शब्दाचे सामर्थ्य २३५

याव्यतिरिक्त रंगमंदिराची सजावट आणि शिल्प यांचीही प्रदर्शने भरविण्याच्या योजनेसंबंधी विचार चालू आहे. मराठी नाट्य परिषदांच्या अधिवेशनासाठी अनुदान रूपाने आर्थिक साहाय्य केले जाते. त्याचप्रमाणे ख्यातनाम व सिद्धहस्त कलाकारांना व नाटककारांना प्रतिवर्षी आर्थिक साहाय्य देण्यात येते. नटवर्य बालगंधर्व यांना गेल्या वर्षी अडीच हजार रूपये प्रदान करण्यात आले; आणि या वर्षापासून त्यांना मासिक तीनशे रुपयांचे मानधन देण्यात येत आहे. रंगभूमीच्या विकासाच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा म्हणजे सोयिस्कर नाट्यमंदिरांची उणीव. मुंबईच्या रंगभवनासारखी खुली प्रेक्षागारे बांधणे किंवा बांधण्यास साहाय्य करून ती उणीव भरून काढण्याचाही महाराष्ट्र सरकारचा प्रयत्‍न चालू आहे. केंद्र सरकारने राजधानीत स्थापन केलेल्या साहित्य नाट्य अकादमीच्या द्वाराही नाट्यकला व साहित्य यांच्या प्रगतीला विविध प्रकारांनी हातभार लावला आहे.

अशा त-हेने राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपापल्या परीने मराठी रंगभूमीच्या वैभवात भर घालण्याचा प्रयत्‍न करीत असली, तरी रंगभूमीच्या विकासाचे दायित्व मुख्यत्वेकरून नाटककार आणि नट यांच्यावरच पडते. त्या दृष्टीने आजच्या या महत्वाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद श्रीमती दुर्गाबाई खोटे यांच्यासारख्या अनुभवी व प्रसिद्ध अभिनेत्रीने स्वीकारावे आणि नाट्य परिषदेला मार्गदर्शन करावे, हे उचित व इष्टही आहे.

श्रीमती दुर्गाबाई खोटे यांचा मुद्दाम परिचय करून देण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. त्यांनी आजपर्यंत चित्रपटांत विविध स्वरूपाच्या इतक्या भूमिका केल्या आहेत, की त्यांची नावनिशीवार यादी स्मरणात राहणे कठीण आहे. संगीत नाटक अकादमीने उत्कृष्ट चित्रपट-कलावंत म्हणून त्यांचा औचित्यपूर्ण गौरव केला आहे. १९५४ मध्ये झालेल्या अखिल भारतीय नाट्योत्सवात 'भाऊबंदकी' या नाटकास पहिले पारितोषिक मिळवून देण्यात फार मोठा भाग दुर्गाबाईंचा होता, हे नमूद करताना मला अतिशय आनंद होत आहे. योगायोग कसे असतात, पाहा; २५ मार्च, १९४८ साली मराठी रंगमंचावर त्यांनी प्रथमच 'आंदोलन' या नाटकात भूमिका केली व बरोबर तेरा वर्षांनी आज मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षाची भूमिका त्या करणार आहेत या संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची जी बिनविरोध निवड झाली, ही त्यांच्या अभिनय-कौशल्याची, नाट्य-साधनेची, बहुश्रुततेची साक्षच मानावी लागेल.

अनेक भाषा अवगत असलेल्या या सुविद्य अशा महाराष्ट्रीय अभिनेत्रीची मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली, हे योग्यच झाले. १९२७ साली श्रीमती गिरजाबाई केळकर यांच्याकडे हे मानाचे पान गेले होते. त्यानंतर आज नाट्य परिषदेच्या अध्यक्षस्थानी दुर्गाबाईंची निवड झाली आहे, ही समाधानाची गोष्ट आहे.

ह्या मेळाव्याच्या निमित्ताने मला स्वागताध्यक्ष म्हणून पाचारण करण्यात आले, त्याबद्दल मी चालकांचे पुन्हा एकदा आभार मानतो. तसेच, ह्या परिषदेत जे प्रतिनिधी व पाहुणे उपस्थित झाले आहेत, त्यांचे मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो व या परिषदशकटाची जबाबदारी सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती दुर्गाबाई खोटे यांना स्वीकारण्याची विनंती करतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org