतील, माणसांच्या मूलभूत गरजांसंबंधी असतील, निर्धन बहुजन समाज, छोटे शेतकरी, औद्योगिक कामगारांच्या संबंधांतील असतील, समाजपरिवर्तनाची, जातीयवादाच्या समस्येची असतील, अल्पसंख्य समाजाची, उपेक्षित समाजाची, अस्पृश्यतेची, चातुर्वर्ण्याची, भटक्या - विमुक्तांची असतील. या आणि प्रादेशिक वाद, विभक्ततावाद अशा देशासमोरील काही गंभीर समस्यांचा विचार आता नव्या पिढीला, तरुण पिढीलाच करावा लागणार आहे. नव्या पिढीने हा विचार केला आणि रक्तात भिनविला, तरच देशाचे, देशातील समाजाचे चित्र ही पिढी दुरुस्त करू शकेल, बदलू शकेल.

देश सुखी करावयाचा, तर देशाने स्वीकारलेल्या सामाजिक, राजकीय, राष्ट्र-विकासाच्या कार्यांत सर्वांना समान पातळीवर, सहका-यांच्या नात्याने सामील करून घेणे आणि त्यासाठी वर उल्लेखिलेल्या सर्वांच्या मनात विश्वास निर्माण करणे हे मूलभूत राष्ट्रकार्य स्वातंत्र्योत्तर काळातील पिढीसमोर, आव्हानरूपाने उभे आहे.

या कामाला वाहून घेण्यासाठी, हजारो, नव्हे, लाखोंच्या संख्येने तरुणांना झेप घ्यावी लागेल. दुस-या महायुद्धानंतर सर्वस्व गमावलेले जपान, जर्मनी देश राखेतून उभे राहिले आणि त्यांनी उद्योग, व्यापार, अर्थव्यवस्था, जीवनमान, संशोधन, आदी क्षेत्रांत आघाडी प्रस्थापित केली. इतकेच नव्हे, तर जगासमोर एक आगळे आव्हान घेऊन ते उभे राहिले. अशी वस्तुस्थिती सांगितली जाते. हे कोणी घडविले? युद्धोत्तर काळातील तेथील नव्या पिढीने हा कायापालट घडविला आहे, याचे भान देशातील आजच्या आणि उद्याच्या पिढीला ठेवावेच लागेल.

क्रांतीचा विचार असो व शांतीचा, तो रक्तापर्यंत पोहोचवावाच लागतो, तरच तो जीवनाला ऊब आणतो. विधायक विचाराचे बी रक्तात भिजत घातले, रुजवले, तरच त्याला कोंब फुटतात आणि कालांतराने फळ धरते, अशी इतिहासाची साक्ष आहे.

देश स्वतंत्र होण्यासाठी, देशातील सर्व लोकांनी सुखी बनावे, यासाठी काहीतरी करावे, असे विचार, माझ्या लहानपणी मेंदूत शिरले, ते त्या वेळेच्या वाचनामुळे, अभ्यासूंचे, श्रेष्ठ नेत्यांचे विचार ऐकल्यामुळे. त्यातून कामाचा वसा मी घेतला. काम करता-करता मेंदूतील विचार हृदयात उतरू लागले. हळूहळू ते विचार हृदयात स्थिर झाले. देशाच्या, समाजाच्या कामासाठी मी अनेकांशी बोलत होतो आणि प्राप्त परिस्थितीत विचारही करीत होतो. काही वेळेस मनात विचारांचा झगडा उभा राहत होता, तर कधी कधी विकाराचा झगडा मनाला सतावीत होता.

पंरतु पुढे-पुढे बोलून विचार करावा, यापेक्षाही विचार करूनच बोलावे, असा मनाचा पिंड बनला. मेंदूतील विचारांचा नकळत हृदयाशी मिलाप होऊ लागला, विचार रक्तात पसरण्याची प्रक्रिया त्यातूनच सुरू झाली असली पाहिजे. विचार, उच्चार आणि आचार यांची संगती हे त्या प्रक्रियेतून निर्माण झालेले सहजस्वरूप म्हणावे लागेल.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org