शब्दाचे सामर्थ्य २०

देवराष्ट्रातलं बालपण मागे टाकून विटे आणि नंतर कराडला मी आलो होतो. दारिद्र्याचे चटके तिथं आणखी तीव्रतेनं बसत होते- जाणवत होते. देवराष्ट्रात सारेच गरीब. त्यांतलेच आम्ही. पण विट्याचं आणि कराडचं वातावरण वेगळं होतं. सरमिसळीचं होतं. कमालीचं दारिद्र्य आणि अज्ञान हे त्या वातावरणात विशेष जाणवणारं होतं. समोर दिसणारी माणसं आणि त्यांची घरं, राहणी काही सांगत होती. मी शाळेत शिकत होतो. खेडं आणि शहर यांतला फरक हरघडी जाणवत होता. मनात प्रश्न निर्माण होत होते; पण उत्तर मिळत नव्हतं. कुणी सांगत नव्हतं. कोण सांगणार? ज्यांनी उत्तर द्यावं, त्यांच्यांत आणि माझ्यात परिस्थितीची मोठी दरी होती. ही दरी ओलांडायची, तर वाटचाल करणं एवढंच समोर दिसत होतं. वाटचाल करीत होतो. एक विद्यार्थी म्हणून!

होता होता १९३० साल उजाडलं. मी एक विद्यार्थी. मित्र माझ्याकडे पाहून ‘हुशार’ म्हणत असत. त्यांच्या मतानं अभ्यासात मी बरा होतो. पण या वाटचालीतच एक दिवस या ‘हुशारी’ वर शिक्कामोर्तब झालं. हे शिक्कामोर्तब पुणे शहरातील चिकित्सक परिक्षकांनी केलं होतं. १९३० साली पुण्याला एका वक्तृत्व - स्पर्धेसाठी मी उपस्थित होतो. तिथं मी बोललो. म्हणजे भाषण केलं, आणि त्या स्पर्धेतील पारितोषिक माझ्या वाट्याला येऊन माझ्या हुशारीवर माझ्या मित्रांच्या म्हणण्याप्रमाणे शिक्कामोर्तब झालं. वक्तृत्वाचा विषय होता : ‘खेड्याचा विकास.’ हा विषय लहानपणापासूनच मी पचवीत होतो, जगत होतो. त्या वक्तृत्वात माझ्या अनुभवालाच जणू वाचा फुटली असावी. शहरी मंडळींना ते बोलणं जिवंत वाटलं. त्यात काही अपूर्व होतं, की नाही, असेल-नसेलही, पण चिकित्सक श्रोते भारावले, एवढं मात्र खरं. स्पर्धेनं मला पारितोषिक दिलं. पण हा व्यावहारिक लाभ होता. माझा फायदा झाला होता, ते वेगळाच होता.‘खेड्याचा विकास’हा शहरवासीयांनी समजून घेण्याचा आणि त्यांना समजावून देण्याचा विषय आहे, त्याचबरोबर खेडुतांनाही समजावून देण्याचा विषय आहे, याची जाणीव मला झाली. हा माझा खरा फायदा झाला होता.

मनानं या विषयाला पकडलं आणि ध्येयाच्या वाटेवर नकळत एक पाऊल पडलं. या वाटेनं आजवर पुष्कळ वाटचाल झाली, पण ते पहिलं पाऊल... एखाद्या माळरानातनं ऐन उन्हाळ्यात जाताना असं एखादं ठिकाण येतं, की तिथनं बर्‍याच पायवाटा फुटलेल्या असतात. ज्या गावाला जायचं, त्या गावची नेमकी वाट विचारायला जवळपास कुणी नसतं. थांबून विचार करावा, म्हणून आसपास पाहावं, तर सावलीसाठी एखादं झाडही नसतं; आणि मनानंच एखाद्या वाटेवर पहिलं पाऊल टाकावं लागतं. बरीच वाटचाल करीत जावं आणि समोर त्या अपेक्षित गावाच्या खुणा दिसू लागाव्यात, म्हणजे वाटचालीनं दमलेल्या मनात मग आनंद जमा होऊ लागतो; पण या आनंदाची खरी मालकी असते, ती त्या पहिल्या पावलाची.

खेड्यातल्या दारिद्र्याचा आणि अज्ञानाचा शोध घेण्याचा, त्यावर उपाय शोधून काढण्याचा माझा छंद हा त्या वेळेपासूनच आहे. भारताचा विकास म्हणजे भारताच्या ग्रामीण भागाचा विकास, तिथल्या शेतीचा आणि शेतकर्‍यांचा विकास, उद्योगाचा विकास आणि सार्‍या माणसांचाच विकास, याला माझ्या मनात बळकटी प्राप्त झाली, ती त्या पहिल्या पावलामुळं ! परिस्थितीच्या चटक्यामुळं ! तापवल्याशिवाय वाकवता येत नाही, हे लहानपणी, लोहाराच्या भात्याशेजारी बसून मी पाहिलं होतं. परिस्थिती बदलण्यासाठी शहरांतली आणि खेड्यांतली मनं तापवली तर....

- आणि ही जागृती करण्याची संधी मला १९३० च्या चळवळीनं दिली. त्या वेळी मी मॅट्रिकच्या आसपास होतो. त्या काळात मॅट्रिक उत्तीर्ण होणाराला सरकारदरबारी सहजगत्या नोकरी उपलब्ध होती. एकदा नोकरी मिळाली, की सुखाचं जीवन सुरू होत असे. त्या काळातले बहुसंख्य विद्यार्थी मॅट्रिक पदरात पाडून घेण्यासाठी झटत असत. मी पाहत होतो, माझ्या बरोबरीचे सवंगडी अभ्यासात मग्न होते. घोकंपट्टी सुरू होती. मलाही मॅट्रिक व्हायचं होतं. पुढचं सुख दिसत होतं. आमच्या घराला सुखाचा स्पर्श झालेलाच नव्हता. वडील आणि नंतर थोरले बंधू सरकारी नोकरीत होते - पण एक सामान्य नोकर म्हणून. ते होते बेलिफ. घरची जमीन चार-पाच एकर. तेही माळरान. दोन-चार पोती धान्य देणारं. मी मॅट्रिक होऊन नोकरीत शिरल्यानं निदान दोन वेळा घरची चूल तरी पेटणार होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org