शब्दाचे सामर्थ्य १६९

छोटे छोटे एकतंत्री राजे आता या देशात निर्माण करावयाचे नाहीत, तर अखिल जनतेच्या विश्वासाने जनतेच्या हितासाठी व जनतेच्या संमतीने राज्य चालविणारी लोकसत्ता या देशात प्रस्थापित होत आहे, व ती आपणांस टिकवावयाची आहे. तिचा अधिक विकास व विस्तार आपणांस करावयाचा आहे. आजच्या या दिवशी स्वतंत्रतेचीच प्रस्थापना आपण करीत नसून, लोकशाहीचीही प्रस्थापना आपण करीत आहोत. ही महत्त्वाची गोष्ट आपणांस विसरून चालणार नाही. ही लोकशाहीची प्रस्थापना 'काँग्रेस संघटने' सारखे जनतातंत्र आपण निर्माण केल्यामुळेच होऊ शकली, हा इतिहासाचा आपणांस मोठा धडा आहे.

राजकीय स्वातंत्र्य-प्राप्तीनंतरचा पुढचा मोठा टप्पा अजून गाठावयाचा आहे. देशातील दारिद्र्य आणि दैन्याचा महाबिकट प्रश्न आपणांस सोडवावयाचा आहे. आर्थिक विषमतेवर आधारलेली समाजरचना बदलून आर्थिक लोकशाही निर्माण करावयाची आहे, आणि हे कार्य आपल्या हातून यशस्वी व्हावयाचे असेल, तर काँग्रेस संघटनेचे अस्त्र ज्या आत्मविश्वासाने जनतेने आतापर्यंत पेलले, त्याच आत्मविश्वासाने ते अस्त्र अजूनही पेलणे जरूर आहे. ज्या प्रमाणात काँग्रेस-संघटना जनतेच्या वर्चस्वाखाली राहू शकेल, त्या प्रमाणात व वेगात आर्थिक समानतेचे तत्त्व या देशात प्रस्थापित होणार आहे, काँग्रेस संघटना अधिक जनतामय ठेवणे हे यापुढचे आपले खरे कार्य आहे. काँग्रेसपासून पराङमुख होण्यात किंवा काँग्रेसमध्ये छोटे-मोठे गट-उपगट निर्माण करण्यात जनतेच्या सामर्थ्याचा विनाश आहे.

आजही प्रांतिक सरकारे स्थानिक स्वरूपाचे वा तात्पुरते प्रश्न कितपत यशस्वी रीतीने सोडवू शकतात, या गोष्टीवर काँग्रेस संघटनेबाबत आपले काय धोरण असावे, हे अवलंबून ठेवणे चूक आहे. काँग्रेस - संघटना व तिचे उद्याच्या हिंदुस्थानच्या राजकीय वादळातील स्थान हा एक मौलिक स्वरूपाचा मूलगामी प्रश्न आहे. त्याचा विचार आजच्या काही तात्कालिक स्वरूपाच्या तपशिलाच्या गोष्टीवरून करणे आत्मघाताचे आहे. युद्धोत्तर आर्थिक संकट आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आहे व त्याचे काही अपरिहार्य परिणाम आपल्या देशालाही भोगावे लागणार आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसनिष्ठेचा प्रश्न तात्कालिक स्वरूपाचा राहू शकत नाही. या देशाचे मूलभूत स्वरूपाचे जे आर्थिक प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडविण्यासाठी लागणारे क्रांतिकारक आर्थिक कार्यक्रम स्वीकारण्यास काँग्रेस बांधली गेली आहे. काँग्रेसची तशी परंपरा आहे आणि काँग्रेसनिष्ठा ठेवण्यास एवढी एकच गोष्ट पुरेशी आहे, असे मला वाटते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org