शब्दाचे सामर्थ्य २५

हे दोन्ही प्रयोग जवळजवळ महिनाभर चालू होते. त्यानंतर आमचाही आत्मविश्वास वाढला. इतर इंग्रजी पुस्तके वाचण्याची आमची इच्छा जागी झाली. कधी इतरांच्या शिफारशीवरून, तर कधी आपल्या आवडीवरून, आम्ही पुस्तके निवडू लागलो व वाचू लागलो.

राजकीय विचारांच्या वेगवेगळ्या छटा आणि त्यांचा परस्परांशी संबंध याचाही आता बराकीमध्ये चर्चेच्या रूपाने व्यासंग सुरू झाला होता.

आचार्य भागवत हे कट्टर गांधीवादी म्हणून प्रसिद्ध होते आणि गांधीवादाची ते बौद्धिकदृष्ट्या उकल करून सांगत असत. गांधीवादाच्या चर्चेबरोबरच समाजवाद आणि मार्क्सवाद याही विचारांची बराकीतील या वर्गात चर्चा सुरू झाली आणि त्याला पोषक असे वाङ्मयही आम्हां लोकांना वाचण्यासाठी मिळू लागले. आमचे राजकीय शिक्षण हे या पद्धतीने नियमित सातत्याने व मोठ्या तीव्रतेने सुरू झाले. काय वाचावे आणि काय वाचू नये, असे वाटावे, इतक्या पुस्तकांचा साठा तेथे जमला होता. एस्.एम्.जोशी. ह. रा. महाजनी ही तरुण मंडळी गांधीवाद स्वीकारलेल्यांपैकी दिसत नव्हती. त्यांच्या मनांत त्यासंबंधी अनेक शंका होत्या व ते त्या वेळावेळी विचारात असत. स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी समाजवादाचा विचार आवश्यक नाही का, असे प्रश्न उभे करीत आणि त्यांचे हे प्रश्न बरोबर आहेत, असे मला वाटे.

वि.म. भुस्कुटे हे मार्क्सवादाचे नवे भोक्ते होऊ घातले होते. त्यांच्या मताने निव्वळ समाजवादाची पोकळ भाषा बोलून काही काम भागणार नाही, तर समाजवादाचा शास्त्रीय विचार करून, त्या विचाराची पद्धती राजकीय लढ्यात स्वीकारल्याशिवाय हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळणार नाही, असे विचार ते मांडत.

प्रथमतः मला अवघड वाटणार्‍या आणि माझ्या काहीशा आवाक्याच्या बाहेर असणार्‍या पुस्तकांच्या वाचनाला मी हात घातला. इंग्रजी शब्दकोशाचा वारंवार उपयोग करून आणि अवतीभोवतीच्या मित्रमंडळींशी चर्चा करून मी बर्ट्रांड रसेल यांचे  ‘गेट्स टु फ्रीडम’ हे पुस्तक वाचले. जवळ जवळ एक महिनाभर मी हे पुस्तक वाचत होतो. या पुस्तकाच्या वाचनामुळे विचारांच्या कक्षा किती व्यापक आहेत, याचा अंदाज आला आणि स्वातंत्र्याचा हा प्रश्न केवळ हिंदुस्थानपुरता मर्यादित नसून, सर्व मानवजातीमध्येच या प्रकारच्या विचाराने खळबळ माजविली आहे. याचीही कल्पना आली.

या पुस्तकाच्या वाचनानंतर आपण आणखी काही इंग्रजी पुस्तके वाचू शकू, असा आत्मविश्वास माझ्या मनात आला आणि त्याप्रमाणे गांधीजींच्या जीवनावर, लेनिनच्या जीवनावर असलेली पुस्तके मी पाहू लागलो.

मार्क्सवादाच्या मला समजणार्‍या वाङ्मयाबरोबर रशियन राज्यक्रांतीबद्दलही मी बरेचसे वाचले.‘टेन डेज दॅट शुक द वर्ल्ड’हे जॉन रीड् यांचे पुस्तक मागच्या बराकीत फार लोकप्रिय झाले होते. मी त्या पुस्तकावरील चर्चा आणि त्याचे प्रत्यक्ष वाचन, या दोन्ही तर्‍हांनी पुस्तक समजावून घेण्याचा प्रयत्‍न केला. रशियन राज्यक्रांतीची सगळी कहाणी रोमांचकारी आहे अणि त्यातील लेनिनचे कार्य जागतिकदृष्ट्या ऐतिहासिक स्वरूपाचे आहे.

लेनिनसंबंधीच्या गोष्टी डॉक्टर शेट्टी आणि ह.रा.महाजनी यांच्याशी बोलत असतानाच त्यांनी मानवेंद्रनाथ रॉय या हिंदी कम्युनिस्ट नेत्याचा उल्लेख केला आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. त्यांनी देशत्याग करून कशा प्रकारे वनवास पत्करला आणि हे वनवासाचे जीवन भटकत काढत असताना मेक्सिकोमध्ये त्यांनी कम्युनिझमचा स्वीकार कसा केला, त्याचप्रमाणे रशियन राज्यक्रांतीनंतरच्या बांधणीच्या काळात आंतरराष्ट्रीय कम्युनिझमच्या प्रसारानिमित्त उभारलेल्या संघटनेत रॉय यांनी लेनिनच्या बरोबर काही वर्षे काम कसे केले, या संबंधीच्या हकीकती त्यांनी मला विस्ताराने सांगितल्या. या हिंदी नावासंबंधी मला एक नवी जिज्ञासा वाटू लागली. डॉक्टर शेट्टी हे या सत्याग्रहात जेलमध्ये होते, तरी तेथून आपल्या सर्व मित्रमंडळींशी ते पत्रव्यवहाराने कसा संबंध ठेवतात आणि आपले विचार कळवीत असतात, याची काहीशी गुप्त माहितीही त्यांनी मला सांगितली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org