शब्दाचे सामर्थ्य १९९

युद्धाच्या इतिहासाचे हे एक नवे दालन आहे. हेरगिरीचे किती विविध प्रकार असू शकतात व युद्धाच्या लहान-मोठ्या योजनांना त्यांची किती आवश्यकता असते, याची काहीशी कल्पना या पुस्तकावरून येऊ शकेल. युद्धाच्या प्रगतीवर व वेगवेगळ्या आघाड्यांवर घडलेल्या अनेक घटनांवर नवा प्रकाश यामुळे पडेल. उत्तम कादंबरी वाचताना जी तन्मयता येते, तिचा अनुभव हा ग्रंथ वाचताना वारंवार मला आला. एका-दोन बैठकींत मात्र हे पुस्तक संपणारे नव्हे. आवडणारी वस्तू राखून ठेवून वापरावी, तसे हे पुस्तक मी सावकाशपणे, पण चवीने, चार-पाच आठवडे वाचत होतो.

युद्ध जिंकण्यासाठी नव्या-नव्या आधुनिक शस्त्रास्त्रांची जशी आवश्यकता आहे, तशीच, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक आवश्यकता आहे, शत्रूच्या गोटात काय शिजत आहे, हे समजण्याची! युद्ध जिंकण्यासाठी ही एकच कसोटी मानली, तर इंग्लंडने, बाहेर जेव्हा ते लढाया हरत होते, त्याच वेळी त्यांनी ते युद्ध जिंकले होते, असे आता दिसते. कारण युद्धाच्या प्रारंभ-पर्वाच्या अखेरीस त्यांनी जर्मन गुप्त संदेशाची लिपी हस्तगत केली होती. ज्या यंत्राद्वारे ते त्या संदेशाची उकल करीत होते, ते 'अल्ट्रा' या नावाने संबोधले जात होते. जर्मन हायकमांड व खालचे सेनानी यांच्यामध्ये येणारे-जाणारे सर्व संदेश 'अल्ट्रा' फोडत असे व त्याचा तजुर्मा त्याच दिवशी ब्रिटीश उच्च सेनानी व प्रत्यक्ष चर्चिलच्या टेबलावर जाऊन पोहोचत असे. पुढे अमेरिकेस अ‍ॅटमबॉम्ब हस्तगत झाला. पण त्यापूर्वी तितकाच महत्त्वाचा इंग्लंडचा विजय म्हणजे 'अल्ट्रा'ची 'रचना'; पण त्यांना सगळ्यांत चिंता होती, ती याची, की जर्मनांना आपली गुप्त लिपी फुटली, याची शंकाही येऊ न देण्याची. कारण या गुप्त लिपीचा सर्वोत्तम उपयोग युरोपवर अखेरची जी चढाई करावयाची, त्या वेळी होणार होता. त्यामुळे 'अल्ट्रा'चे अस्तित्व कुणाला कळू न देणे हे त्यांचे महत्वाचे एक काम बनले. पुष्कळ वेळा 'अल्ट्रा' च्या  माध्यमातून मिळालेली माहिती अत्यंत महत्त्वाची असूनसुद्धा जर्मनांना गुप्त लिपी फुटल्याची शंका येऊ नये, म्हणून त्या महत्त्वाच्या माहितीचा उपयोग करावयाचे टाळावे लागले.

यासंबंधीचा एक नमुनेदार किस्सा सांगण्यासारखा आहे. १९४० च्या नोंव्हेबरमध्ये ज्याला 'ब्रिटनची लढाई' म्हणतात, ती हिटलरची वैमानिक हल्ल्याची चढाई शिगेला पोहोचत चालली होती. या वेळी 'अल्ट्रा' च्यामार्फत माहिती मिळाली, की एक ठरावीक दिवशी, ठरावीक वेळी 'काव्हेंट्री' या इतिहासप्रसिद्ध व औद्योगिक शहरावर व तेथील प्रसिद्ध कॅथीड्रलवर पाचशेहून अधिक जर्मन विमाने हल्ला करणार आहेत. चर्चिलपुढे ही माहिती निर्णयासाठी ठेवली, की या माहितीचा उपयोग करून, त्या शहराच्या रक्षणासाठी जय्यत वैमानिक तयारी करावयाची, की नाही ? चर्चिलने सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेतला, की हल्ला व त्यातून होणीरी हानी स्वीकारावयाची; परंतु रक्षणाची तयारी करून, 'अल्ट्रा' च्या अस्तित्वाची शंका जर्मनांना येऊ द्यायची नाही आणि तसेच घडले. एक जुने महत्त्वाचे शहर उद्ध्वस्त झाले. पण अल्ट्राचे शत्रूच्या शंकेपासून रक्षण केले.

उत्तर आफ्रिकेत रोमेलचा पाडाव करण्यासाठी फसवणुकीचे टाकलेले डावपेच असेच मनोवेधक आहेत. युद्धाच्या रक्षणाच्या रणनीतीमध्ये फसवणुकीच्या डावपेचांना (डिसेप्शन) मानाचे स्थान असते. असे 'कात्रजचे घाट' घातल्याशिवाय निव्वळ शौर्याच्या बळावर लढाया जिंकता येत नाहीत. उत्तर आफ्रिकेच्या लढाईत जनरल रोमेल शौर्यात हरला नाही, तर डावपेचांत फसला.

दोस्त राष्ट्रांमध्ये दुसरी आघाडी केव्हा व कुठे उघडावयाची, याबाबतीत १९४२ ते ४४ पर्यंत सतत संघर्ष आणि वादविवाद चालू होते. या वादविवादाची हकीगत रोमहर्षक आहे. लष्करी मूलभूत निर्णय कसे घ्यावे लागतात, याचे प्रात्यक्षिकच या पुस्तकात पाहावयास मिळते. शेवटी ६ जून १९४४ रोजी सहा हजार जहाजांचा तांडा, लक्षावधी सैन्य, शस्त्रास्त्रे यांच्यासह फ्रान्सच्या किना-यास पोहोचतो व जगाच्या इतिहासात अजोड असे एक समुद्रमार्गे केलेले आक्रमण सुरू होते.

हेरगिरीचे व डावपेचांचे जे अनेक पवित्रे वर्षानुवर्ष टाकले जात होते, त्यांचे हे फलित या ग्रंथात तपशिलाने दिले आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org