शब्दाचे सामर्थ्य १४९

त्याने असा प्रश्न विचारलाय् की तत्त्वज्ञानाची अनेक पुस्तके तोंडपाठ करूनसुद्धामनुष्य चुका करतो, याचे कारण काय? आणि उत्तरही तोच देतो की, याचे कारण एकच आहे की, तो एक पुस्तक वाचायचे अजिबात विसरलेला असतो आणि ते पुस्तक म्हणजे मानवी जीवन; आणि माझ्या मते ते खरे आहे. ज्याला माणसाच्या जीवनातील सुखदुःखे व पाठीमागच्या त्या प्रेरणा, त्यांच्या यातना-वेदना समजल्या नाहीत, तो पांढ-यावरती कदाचित काळे करू शकतो. पण शेकडो वर्षे टिकून राहील, असे जिवंत वाङ्मय निर्माण करू शकणार नाही. मराठी साहित्यक्षेत्रात पुष्कळ वाद झाले. कलेकरिता कला, की जीवनाकरता कला आणि अशा त-हेचे वाद झाले. पण भाऊसाहेब खांडेकर हा एक माणूस असा आहे की, ज्याने आग्रहाने सांगितले की, तुम्ही नुसत्या काल्पनिक आनंदाच्या गोष्टी बोलून भागणार नाही. तुमच्या लेखनाला जर काही विचारप्रेरक असा दृष्टिकोन नसेल, तुमच्या लेखनाला जर काही सामाजिक आशय नसेल, तर तुमचे लेखन हे खरे साहित्य होऊ शकणार नाही. कोल्हापूरसारख्या शहरामध्ये बसून या माणसाने लिहिलेले लेखन उत्तर प्रदेशाच्या, बिहारच्या व उंच पहाडावरील काश्मीरच्या लोकांच्या मनापर्यंत जाऊन पोहोचले. याचे खरे कारणच हे आहे की, शेवटी माणूस हा एक आहे.

तो कोल्हापुरात राहत असेल किंवा श्रीनगरमध्ये राहत असेल, कदाचित तो तामिळनाडूच्या एखाद्या कोप-यात राहत असेल; पण त्याच्या काही मूलभूत भावना या एकसूत्र आहेत. त्या भावनांना स्पर्श करण्याचे सामर्थ्य ज्या लेखणीत आहे, ती लेखणी ही खरी साहित्यिक लेखणी आहे. मघाशी कुणी तरी म्हटले, ते खरे आहे. खांडेकरांना आपण महाराष्ट्रीय म्हणतो. तामिळनाडूची माणसे म्हणतात की, हा आमचा लेखक आहे. त्यांना माहीत नाही, ते कोण आहेत. मराठीमध्ये जेवढ्या ‘दोन ध्रुवा’च्या आवृत्त्या निघालेल्या आहेत, त्याच्यापेक्षा जास्त आवृत्त्या तामिळमध्ये निघाल्या आहेत.

मला समजलेली खांडेकरांची भूमिका मी आपल्याला सांगत होतो. दोन स्वरूपांच्या मध्यमवर्गीय समाजाचे चित्रण करीत असताना त्यांनी असा मध्यमवर्गीय रंगवला आहे की, जो स्वतः गरीब आहे आणि त्याच्याहून लहान, पण बंधनात अडकलेला जो समाज आहे, त्याला वर उचलून घेण्याचा प्रयत्‍न करण्यामध्ये ज्याला आनंद आहे. स्वतःच्या जीवनातील रंगेल खेळ मांडण्यापेक्षा शिकार करावयाची असेल, तर सामान्य जनांकरिता आपल्या जिवाची शिकार केली पाहिजे, हे आवाहन करणारा हा माणूस आहे. मला आठवते, त्यांची 'दोन ध्रुव' कादंबरी मी प्रथम कोल्हापूरमध्ये वाचली. १९३४-३५ साली मी कोल्हापूरला प्रथम आलो होतो. ही नवीन कादंबरी हातांत आली, तेव्हा आषाढ-श्रावणाचा पाऊस धो धो पडत होता. कॉलेजमध्ये गेले नाही, तरी चालेल, असे मनाने ठरविले होते आणि खोलीमध्ये थंडी जाणवते, म्हणून निमित्त करून हलकेसे पांघरूण ओढून मी त्यांची 'दोन ध्रुव' ही कांदबरी पाहिल्यांदा वाचली, असे मला आठवते.

तुम्हांला एक गंमत सांगू ? जर पुस्तक वाचण्याचा तुम्हांला नाद असेल, तर आपल्याला आवडलेले पहिले पुस्तक पहिल्यांदा कसे आणि केव्हा वाचले, याची आठवण मनात ताजी असते. ते पुस्तक आपल्या हातांत घेऊन कसे कुरवाळले, हे आईला आपले पहिले मूल झाल्यावर कुरवाळताना कसे वाटले असेल, हे विचारा, म्हणजे कळेल. कोल्हापुरातील भुसारी वाड्यातील खोलीत त्या पावसाळी दुपारी मी कादंबरी कशी वाचली, हे आजही माझ्या लक्षात आहे. नव्याको-या पुस्तकाला येणारा सुरेखसा वास कसा येत होता, याची सुद्धा मला आठवण आहे. मला तर असे वाटते की, भाऊसाहेबांनी जेव्हा 'दोन ध्रुव' हे पुस्तक लिहिले, तेव्हा फार मोठे काम केले. त्यानंतर काही लोकांनी टीका केली की, भाऊसाहेबांचे हे दोन दोन काय आहे? दोन मनं, दोन ध्रुव, हे जे दोन दोन आहे, हे या लोकांना समजले नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org