शब्दाचे सामर्थ्य १८८

६१

लोकसाहित्याच्या भावगंगेत

लहानपणी मी कराडला संगमावर बसत असे. कोठून तरी येणारे आणि कोठेतरी जाणारे ते 'जीवन' मी रोज पाहत असे. कोणासाठी तरी ते धावत होते. त्यात खंड नव्हता. या 'जीवना'ला एक लय होती. पण ते लयाला गेलेले मी कधीच पाहिले नाही. ते जीवन नित्य नवीन होते. त्याचा जिव्हाळा कधी आटला नाही.

जीवन पराकोटीचे समर्पित असेल, तर ते कधीच जीर्ण होत नाही. चंद्र कधी जुना होत नाही. सूर्याला म्हातारपण येत नाही. दर्या कधी संकोचत नाही. यांतील प्रत्येकाच्या जीवनात पराकोटीचे समर्पण आहे; पण अनंत युगे लोटली, तर विनाश त्यांच्याजवळ पोहोचलेला नाही. काळाने त्यांना घेरलेले नाही. त्यांचा कधी कायापालट नाही, स्थित्यंतर नाही. ते निःश्वसन अखंड आहे.

शास्त्रज्ञ म्हणतात, 'सूर्याभोवती ग्रहमाला फिरते,' अध्यात्मी सांगतात, 'सूर्य जगाचा आत्मा आहे.' नियती म्हणते, 'पंचमहाभूतं माझे दास आहेत,' दृश्य व अदृश्य जगत निर्माण करण्यात नियतीचा लीलात्मक आनंद आहे, असेही कोणी म्हणतात. मला वाटते, जग हे कलात्मक आनंदाकरिता निर्माण केलेली शक्ती आहे. या कलेत स्फूर्ती आहे, माणुसकी आहे. केवळ वैज्ञानिक हिशेब म्हणजे जग नव्हे. कला आणि पावित्र्य यांचा हा सुरेख संगम आहे.

मातीच्या आणि मातेच्या सान्निध्यात मला या सर्वांचा साक्षात्कार घडतो. तिच्या अंतःकरणाच्या अवकाशात मी स्थिरावतो; प्रशांत मनोभूमीवर पहुडतो, आत्मतेजाने तेजाळून निघतो, प्रेमामृताने ओलाचिंब होतो आणि श्वासात श्वास मिसळून जातो.

कन्याकुमारीच्या प्रशांत परिसरात, कृष्णामाईच्या सान्निध्यात, गंगा-यमुनेच्या सहवासात, हिमालयाच्या कुशीत, माझी अशी भावसमाधी लागते. अधूनमधून लोकसाहित्याच्या भावगंगेत डुंबताना देखील मी हाच अनुभव घेतो.

लोकसाहित्य या शब्दामध्ये किती किती गोष्टींचा अंतर्भाव होऊ शकेल, याची चर्चा आजवर अनेकदा झालेली आहे. परंतु म्हणी, गाणी, ओव्या म्हणजेच केवळ लोकसाहित्य नव्हे. लोकसाहित्याचा संगीताशी संबंध आहे, नृत्याशी संबंध आहे, गीताशी संबंध आहे, कथांशीही संबंध आहे, किंबहुना लोकजीवनाची जी विविध त-हेची स्वरूपे आहेत व त्यांचे स्वरूप वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व्यक्त होत असेल, ती सगळी लोकजीवनाची व्यक्त दर्शने म्हणजे लोकसाहित्य, असे आपणांला मानावे लागेल; आणि या दृष्टीने, मला वाटते, आम्हांला अधिक प्रयत्‍न करण्याची गरज आहे. निव्वळ आमच्यांतलेच शोधून काढावयाचे, असे नव्हे. मी या संदर्भात निव्वळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादित अर्थाने सांगतो, असेही नव्हे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org