शब्दाचे सामर्थ्य २१९

त्या वेळी सर्वच प्रश्न वादग्रस्त होते, म्हणून मनाचा समतोलपणा ठेवण्याची नितांत गरज होती. त्या वेळच्या विरोधी पक्षांच्या लोकांनीही मला सांगितले की, तुम्ही मनाचा समतोलपणा सोडत नाही, ही आनंदाची गोष्ट आहे. महत्वाचे भाषण लोकसभेत किंवा विधानसभेत करताना ज्या प्रश्नांबद्दल बोलावयाचे आहे, त्या प्रश्नांची सर्व साधकबाधक माहिती जवळ असल्याशिवाय बोलणे योग्य नसते, म्हणून यासंबंधी टाचण व मुदे यांची गरज भासते. मी भाषण करताना ही सर्व कागदपत्रे भाषणापूर्वी काळजीपूर्वक वाचतो. परंतु भाषण करताना अशा टाचणांकडे पाहण्याची गरज भासत नाही. मुख्य मुद्दे कसे सांगावयाचे, सुरुवात कशी करावयाची व शेवट कसा करावयाचा, यासंबंधी मी मनात विचार करीत असे. भाषणाची सुरुवात व शेवट यांसंबंधी मी इतर क्षेत्रांतील भाषणाचा विचार करून ठेवतो. पुष्कळ वेळा मला समारंभात भाग घ्यावा लागतो. त्या वेळी अनेक वक्त्यांपैकी मी पण एक वक्ता असतो. त्या वेळी मोठी जबाबदारी वाटते. आपला एखादा नवा विचार व दृष्टिकोन सांगितला नाही, तर मला समारंभात जावेसे वाटत नाही. माझ्या निष्ठेप्रमाणे मी हे आतापर्यंत करीत आलो आहे. माझे मित्रही मला हे सांगत असतात.

भाषण रंगविण्यासाठी काही प्रसंगी काही आडाखे जरूर बांधावे लागतात. परंतु मला त्याची पूर्वतयारी करावी लागत नाही. आडाखे मी भाषणाला उभा राहिलो, म्हणजेच मला सुचतात, हा दैवी योग आहे. याबाबात प्रमुख गोष्ट म्हणजे, भाषणास उभे राहिले, म्हणजे मनात विचारांची स्पष्टता असायला पाहिजे, आत्मविश्वास असायला हवा. अशा आत्मविश्वासाने भाषणासाठी उभे राहिल्यानंतर भाषणातील सर्व रंग व सर्व कल आपोआप येऊ लागतो, हा माझा अनुभव आहे. मी विशेष आरडा-ओरडा करून बोलणारा वक्ता नाही किंवा जीवघेणी टीका करणे हा माझा स्वभाव नाही. पण कोणी जर अकारण माझ्यावर टीका करण्याचा प्रयत्‍न केला, तर मात्र त्याच्यावर उलटण्याकरिता मागे-पुढे पाहत नाही. पण असे प्रसंग थोडे आहेत.

माझ्या भाषणांची शैली ही संभाषणाच्या पद्धतीची आहे. कारण वक्ता व श्रोते यांच्यामध्ये संवादाचे वातावरण निर्माण झाल्याशिवाय भाषण यशस्वी होत नाही, असा माझा अनुभव आहे. फार लांबलचक भाषण करण्याची माझी सवय नाही. महत्त्वाच्या समारंभांतून दहा-पंधरा मिनिटांपेक्षा मी जास्त भाषण करीत नाही आणि जाहीर सभेतील भाषण चाळीस-पंचेचाळीस मिनिटांपेक्षा जास्त लांबत नाही. लोकसभेत महत्त्वाच्या वादविवादावर बोलताना कधी कधी तास, दीड तास बोलावे लागले. परंतु दीड तासापेक्षा लांब भाषण मी कधीच केलेले नाही.

श्रोते व वक्ते यांच्यामध्ये मनमिलाफ असला, म्हणजे काय होते, याची मोठी खास आठवण सांगू इच्छितो. एक वेळ पार्लमेंटमध्ये गृहमंत्री म्हणून कम्युनिस्ट पक्ष व नक्षलवादी यांच्यासंबंधी मला बोलावयाचे होते आणि त्या बोलण्याच्या ओघात मी सभागृह इतके ताब्यात घेतले, की एक वेळ अशी आली, की माझ्या वाक्याची सुरुवात झाल्यानंतर त्यातील पुढचे शब्द कोणते असतील, याची कल्पना विरोधी व माझ्या पक्षातील सदस्यांना येत होती. तसेच, वाक्याचा शेवट कसा करणार, याचे शब्द ते बोलू लागले. हा अनुभव विशेष आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org