शब्दाचे सामर्थ्य १७४

५९

भारतीय राष्ट्रवादाला आव्हान

भारतीय राष्ट्रवाद हा आज संक्रमणकाळातून वाटचाल करीत आहे. आपल्या राष्ट्रवादाला अनेक प्रकारची गुंतागुंतीची आव्हाने या काळात येत आहेत. भारतीय राष्ट्रवादाचा धर्मनिरपेक्ष विचाराचा पाया गेल्या काही वर्षांत कच्चा होत आहे, की काय, अशी शंका किंवा भीती मनाला अस्वस्थ करू लागली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही या देशातील जातीय दंगे कमी झालेले तर नाहीतच, उलट, ते अधिक वाढत आहेत, असे आढळून येत आहे. प्रादेशिक निष्ठा भारतीय निष्ठेला छेदून जात आहेत, की काय, अशी शंका मनाला चाटून जाते. भाषिक अहंकार व्यापक अशा राष्ट्रनिष्ठेपेक्षाही अधिक प्रभावी किंवा बलशाली बनत आहे, अशी भीती मनात आल्यावाचून राहत नाही. गेल्या काही वर्षांत ही आव्हाने एकाच वेळी येत असल्याने भारतीय राष्ट्रवादासंबंधी सर्व देशभर नव्याने चिंतन सुरू झाले आहे. विचारवंतांच्या मनामध्ये भारतीय राष्ट्रवादाच्या भवितव्यासंबंधी चिंता, काळजी निर्माण झाली आहे.

भारतीय राष्ट्रवादाला पहिले आव्हान जे आहे, ते आमच्या धर्मनिरपेक्ष विचाराच्या संदर्भात आहे. गेल्या काही वर्षांत देशातल्या निरनिराळ्या भागात हिंदू-मुस्लिम, हिंदू-बौद्ध, बौद्ध-मुस्लिम यांच्यामध्ये जे दंगे झाले, त्यावरून येथील लोकशाहीचा धर्मनिरपेक्षतेचा पायाच दुबळा होत आहे, की काय, अशी शंका प्रदर्शित होऊ लागली आहे. धर्मनिरपेक्षता हा भारतीय लोकशाहीचा कणा आहे. हा कणा ज्या दिवशी दुबळा होईल, त्या दिवशी येथील लोकशाही आणि राष्ट्रवाद धोक्यात आल्यावाचून राहणार नाही, हे तर खरेच.

भारताच्या धर्मनिरपेक्षतेसंबंधी दोन-तीन गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवल्या पाहिजेत. भारताची लोकशाही धर्मनिरपेक्ष आहे. याचा अर्थ ती सर्व धर्मांना विकासाची समान संधी देत आहे. स्वतःला नास्तिकवादी म्हणविणा-या राष्ट्रातील धर्मनिरपेक्षता व भारताची धर्मनिरपेक्षता यांमध्ये मूलभूतच फरक आहे. त्यांची धर्मनिरपेक्षता नास्तिकवादावर, धर्मविरोधावर उभारलेली असते. उलट, येथे धर्मावर नितान्त श्रद्धा आहे. पंरतु सर्व धर्मांना विकासाची समान संधी द्यावी, सर्व धर्मांप्रत समभाव या अर्थाने आमची लोकशाही धर्मनिरपेक्ष आहे. धर्मश्रद्धा ही सर्वच धर्मांना सामावून घेणारी असली पाहिजे, असा हा प्रयत्‍न आहे, खरे असे की, धर्म ही व्यक्तिगत बाब आहे.

राज्यसंस्थेचे या व्यक्तिगत श्रद्धेशी काहीही कर्तव्य असण्याचे कारण नाही. महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे सार्वजनिक हिताची आणि भौतिक समृद्धीची कार्ये पार पाडणे ही राज्यसंस्थेची कामे आहेत. अध्यात्म व धर्मशास्त्र यांमध्ये राज्यसंस्थेने हस्तक्षेप करू नये, अशी त्यामध्ये तात्त्विक भूमिका आहे. शिवाय आम्ही आमचे स्वातंत्र्य जे मिळविले, ते या देशातील सर्व धर्मीयांनी, जाती - जमातींनी खांद्याला खांदा लावून, आत्मयज्ञ करून मिळविले आहे. या स्वातंत्र्यसंग्रामात सर्व धर्मीयांचे रक्त सांडले आहे. त्यामुळे या देशातील स्वातंत्र्यावर व लोकशाहीवर सर्वांनाच हक्क आहे. अशा या व्यापक भूमिकेवरून आम्ही धर्मनिरपेक्ष राज्याची कल्पना स्वीकारलेली आहे. मला वाटते, व्यावहारिक भूमिकेवरून तर त्याची आज भारताला अधिक गरज आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org