शब्दाचे सामर्थ्य १७७

ही लोकशाही राज्यव्यवस्था सुरळीत चालावयाची, तर समाजाची तशी वृत्ती निर्माण होणे अगत्याचे ठरते. त्यातही ही वृत्ती समाजाच्या सर्व थरांत निर्माण होणे हे अधिक महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य संपादनासाठी म्हणून समाज ध्येयाने धुंद बनला होता. राष्ट्रवादाच्या जोपासनेसाठी आताही ख-या अर्थाने तो धुंद बनून गेला पाहिजे. समाजांतर्गत जिव्हाळा, परस्पर सहानुभूती, परस्परांसाठी करुणा, परस्परांसाठी पराक्रम ही सर्व स्तरांत निर्माण झाल्यानेच हे घडू शकेल.

हे घडावयाचे, तर यासाठी भारतीयांना आपली मते केवळ भूतकाळातील पराक्रमावर बांधून न ठेवता, ती उज्ज्वल भविष्यकाळासाठी उघडी ठेवावी लागतील. बहुसंख्य भारतीय नागरिक भूतकाळातच अधिक वावरतात. इतिहासातील वीरकथा, वीरगाथा राष्ट्रसेवेची स्फूर्ती जरूर देतात, परंतु नव्या युगातील लोकशाहीचे संगोपन होईल, अशासाठीही त्या वीरकथांचे संदर्भ वापरले पाहिजेत. आज गरज आहे, ती केवळ वीरश्रीचे पोवाडे गाण्याचे, ऐकण्याचे नव्हे - सर्जनशील कौशल्य दाखविण्याची. तरुण मन हे त्यासाठी धावले पाहिजे, पण आज येथे वाण आहे, ती नेमकी याचीच.

नव्या कौशल्यांना तर कवटाळायचे आणि जुनी रूढिप्रियता सोडावयाची तर तयारी नाही, अशा संभ्रमी स्थितीत येथील सुशिक्षित म्हणविणारा वर्गच जखडून पडला आहे आणि त्यामुळे येथे अनेक विधायक कार्ये साकार होताना अडखळतात. विधायक कार्यक्रमांची सफलता हा तर स्वराज्याचा सिद्धांत आहे. पण केवळ लोकशाही सरकार अस्तित्वात येण्याने ही सफलता पदरी पडू शकत नाही. किंबहुना त्यातून अनेकविध समस्याच वर येतात. आज निर्माण झालेल्या समस्या यासुद्धा लोकशाहीची, राष्ट्रवादाची एक प्रक्रियाच म्हणावी लागेल.

देशात आज विकासाची भूक वाढली आहे. पण त्याचबरोबर या विकासासाठी वेगळेपणाची भावनाही वाढत आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भावनात्मक एकतेची उणीव पावलोपावली भासावी, असा स्वतंत्र भारताच्या जीवनातील एक संक्रमणकाळ आहे. सरकार किती सबल आहे, याहीपेक्षा समाजमनाची दुर्बलता भयानक बेचैनी निर्माण करणारी आहे. कोणत्याही उपक्रमशीलतेसाठी सरकारवर विसंबण्याची, सकारण व अकारण सरकारला दोषी ठरविण्याची वृत्ती वाढली आहे. लोककल्याणाची भाषा उच्चारत असताना पक्षोपक्षांत लोकशाहीबाबत बेपर्वाईची वृत्ती जोम धरून उठत आहेत. लोकशाहीच्या नावाखाली व्यक्तिस्वातंत्र्याचा विपरीत अर्थ लावला जात आहे. ही स्थिती चिंताजनक आहे; आणि म्हणून येथे 'राष्ट्रवाद' आहे, असे म्हणत असतानाही येथे खरेखुरे 'ऐक्य' आहे, असे गृहीत धरता येत नाही. देशाला या चिंतेतून, या संक्रमणकालातून बाहेर काढावयाचे आहे. मला वाटते, की राष्ट्रवादी अशी सर्व शक्ती आणि समाज एकवटल्याने, एकरस झाल्यानेच हे घडेल. भारताचा राष्ट्रवाद हा धर्मनिरपेक्ष राहिला, तरच तो 'राष्ट्रवाद' म्हणून राहील; एरवी त्याला प्रांतवादाचे, जातीयवादाचे किळसवाणे स्वरूप प्राप्त होईल.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org