शब्दाचे सामर्थ्य २०२

सामान्य लोकांना हिंदी भाषा समजण्यास अडचण पडू नये, म्हणून ही भाषा शक्य तितकी सरळ व सोपी ठेवण्याचे जाणूनबुजून प्रयत्‍न झाले पाहिजेत. साहित्यिक हिंदीमध्ये संस्कृत आणि इतर शब्दप्रयोगांचा वापर होणे काही अंशी अपरिहार्य असले, तरी हा वापर शक्यतो मर्यादित ठेवणे हिंदी भाषेच्या भावी प्रगतीच्या दृष्टीने उचित होईल. खडी बोलीसारख्या हिंदीच्या बोलीभाषेतून सर्वसाधारण लोकांस समजण्यास कठीण अशा संस्कृत शब्दांचा उपयोग अजिबात टाळता येणे शक्य आहे. भारतामध्ये भौगोलिक विविधता असूनसुद्धा, अनादिकालापासून आश्चर्यकारक सांस्कृतिक ऐक्य अस्तित्वात आहे. परंतु पारतंत्र्याच्या काळात आपापसांतील मतभेद वाढले आणि धर्म, जाती, भाषा, प्रांतीयता वगैरे निरनिराळ्या कारणांमुळे आमच्यांत असलेली फूट वाढवून परकीय सत्तेने आम्हांला गुलामगिरीच्या शृंखलांत जखडून ठेवले. परंतु स्वातंत्र्याच्या आंदोलनातून आमच्या राष्ट्रीय ऐक्याचे खरे स्वरूप प्रखरपणे प्रकट झाले. तथापि, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काही ठिकाणी संकुचित स्वार्थामुळे मतभेद तीव्र होत गेले. ब-याच कालावधीनंतर आपल्या देशास संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे. पण राष्ट्रीय ऐक्य कायम टिकविण्यात आपण अयशस्वी झालो, तर आपले स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. इतिहासात प्रथमच आपला संपूर्ण देश जनतेने चालविलेल्या शासनाखाली प्रजासत्ताक बनला आहे. तेव्हा त्याचा गौरव वाढावा, म्हणून देशातील निरनिराळ्या लोकांमध्ये संपूर्ण ऐक्याची भावना असणे अत्यंत आवश्यक आहे. आपले मतभेद समजुतीने मिटवून अभेद्य अशा एकजुटीच्या भावनेने आपण राष्ट्रीय विकासकार्याला वाहून घेतले पाहिजे. हिंदी भाषा ही राष्ट्रीय ऐक्याची वाढ करणारी एक फार मोठी शक्ती आहे, म्हणून हिंदीच्या प्रगतीबरोबरच देशाच्या एकतेतही वाढ होत जाईल. महाराष्ट्र सरकारकडून हिंदी भाषेच्या अध्ययनास व अध्यापनास योग्य ते प्रोत्साहन दिले जाते. महाराष्ट्र शासनाच्या नोकरवर्गाला हिंदीचा चांगल्या प्रकारे परिचय व्हावा, म्हणून हिंदीच्या काही परीक्षा उत्तीर्ण होणे त्यांच्या बाबतीत आवश्यक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे काही हिंदी परीक्षांना इतर शैक्षणिक परीक्षांच्या बरोबरीची मान्यताही देण्यात आली आहे. शाळांतून हिंदी शिक्षणाची योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे.

आमच्यासमोर प्रत्यक्ष लोकमान्य टिळक व विनोबाजी भावे यांचे आदर्श आहेत. लोकमान्यांना सुरुवातीस हिंदी येत नव्हते. परंतु आपल्या देशभक्तीमुळे आणि आपल्या स्वदेशाभिमानामुळे राष्ट्रभाषा हिंदीचे त्यांनी ज्ञान करून घेतले आणि पूर्ण विचारांती हिंदी हीच सबंध देशाची भाषा होऊ शकेल, या निर्णयाप्रत ते आले. त्यानंतर त्यांनी हिंदीच्या प्रसारकार्यामध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली. राष्ट्राचे संघटन व ऐक्य साधण्यासाठी सगळ्या ठिकाणी समजली जाईल, अशा भाषेची फार आवश्यकता असून, हिंदी हीच अशा प्रकारची भाषा आहे, असे ते नेहमी म्हणत असत. महात्मा गांधीच्या विचारानुसार हिंदीला त्यांनी राष्ट्रभाषा म्हणून मानली होती. हिंदी भाषेच्या प्रसारकार्यामागे याप्रमाणे महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांच्या विचारांची प्रेरणा आहे. महाराष्ट्रात हिंदीचा प्रसार सुव्यवस्थित रीत्या चालू असून, येथे या भाषेचा जो व्यापक स्वरूपात प्रसार झालेला आहे, त्या प्रसाराची पार्श्वभूमी या प्रांतातील या महान नेत्यांनीच तयार केली आहे, ही आमच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद अशी बाब आहे. सर्वश्री बाबुराव विष्णु पराडकर, माधवराव सप्रे, लक्ष्मण नारायण गर्दे, दुगवेकर आणि काका कालेलकर या मराठी विद्वानांनी तर हिंदी भाषेची अविस्मरणीय अशी सेवा केली आहे. अशा त-हेची सेवा करण्याची महाराष्ट्रात एक परंपरा निर्माण झाली आहे, ही परंपरा कायम राखणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे.  महाराष्ट्रात हिंदीच्या प्रचारासाठी अतिशय अनुकूल असे वातावरण आहे, विदर्भ आणि मरावाड्यातील बहुसंख्य लोकांना हिंदी चांगले येते. पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या शहरांतून हिंदीच्या प्रसाराकडे योग्य त-हेने लक्ष देण्यात येत आहे. तथापि, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला काही ठरावीक कालावधीत हिंदीचा चांगला परिचय होईल, अशा दृष्टीने या राज्यात हिंदीच्या प्रसाराचे योजनाबद्ध कार्य जोमदार होण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात मराठी व इतर दुस-या भाषा यांच्या प्रगतीबरोबरच हिंदीचीही द्रुतगतीने प्रगती होईल, याबद्दल मला बिलकूल संदेह वाटत नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org