शब्दाचे सामर्थ्य २२५

अशा परिस्थितीत, उत्तर आणि दक्षिणेकडील विचारप्रवाह, तसेच, बोलभाषा ह्यांचा संगम ह्या प्रदेशात होणे स्वाभाविकच होते. जवळजवळ एक हजार वर्षे असाच क्रम व उपक्रम चालू राहिल्यानंतर मुसलमानांचे पाय या भूमीला लागले. जुन्या विचारप्रवाहांत एक तिसरा प्रवाह येऊन मिळाला. महाराष्ट्राच्या पश्चिम किना-यावरील सागर-वाहतुकीच्या वर्दळीनेही विविध संस्कारांची भर या भाषेच्या विकासामध्ये पडत आली आहे. येथील गृहस्थाश्रमी लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनात, शब्दांचा जितका उपयोग केला नाही, त्यापेक्षा कितीतरी पट कोलाहल तेथील मैदानात पर्वतश्रेणीत भटकणा-या आणि संघर्ष करणा-या सेनांनी केला. महाराष्ट्राच्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीची ही देन आहे.

या सर्व कारणांमुळे मराठी भाषेवर आणि कालांतराने मराठी साहित्यावर असाधारण सर्वांगीणतेची, तसेच, सर्वसंग्राहकतेची छाप पडली. ह्याचा परिणाम असा झाला की, आर्य कुटुंबात निर्माण झालेल्या ह्या भाषेत काही द्रविड भाषांतील विशेष गुणांनी, तसेच, शब्दांनी प्रवेश केला. संस्कृत तसेच, भिन्न भिन्न प्राकृत आणि अपभ्रंश भाषांशिवाय अरबी आणि फारसी भाषांना मराठीत स्थान मिळाले. ह्या प्रक्रियेची कारणमीमांसा आणि त्याचा परिणाम यांवर विशेष प्रकाश टाकणे हे भाषाशास्त्रज्ञांचे काम आहे. मी एवढेच म्हणेन की, मराठीच्या ह्या सर्वसंग्राहक स्वरूपाचा मला खरोखरच अभिमान आहे आणि मराठी भाषेच्या ह्या विशेष गुणांमुळेच ह्या भाषेबद्दलची माझी श्रद्धा आहे.

भाषेच्या ह्या स्वरूपाचा प्रभाव मराठीच्या साहित्यावर पडणे स्वाभाविकच होते. गेल्या सात-आठ वर्षांपासून, ज्या विचारमंथनातून मराठी साहित्याने मार्ग काढला आहे, त्याची पार्श्वभूमी मराठी भाषेच्या इतिहासात सापडते. एकीकडे ही मराठी भाषा साधुसंत आणि धर्मप्रचारकांच्या उपदेशाचे माध्यम बनली आहे, तर दुसरीकडे हीच भाषा युद्धक्षेत्रात, शत्रूला ललकारून रणभेदीचा निनाद करताना आढळते. कल्पनातीत कोमलता, त्याचप्रमाणे वज्राची कठोरता हे दोन्ही भाव मराठीत सहजपणे सापडतात. जसजसा मराठी साहित्याचा विकास होत गेला, तसतसा ह्या साहित्यावर, काळ, परिस्थिती आणि लोकजीवन ह्यांचा परिणाम होत गेला व त्यामुळेच, त्या त्या काळांतील सर्वत्र विचारप्रवाह, आकांक्षा आणि सामान्य जनतेच्या आवश्यकतांचे प्रतिबिंब ह्या भाषेतील तत्कालीन साहित्यात आढळते. यादवकाळ आणि मराठा युग ह्या वेळी आमच्या कवितेने पोवाड्याचे रूप घेतले आणि वीररसप्रधान साहित्य निर्माण झाले. तर पेशवाईत आणि नंतरच्या काळात, लावणीने जन्म घेतला आणि मराठी कवितेत माधुर्याने प्रवेश केला. लावणीने मराठी भाषेला लावण्यमयी बनविले व ही लावणी स्वतः लावण्य शब्दाची प्रतीक बनली.

आधुनिक काळात, साहित्य हे मर्यादित स्वरूपात न राहता आता साहित्याने सारे लोकजीवन व्यापले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात जसजसे फेरबदल  झाले, त्या अनुरोधाने मराठी साहित्यातील विचारप्रवाह पण बदलत राहिले.

देश आणि समाजातील परिस्थितीचा साहित्यावर प्रभाव पडणे स्वाभाविकच असते. महाराष्ट्रातील संतांची वाणी, त्यांचे जीवन, तसेच, शिवाजीच्या काळातील मराठी वीरांची देशभक्तीची आणि शौर्याची कामे ह्यांचा तत्कालीन साहित्यावर काय परिणाम झाला, हे सर्वांना माहीतच आहे.

आता आमचा देश राजकीय बंधनांतून मुक्त झाला असून, त्याने स्वतंत्र प्रजासत्ताकाचे रूप धारण केले आहे. राजकीय उन्नतीबरोबरच आर्थिक उन्नतीसाठी अनेक योजना आमच्यासमोर आहेत. आता वैज्ञानिक, औद्योगिक आणि तांत्रिक विषयांवरील ग्रंथरचना, ह्यांना आमच्या शिक्षणात आणि साहित्यात एक उपयोगी अंग म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. असे असले, तरी ज्याला आम्ही अक्षर वाङ्‌मय म्हणतो, त्याची प्रत, ह्या सर्वांपेक्षा भिन्न असते. असे साहित्य मानवाच्या मूलभूत सद्‍भावांना आवाहन करते, आणि मानवाला जीवन संघर्षासाठी समर्थ बनविते. अशा साहित्यामुळे समाज नित्य प्रगतीला अभिमुख राहतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org