शब्दाचे सामर्थ्य २३६

७६

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, कराड
(६ डिसेंबर, १९७५)

नियोजित अध्यक्ष आणि साहित्यप्रेमी बंधुभगिनींनो,

मराठी साहित्य संमेलनाचा हा सोहळा साहित्यिक व साहित्यप्रेमी यांनी मिळून करावयाचा असतो. त्यामागे साहित्यविचार असतो व त्याचबरोबर उत्सवप्रियताही असते, हे मान्य केले पाहिजे. हा सोहळा लोकप्रिय होत आहे, हे गेल्या काही वर्षांच्या अहवालावरून दिसून येते. या सोहळ्याचे यजमानपण मराठी महामंडळाच्या वतीने यंदा कराडकरांनी केले आहे. तेव्हा त्यांचा प्रतिनिधी म्हणून सर्व मराठी साहित्यिक व साहित्यरसिकांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो.

कृष्णा-कोयनेच्या या प्रीतिसंगमावर तुम्हां सर्वांचे हार्दिक स्वागत करताना मला मनापासून आनंद वाटत आहे.

वाई, कराड, सांगली या कृष्णेच्या परिसरातील माती सुवर्णमय आहे. करहाटक म्हणजे सोने यापासून ते ग्रामनाम पडले, म्हणून नव्हे, तर या परिसरात जे पिकते, ते सुवर्णमय, म्हणून या मातीला मी सोन्याची माती म्हणतो. या भूमीची परंपरा तशी मोठी आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे संस्थापक संतशिरोमणी ज्ञानेश्वर हे ज्या नाथपंथाचे होते, त्या पंथाची मुळे इकडे खोल गेली होती. मच्छिंद्रनाथ काय किंवा गोरखचिंच काय, त्याचीच प्रतीके म्हणावी लागतील. रेवणसिद्ध सांप्रदाय याच बाजूला उत्कर्ष पावला आणि रामदासीबाणा या प्रदेशावर अद्यापिही प्रभाव पाडीत आहे. राजकारण आणि समाजकारण या विचारधारांचा प्रीतिसंगम ज्यांच्या जीवनात झाला, त्या आगरकरांची जन्मभूमी टेंभू येथून दीड-दोन कोसांवर आहे. येथे महाराष्ट्राच्या प्रख्यात ऐतिहासिक राजकुळांचा पायरव होता. 'नकट्या रावळा'-ची विहीर या स्थळाला ऐतिहासिक डूब देऊन गूढता आणते, तर येथील मनोरे आमच्या देशात येऊन स्थायिक झालेल्या इस्लामी संस्कृतीची साक्ष देतात. इतिहास-पुराणांच्या धुक्याने आणि कृष्णा-कोयनेच्या प्रवाहांनी त्या स्थानाला एक प्रकारची गूढता व रम्यता आली आहे.

कृष्णेचा हा सर्व परिसर मराठी साहित्याने गजबजलेला सुंदर मळा आहे. या जिल्ह्याने समर्थ रामदास आणि त्यांचे पंचायतन यांचे प्रासादिक वाङ्‌मय निर्माण केले. कै. केवलानंद सरस्वती आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या वास्तव्याने व कर्तृत्वाने विद्वत्तेची परंपरा इथे चालू राहिली. गिरीश-यशवंतादी रविकिरणांची प्रभा येथूनच पसरली. साधुदासांसारखे खंड-कवी, काव्यविहारींसारखे भावकवी आणि सुधांशूंसारखे भक्तिकवी याच परिसरातील. श्री. पु. पां. गोखले, आळतेकर, इत्यादी विद्वानांनी जीवनस्पर्शी समीक्षा लिहून येथूनच मराठीची सेवा केली आहे. कै. कृ. भा. बाबर, डॉ. सरोजिनी बाबर यांच्या वाङ्‌मयाने या मातीचा सुगंध दरवळतो.  मराठी साहित्याला कसदार ग्रामीण जीवनाची ओळख करून देणारे प्रतिभाशाली माडगूळकर बंधू आमच्या माणदेशाने मराठी साहित्याला दिलेली देन आहे. 'किर्लोस्कर' व 'स्त्री' या कृष्णेच्या परिसरात जन्म पावलेल्या मासिकांनी आधुनिक महाराष्ट्राला साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रात पुरोगामी दृष्टी दिली आहे. या साहित्य संमेलनाच्या या नगराला ज्यांच्या नावाने सुशोभित केले आहे, ते बाळासाहेब पंत प्रतिनिधी व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे साहित्य संमेलनाचे दोन माजी अध्यक्ष, ही साहित्य-क्षेत्रातील आमची अभिमानाची स्थाने आहेत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org