शब्दाचे सामर्थ्य २१८

७१

भाषण म्हणजे संवादच

गेली पन्नास वर्षे माझ्या विद्यार्थिदशेपासून आजपर्यंत मी एकसारखी भाषणं करीत आलो आहे. त्यामुळे कोणत्या कालखंडासंबंधाने लिहावे, असा प्रश्न आहे. सुरुवातीला श्रोतृवर्गासमोर उभे राहताना धडधडणारी छाती व कापणारे पाय यांची आठवण आजही मनात आहे. पण पुढे पुढे भाषणांचा सराव झाला. आजच्या काळात माझी होणारी वेगवेगळी भाषणे यांचे तीन-चार प्रकार करावे लागतील. राजकीय विषयावरची पक्षासाठी केलेली भाषणे, सामाजिक प्रश्नांसबंधी केलेली भाषणे, व्याख्यानमालेसाठी केलेली भाषणे, साहित्यविषयक सभांतून केलेली भाषणे व लोकसभेमध्ये केलेली भाषणे अशा प्रकारचे भाषणांचे वेगवेगळे गट होतील. या प्रत्येकाचा उद्देश वेगळा असतो व त्याच्यासाठी स्वीकारल्या जाणा-या शैलीतही फरक असतो. आता शैलीत फरक आहे, असे जरी मी म्हणत असलो, तरी या वेगवेगळ्या शैलींत भाषण करणारा मी एकच माणूस असल्यामुळे माझ्यामधली शैली सर्वच ठिकाणी असते. परंतु विषय मांडण्याच्या पद्धतीत फरक असतो.

मी असे पाहिले आहे, की सर्व विषयांवरील वाचन व चिंतन असले, तर अनपेक्षितपणे एखाद्या विषयावर बोलण्यास सांगितले, तर मी आज बोलू शकतो, असा माझा अनुभव आहे. याच्या पाठीमागे आयुष्यभर केलेला विविध वाचनाचा संग्रह हेच शक्तिस्थान आहे. लहानपणी शाळेच्या विविध स्पर्धांत मी भाग घेतला. त्या वेळी मुद्दे टिपून घेऊन त्या अनुषंगाने मी बोललो आहे. पण पुढे ती माझी सवय मोडली.

आता हातामध्येच मुद्द्याचे टिपण घेऊन बोलणे हे मी क्वचितच करतो. मात्र बोलण्यासाठी जो विषय निवडला असेल, त्यासाठी चिंतन करण्याची आवश्यकता असते. या विषयाचे महत्त्व, त्या विषयाची ऐतिहासिक वाढ, त्यांच्यासंबंधी आजचे प्रश्न व त्यांवरील उपाय अशा त-हेने मी त्या विषयाचा विचार करून ठेवतो व मग तो मी मांडू लागतो. पहिल्या दहा-पंधरा वर्षांत माझी काही निश्चित मते बनली नव्हती. मला वाटते की, त्या नंतरच्या काळात राजकीय, आर्थिक, सामाजिक साहित्यविषयक अशी माझी स्वतःची म्हणून काही मते झाली. स्वतःमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला.

मंत्री म्हणून चर्चेला उत्तर द्यायची भाषणे ही अगदी वेगळ्या प्रकारची असतात. त्या वेळी उपस्थित केलेल्या टीकांची जंत्री समोर ठेवावी लागते व त्यांतील महत्त्वाचे निवडक मुद्दे घेऊन त्यांना उत्तर द्यावे लागते. तसेच, आपल्या धोरणाची दिशा स्पष्ट करावी लागते. माझ्या मताने, ज्याला पार्लमेंटरी फोरम म्हणता येईल, त्यासाठी वेगळ्या तयारीची आवश्यकता असते. अधूनमधून भाषणात अडथळे येतात, त्या वेळी तर हजरजबाबीपणा व मन शांत ठेवून, आलेल्या अडथळ्यांना विनोदाने परतविण्याची मनात तयारी लागते. माझ्या लांबलचक संसदीय जीवनात याची आवश्यकता मला मी मुख्यमंत्री असताना व गृहमंत्री असताना जास्त भासली. ज्या काळात मी गृहमंत्री होतो, तो काळही मोठा वादग्रस्त होता. पार्लमेंटमध्ये काँग्रेस पक्षाचे बहुमत होते, परंतु ते काठावरचे होते. उत्तर भारतातील आठ-नऊ राज्यांत विरोधी पक्षांची मिश्र मंत्रिमंडळे काम करीत होती. त्यामुळे पार्लमेंटमध्ये असा एखादाही दिवस गेला नाही, की ज्या दिवशी मला दोन-चार वेळी तरी चर्चेत भाग घेऊन भाषण करावे लागले नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org