शब्दाचे सामर्थ्य २५१

लोकसत्ता म्हणजे लोकांची सत्ता, अशा शब्दशः अर्थ असला, तरी लोकसत्तेचा खरा अर्थ व्यक्तिमात्राची स्वतःवरील पूर्ण सत्ता, प्रत्येक व्यक्तीचे स्वतःपुरते संपूर्ण स्वातंत्र्य, असाच करावयास पाहिजे. अनेकांची एकावरील सत्ता म्हणजे लोकसत्ता नव्हे. भारतीय लोकराज्यात, येथील लोकशाहीत, प्रत्येक व्यक्ती हीच श्रेष्ठ सत्तेचे केंद्र, संपूर्ण स्वातंत्र्याचा अधिकार-बिंदू राहिला, असेच अभिप्रेत आहे. लोकशाही म्हणजे समूहशाही किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य रसातळाला नेणारी कंपूशाही नव्हे, याची जाण ठेवावीच लागते. तशी ती ठेवली पाहिजे.

समूहशाहीचा, कंपूशाहीचा अहंकार आपल्या जीवनात निर्माण होऊ नये, यासाठी लोकशाहीतील प्रत्येक व्यक्तीने सावध राहिले पाहिजे, सावधानता राखलीच पाहिजे, आणि हे शक्य आहे. लोकशाही किंवा सामुदायिक सत्ता याचा अर्थ अनेकनिष्ठ एकात्मता, असाच मी तरी करतो. जनतेची, सगुणाची उपासना मला त्यामुळेच करता आली.

देश सर्वतोपरी सुखी राहील, असे वर्तन प्रत्येक व्यक्तिमात्राने करणे म्हणजेच मी उपासना मानतो, देशसेवा म्हणजे तरी काय? देशाची, देशातील लोकांची सेवा, तीच उपासना. देशाची - आणि म्हटले, तर देवाचीही. देश आणि देव यांत काहीच अंतर नसते. अंतर मानावयाचेही नसते. महाराष्ट्रातील संतांची, राष्ट्रसंतांची ही शिकवण बालपणापासून माझ्यासमोर आहे. आपल्या सभोवताली समाज आणि देव यांत माझ्या आईने कधी अंतर निर्माण होऊ दिले नाही, हे मी लहानपणी अनुभवलेले आहे. ही शिकवण जेथे मिळते, त्याच मातीत मी जन्मलो आणि वाढलो. माझा व्यक्तिगत प्रपंच आणि राष्ट्रप्रपंचही तिथेच सुरू झाला.

मी प्रांपचिक आहे आणि राजकारणीही आहे. 'प्रपंचीं जाणे राजकारण' ही सज्जनगडची शिकवण समोर राहिल्याने राजकारणाशिवाय केलेला प्रपंच हा खरा प्रपंच नव्हेच, असे मी मानले, ती शिकवण माझ्या ठिकाणी नित्य जागृत राहिली. जिवंत राहिली. ती जिवंत आहे, तोपर्यंत देशसेवेचे, सगुण उपासनेचे बोट धरूनच माझी वाटचाल होत राहणार, हे निःसंशय. यातून काही व्यक्तिगत तोटा होईल, झालाही असेल, टीका ऐकावी लागेल, तशी ऐकलीही.

परंतु व्यक्तिगत प्रपंचात आणि राजकारणाच्या प्रपंचात पाळावयाची पथ्ये तशी वेगळी असतात. राजकारणाचा प्रपंच करताना दुस-याचं अंतःकरण जाणावं लागतं. अडचणीत न सापडण्याची खबरदारी घ्यावी लागते. समय ओळखावा लागतो. प्रसंगी नम्र व्हावे लागते. लोकांची पारख करावी लागते. प्रामाणिक आणि फितूर, दोन्ही गृहीत धरावी लागतात. दोष आढळला, तर तो अवगुण मानावा लागतो. वेळप्रसंगी त्याकडे काणाडोळा करावा लागतो. विरोधकांशी त्यांच्याच शस्त्राने लढावे लागते. तसे करणे कित्येकदा आवश्यकच असते. दूरदर्शीपणाने काही कयास बांधावे लागतात आणि पुन्हा सर्वांना बरोबर घेऊन पुढे जावे लागते.

देशाचे, देशातील लोकांचे सुख समोर ठेवून यथाशक्ति, यथामति आचरण करण्यावर गेली पाच-सहा दशके माझा कटाक्ष राहिला. हा कटाक्ष सांभाळूनच राजकारणात, कार्यकर्त्यांना, साथीदारांना आवश्यक असे मार्गदर्शन - उपदेश म्हणा, हवं तर - करण्याचं महत्त्वाचं काम प्रामणिकपणाने केले.

हे सारे घडले, पण हे कसे आणि कशामुळे घडले, याचा मी विचार करतो, तेव्हा विचाराशी येऊनच थांबावे लागते. विचाराने माझ्याशी किंवा मी विचाराशी जी अहर्निश सोबत केली, त्याचे हे फल मानले पाहिजे.

विचार म्हणजे वाचनाने, अध्ययनाने, व्यासंगाने मेंदूत साठविलेले विचार, असे बहुतांशी मानतात. विचाराची मी सोबत केली, मेंदूत साठविण्याचा प्रयत्‍न केला, हे सत्य असले, तरी मला जी फलप्राप्ती होऊ शकली, ती केवळ विचाराची अहर्निश सोबत ठेवल्यामुळेच प्रामुख्याने मिळाली, असे मी मानत नाही. तसे पाहिले, तर वाचनाने, अध्ययनाने, व्यासंगाने विचारवंत बनलेले पुष्कळ असू शकतात. मर्यादित प्रमाणात त्याची फलप्राप्तीही त्यांना झालेली असेल. परंतु काही विचारवंतांच्या बाबतीत असेही आढळते की, विशाल विचार, विधायक विचार मेंदूत जमा झालेले आहेत, परंतु त्यांची हृदयाशी ताटातूट झालेली कायमच आहे ! वास्तवात ते अवतरत नाहीत किंवा अवतरलेले नाहीत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org