शब्दाचे सामर्थ्य १८


आठवणींचा गुच्छ : १

नियती प्रत्येक माणसाला आठवणींचा एक भरघोस गुच्छ देऊन त्याचा सत्कार करीत असते. अर्थात ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाप्रमाणे त्या गुच्छातील फुले विविध प्रकारची असतात. माझ्या वाट्याला आलेल्या आठवणींच्या गुच्छातील फुले सर्व प्रकारची आहेत. त्यांत मनाला कर्तव्यपूर्तीचे समाधान देणारी फुले जशी आहेत, तशी असंख्य चांगल्या माणसांच्या सहवासाचा सुगंध देणारीही आहेत. काही कडवट व उग्र वासाची फुले आहेत, तर काही फुलांवर पडलेले अश्रूंचे दवबिंदू अजूनही सुकलेले नाहीत. काही फुले अस्वस्थता निर्माण करतात, तर काही निर्भेळ आनंद देतात. एकंदरीत नियतीने दिलेला माझ्या आठवणींचा गुच्छ समृद्ध आहे - आकर्षक आहे, कधी न सुकणारा आहे, हे माझ्या आयुष्यातील एक फार मोलाचे धन आहे.

पाच पुत्रांची माता ती देवराष्ट्रातली... सागरोबाच्या डोंगरमाथ्यावरलं एक लहानसं गाव देवराष्ट्र. कौलारू, माळवदी घरं. गावात ढासळलेल्या भिंती आणि दगडमातीचे ढिगारे. पिवळ्या फुलांच्या काटेरी धोतर्‍याची लहानलहान झुडपं, तरवड, नाहीतर पाला वाळून काडीच्या टोकावर सुकलेलं पांढरं फूल घेऊन उभी असलेली गवतासारखी वनस्पती एवढीच तिथली हिरवळ.‘सोनहिरा’ ओढ्याच्या काठावर काही मोठी झाडं. बाकी सर्व उजाड, रखरखीत. रस्त्यावर सुटलेल्या बैलगाडया - काही दोन चाकांवर उभ्या - काहीचं एक चाक, नाहीतर कणा मोडल्यामुळं कललेल्या. पडकी आवारं आणि धूळ फुंकीत तिथं हिंडणार्‍या गाई-म्हशी. गावातली म्हातारी माणसं देवळाच्या कट्टयावर, पारावर तंबाखू खात, चिलीम ओढीत बसलेली. एखादेच काका डोकीवर रुमाल ठेवून पायांतला जोडा वाजवीत इकडून तिकडे चाललेले. असं अगदी एक साधं, गरिबांचं, कुणब्यांचं गाव. लक्ष्मीनं पायवाट बदलली होती. गावात एखादंच बर्‍यापैकी घर. घराला मोठा दरवाजा आणि तटाच्या भिंतीवर तांबड्या कावेचे पट्टे ओढलेले दिसले, म्हणजे गावातलं ते जरा भल्यापैकी घर. बाकी घरं शेणानं, मातीनं सारवलेली, काहीशी पडकी, गळकी.

अशाच एका घरात मी राहात होतो. असं सांगतात, की देवराष्ट्र हे पूर्वी एका राजाचं गाव होतं. राजाबरोबर लक्ष्मीही तिथं नांदत होती. सागरोबाच्या परिसरात यज्ञकुंड सुरू असायचं. ॠषिमुनींचं ते ठिकाण. प्रासादिक परिसर, पवित्र कुंड आणि त्यातलं तीर्थ. काळाच्या ओघात राजा गेला. ॠषि-मुनी गेले आणि लक्ष्मीही गेली. मागे राहिली सागरोबा आणि रयत. त्या रयतेतला मी एक.

आता जेव्हा एखाद्या खेड्यात जातो, तेव्हा लहानपणचं खेडं सहसा समोर येत नाही. खेडं आता बदलत राहिलं आहे. एक मात्र खटकतं. महारवाडा. आजही तो गावाच्या, खेड्याच्या बाहेरच उभा आहे. परिस्थितीच्या भिंती ढासळत गेल्या, वेशी उद्ध्वस्त झाल्या; पण जाती-जमातींच्या भिंती पडलेल्या नाहीत. भल्याभल्यांनी सुरुंग लावले, पहारी चालविल्या, पण ते तट अजून उभेच आहेत. मांगांची मुलं, मुली व स्त्रिया आजही वाखाच्या दोर्‍या वळीत, त्या तटाच्या बाहेर उन्हात उभ्या आहेत. त्याच त्या गवतानं शेकारलेल्या झोपड्या आणि पाठीला लागलेली पोटं!

पूर्वी खेड्यांतली सारीच माणसं परिस्थितीनं बनविली होती. आज माणसं तिथली परिस्थिती बनवीत आहेत. भलीबुरी. शिक्षण त्यांच्या घरापर्यंत पोचलं आहे. कुंभारी कौलांनी घरं शाकारणारे आज घरांवर बंगलोरी तांबडी कौलं चढवीत आहेत. मधेच एखादं दुमजलीही दिसतं. त्या दुमजली घराच्या हिरव्या, निळ्या, गुलाबी भिंती लक्ष वेधून घेतात. एखाद्याच्या घरात ट्रान्झिस्टर गात असतो. एखादी मोटारसायकल फडफडत घरासमोर थांबते. मुलं-मुली नेटके कपडे घालून शाळेत जाताना दिसतात. तालुक्याच्या गावात असलेल्या कॉलेजला पोचण्यासाठी एखादा तरुण सायकल दामटीत असतो. पैरणीची जागा बुशशर्टनं घेतली आहे. खळणा शर्ट आणि गांधी टोपी हा जमाना शे-दोनशे वस्तीच्या गावातही पोचला आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org