शब्दाचे सामर्थ्य २१५

७०

आर्थिक निरगाठीची उकल

रुपयाच्या अवमूलनामुळे आपल्या अर्थव्यवस्थेतील निरगाठी सुटतील, तसेच उत्पादनात अधिक वाढ होईल. अवमूलनास विलंब लागला असता, तर आर्थिक प्रगतीचा गाडा रेंगाळत राहिला असता आणि त्यामुळे जनतेचे अतिशय हाल झाले असते.

अवमूलनाचा हा निर्णय का घ्यावा लागला, त्याबद्दल कुणाचीही खात्री पटावी, अशी सुस्पष्ट कारणमीमांसा माझे सहकारी अर्थमंत्री सचिन्द्र चौधरी यांनी केली आहे. त्यांनी जे सांगितले आहे, त्यापेक्षा अधिक असे काही मला सांगायचे नाही.

मात्र एवढे निश्चित सांगतो की, ह्या उपायाची अत्यंत निकड होती आणि प्रखर कर्तव्यनिष्ठा व राष्ट्रीय जबाबदारी ह्यांना जागूनच आम्हांला हा निर्णय घेणे भाग पडेल. या उपाययोजनेमुळे आपले तात्कालिक व दीर्घकालीन कोणते लाभ होणार आहेत, ते येथे स्पष्ट करणे मला आवश्यक वाटते.

वस्तुतः अशा प्रकारचा महत्वपूर्ण निर्णय घेणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. व्यवहार राष्ट्रीय असोत अथवा खासगी असोत, त्यांबाबतचे निर्णय शंभर टक्के बरोबर किंवा शंभर टक्के चूक ठरत नाहीत. प्रत्येक उपाययोजनेचे फायदे-तोटे हे असतातच. दोहोंचे स्पष्ट पृथक्करण आणि योग्य मूल्यमापन झाले पाहिजे. रुपयाच्या अवमूलनाच्या तोट्यांच्या संबंधात सांगण्यात येते, की त्यामुळे किमती वाढतील, आपल्या प्रतिष्ठेत भर पडणार नाही, सरकारच्या प्रतिष्ठेला जबरदस्त धोका बसेल आणि निवडणुकीचे हे वर्ष असल्यामुळे पक्षाच्या हितसंबंधांनाही बाध येईल. असे असूनही आम्ही हा निर्णय घेतला, याचे कारण, ज्यासंबंधात ही भीती व्यक्त करण्यात आलेली आहे, ती एक तर अस्थानी आहे किंवा अतिशयोक्तिपूर्ण आहे, असे मला वाटते. इतकेच नव्हे, तर या निर्णयामुळे होणारे फायदेच तोट्यापेक्षा अधिक आहेत. फायद्यांचे पारडे जड कसे आहे, हे पाहण्यातच शहाणपण असते. निणर्यातील धोक्याची जाणीव ठेवून त्यांची अंमलबजावणी करण्याला धडाडी लागते आणि कार्यरत झाल्यामुळे धोके येतात, हे जर खरे असेल, तर निष्क्रिय राहिल्याने त्याहून मोठे धोके पत्करावे लागतात, हे ध्यानात ठेवले पाहिजे.

एक मंत्री म्हणून या देशाच्या संरक्षणाची जोखीम माझ्यावर आहे. आजच्या या स्थानावर असताना, किंबहुना स्वातंत्र्य-लढ्यात उडी घेतल्यापासूनच राष्ट्राची खरीखुरी ताकद कशात असते, यासंबंधी मी विचार करीत आलो आहे. या विचारमंथनातून राष्ट्राची खरीखुरी शक्ती केवळ त्याच्या सशस्त्र दलांच्या शक्तीवर आणि संख्येवर अवलंबून नसते, तर ती त्या राष्ट्राच्या मजबूत अर्थव्यवस्थेमध्ये सामावलेली असते, या त्रिकालाबाधित निर्णयाप्रत मी आलो आहे. जे राष्ट्र आर्थिकदृष्ट्या आधुनिक आणि ताकदवान नाही, हे राष्ट्र लष्करीदृष्ट्याही समर्थ असू शकणार नाही, आणि म्हणून विकास हा आपल्या संरक्षणाचा कणा आहे.

विकास म्हणजे तरी काय ? विकास याचा अर्थ प्रथमतः आपल्या गरजा भागविण्यासाठी आपल्या अर्थव्यवस्थेची माल आणि साधनांची उत्पादनक्षमता तयार करणे. त्याचप्रमाणे लोकांच्या कल्याणासाठी व समाधानाकरता जरूर ती साधनसामग्री उपलब्ध करून देणे होय. अशा त-हेने स्वयंपूर्णता हे विकासाचे अपरिहार्य ध्येय ठरते. नुकताच हा जो निर्णय घेण्यात आला, तो आपल्याला अधिक प्रमाणात स्वयंपूर्णता आणि अधिक ताकद कमाविण्याच्या दृष्टीने साह्यभूत ठरेल.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org